जायकवाडी 'फुल्ल'च्या वाटेवर; मराठवाडा मात्र कोरडेठाक

डॉ. माधव सावरगावे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मराठवाड्यात अपेक्षित पाऊस नसतानाही जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सकाळी ९०.५० टक्क्यांवर पोहचला. या पाण्यामुळे तहानलेल्या मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या चार जिल्ह्यातील गोदाकाठ आणि उजव्या-डाव्या कालव्यावरील तालुक्यांना, गावांना आधार मिळाला आहे.

औरंगाबाद - मराठवाड्यात अपेक्षित पाऊस नसतानाही जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सकाळी ९०.५० टक्क्यांवर पोहचला. या पाण्यामुळे तहानलेल्या मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या चार जिल्ह्यातील गोदाकाठ आणि उजव्या-डाव्या कालव्यावरील तालुक्यांना, गावांना आधार मिळाला आहे. मात्र, उर्वरित मराठवाडा अजूनही कोरडाठाक असल्याने मराठवाड्याची चिंताही अधिक वाढली आहे. दुष्काळकडून दुष्काळाकडे अशी स्थिती सध्या दिसत असल्याने अख्खा मराठवाडा चिंतेत आहे.

अर्धा पावसाळा उलटल्यानंतर मराठवाड्यात धरणात-प्रकल्पात पाणी येईल असा पाऊस झाला नसतानाही जायकवाडीत जमा झालेले ९०.५० टक्के पाणी मराठवाड्यातील काही गावांसाठी जीवनदायी ठरले आहे. दुष्काळात जायकवाडी धरणातील पाणी शेवटची घटका मोजत होते. जवळपास उणे १०.७ टक्के मृतावस्थेत धरण पोहचले होते. औरंगाबाद, जालना शहराला पाणीपुरवठा करणारे पंप आपत्कालीन यंत्रणेवर सुरू होते. शेतीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.
 

उद्योगाच्या पाण्यावरही घट करण्यात आली होती. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे गेल्या आठवडाभरापासून गोदामायी भरून वाहत आहे. गोदामाईचं पाणी जायकवाडीच्या पोटात साठत साठत आज ९०.५० टक्के झाले. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्याठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. नाशिक जिल्ह्यातील धरणे भरल्यानंतर त्या धरणातून गोदावरी नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात आला. आजही जायकवाडी धरणात आवक सुरू आहे. सध्या जायकवाडी धरणात १३ हजार ३०० क्यूसेक्सने आवक सुरू असल्यानं लवकरच धरण भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ८०० क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यासोबत जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे, हे पाणी परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रापर्यंत पोहोचते. जायकवाडी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीवरच्या आपेगाव, हिरडपुरी या बंधाऱ्यासाठी १५९० क्यूसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पाऊस नसला तरी पैठण तालुक्यातील तहानलेल्या गावांची तहान भागण्यास मदत होणार आहे.

जायकवाडीत पाणी आल्याचा आनंद साऱ्या मराठवाड्याला असला तरी अख्ख्या मराठवाड्याची तहान जायकवाडी भागवू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. कारण औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील अर्धधिक भाग हा आजही कोरडा आहे. त्यापेक्षाही वाईट स्थिती ही लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याची आहे. कारण त्यात्या जिल्ह्यातील धरणं शेवटची घटका मोजत आहेत. तर नद्या, तळे, कालवे पाऊस नसल्यानं कोरडेठाक आहेत. जायकवाडीमध्ये सर्वाधिक ९०.५० टक्के पाणीसाठा आहे. तर नांदेडच्या विष्णुपुरीत २० टक्के आणि मानारमध्ये २१ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. उर्वरित ७ धरणात मृत साठा आहे. 

सध्या मांजरा धरणात उणे २३.५ टक्के, माजलगावमध्ये उणे २५.१६, तेरणामध्ये उणे १७.७, सीना कोळेगावमध्ये उणे ८७.६२, दुधनामध्ये उणे २०.२७, येलदरीमध्ये उणे २.४ टक्के आणि सिद्धेश्वरमध्ये उणे ६१.२० टक्के पाणीसाठा आहे. म्हणजेच आता हे केवळ कोरडे व्हायचे बाकी आहे. नद्या, मध्यम आणि लहान प्रकल्प, तलाव कोरडेठाक आहेत.

धरणाची ही अवस्था असताना शेती आणि पिकांची परिस्थिती त्याहूनही अधिक बिकट आहे. कारण संपूर्ण मराठवाड्यात सरासरी ३७.६ टक्के इतका पाऊस झाल्याची नोंद विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली आहे. त्यात १२ ऑगस्टपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ४६.१ टक्के, जालनामध्ये ३९ टक्के, परभणी जिल्ह्यात ३५.१ टक्के, हिंगोली ४२.६ टक्के, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ४८ टक्के, बीडमध्ये २३.७, लातूरमध्ये ३१.५ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३१.१ टक्के इतका सरासरी पाऊस पडला आहे. 

१ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाची सरासरी ७७९ मिमी इतकी आहे. त्या तुलनेत ही आकडेवारी आहे. पावसाच्या या परिस्थितीमुळे दुष्काळातून मराठवाडा अद्याप बाहेर पडलेला नाही. चार दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. त्याला अद्यापपर्यंत यश आलं नाही. दुसरीकडे पाऊसही पडत नसल्याने पुन्हा दुष्काळाची भीती वाटत आहे. आता सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा आपत्ती म्हणून याकडे कधी पाहणार आहे, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water storage in the Jayakwadi Dam reached ninty percent this morning