Osmanabad : कचरा व्यवस्थापनात पुढचे पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad

Osmanabad : कचरा व्यवस्थापनात पुढचे पाऊल

औसा : प्रत्येक शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढे उभे असताना येथील मुख्याधिकारी तथा प्रशासक अजिंक्य रणदिवे व स्वच्छता निरीक्षक महेमुद शेख यांच्या योग्य नियोजनाने आता प्रत्येक प्रभात कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी वरील कर्मचारीच कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा गोळा करीत आहेत. त्यामुळे कचरा डेपोमध्ये कचरा वेगवेगळा करणे सोपे जात आहे.

औसा शहर आता पन्नास ते साठ हजार लोकवस्तीचे शहर आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन करणे मोठे जिकरीचे काम बनले आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागात एक घंटागाडी असावी यासाठी माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी नियोजन करून घंटागाड्याचे वेळापत्रक ठरवले होते. त्यांची ही मोहीम अधिक गतिमान होणे गरजेचे होते.

मात्र नागरिकांना वेळोवेळी आवाहन करून सुद्धा ओला व सुका कचरा वेगळा करून दिला जात नव्हता. त्यावर पालिकेकडून जनजागृती तर केली जात आहेच पण मुख्याधिकारी श्री. रणदिवे व स्वच्छता निरीक्षक महेमुद शेख यांनी घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनाच आता नागरिक देत असलेला ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याकडून नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत असून या मोहिमेद्वारे शहरातील कचरा व्यवस्थापन प्राधान्याने हाताळले जात आहे.