शेंदूरवादा महसूल मंडळात तीव्र पाणीटंचाई

शेंदूरवादा महसूल मंडळात तीव्र पाणीटंचाई

शेंदूरवादा, ता. 2 (जि.औरंगाबाद) : मृग नक्षत्राच्या सुरवातीनंतर पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीने शेंदूरवादा (ता. गंगापूर) परिसरातील शेतकरी धास्तावला असून या परिसरावर पुन्हा एकदा दुष्काळाचे ढग दाटू लागले आहेत. चारही बाजूने पाण्याचे स्रोत उपलब्ध असताना केवळ राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे शेंदूरवादा महसूली मंडळातील शेंदूरवादा, गुरुधानोरा, दहेगाव, ढोरेगाव, नागापूर, टेंभापुरी, धामोरी आदी गावे तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत.

परिसराला वरदान ठरलेला 21 दशलक्ष घनमीटर क्षमतेचा टेंभापुरी मध्यम प्रकल्प गेल्या 2012 पासून कोरडाठाक असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या अठ्ठावीस गावांच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या असून कोट्यवधीचा खर्च वाया गेला आहे. सततची दुष्काळी परिस्थिती, उत्पादनात झालेली घट, वाढता कर्जाचा डोंगर यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता खचली असून परिस्थितीवर मात करण्यासाठी सरसकट कर्जमाफी, शेतीपूरक व्यवसायासाठी तत्काळ अर्थसाहाय्य, मंडळस्तरावर नियोजन करण्याचे निर्देश देत दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. या वर्षी पावसाने ताण दिल्याने दुष्काळाच्या झळांची तीव्रता अधिक वाढली आहे. केवळ पाण्याचाच प्रश्‍न नव्हे, तर अन्नधान्याच्या किमतींवरही त्याचे सावट निर्माण झाले. पाऊस पडेल या आशेवर शेतकरी असला तरी आता धीर सुटू लागला आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने आणि येणाऱ्या हंगामाचे नियोजन करायचे असल्याने पुढे काय हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

टॅंकरच्या मागणीत वाढ

परिसरात दमदार पाऊस नसल्यामुळे पाणीपातळी वाढली नसून शेंदूरवादा, दहेगाव, सारंगपूर, मुरमी या ठिकाणी पावसाळ्यातही टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. गुरुधानोरासह इतर गावांनीही टॅंकरची मागणी केली. पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली असून अशीच स्थिती येत्या काही दिवसांत कायम राहिली तर टॅंकरच्या मागणीत वाढ होणार आहे.

ग्रामस्थांच्या मागण्या

कायगाव येथून गोदावरीचे पाणी लिफ्टद्वारे टेंभापुरीत आणणे. नांदूर-मध्यमेश्वर वितरिका तीनमधून पुरवठा योजना. मांगेगाव, महालक्ष्मीखेडा बंद पडलेले लिफ्ट पुनरुजीवित करून पाइपलाइनद्वारे पाणी आणणे. खाम नदीचे पाणी लांझीपासून धरणात आणणे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com