esakal | AMC : पाणीचोरांना तब्बल 24 हजारांचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

महापालिकेच्या मुख्य पाइपलाइवरून पाणी चोरणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा फास आवळण्यास महापालिकेने सुरवात केली आहे. तब्बल 310 जणांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, अवैध पाणीवापर, अवैध पाणीवापर शुल्क, कारवाईसाठी आलेला खर्च असे तब्बल 36 हजार 900 रुपये भरण्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. 

AMC : पाणीचोरांना तब्बल 24 हजारांचा दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - महापालिकेच्या मुख्य पाइपलाइवरून पाणी चोरणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा फास आवळण्यास महापालिकेने सुरवात केली आहे. तब्बल 310 जणांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, अवैध पाणीवापर, अवैध पाणीवापर शुल्क, कारवाईसाठी आलेला खर्च असे तब्बल 36 हजार 900 रुपये भरण्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. 

भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे यंदाच्या उन्हाळ्यात शहरात पाणीबाणी निर्माण झाली होती. महापालिकेची वर्षभराची पाणीपट्टी भरून पाणी घेणाऱ्यांना तब्बल आठ-दहा दिवसांनंतर पाणी मिळत होते, तर दुसरीकडे पाणीचोर मात्र मोकाट होते. त्यामुळे महापालिकेने 26 व 27 जूनला शहरभर मोहीम राबवून पाणीचोरांवर कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे यात बॅंका, पेट्रोपंपचालक, गाड्या धुणाऱ्यांचा समावेश होता. महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरभर खळबळ उडाली. वर्षानुवर्षे पाणी चोरणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून फाइल-फाइल खेळ सुरू होता. महापालिकेच्या वॉटर बॉयलॉजमध्ये बेकायदा नळांच्या विरोधात अत्यंत कमी दंड असल्यामुळे यासंदर्भात सर्वसाधारण सभेत प्रस्ताव आणला जाईल, असे आयुक्तांनी नमूद केले होते; मात्र अद्याप प्रस्ताव आलेला नाही. असे असले, तरी 310 जणांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यात 36 हजार 900 रुपये तीन दिवसांत भरण्यात यावेत, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. 

गुन्हे दाखल करण्याचा विसर 
बड्या पाणीचोरांवर गुन्हे दाखल केले जातील, असेही आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाला आदेशही देण्यात आले; मात्र दोन महिने उलटल्यानंतरही या पाणीचोरांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. 

असा आहे दंड 

  • अवैध पाणीवापर दंड : 5 हजार रुपये 
  • अवैध पाणीवापर शुल्क : 24,400 
  • नळजोडणी खंडित करणे खर्च : 5 हजार रुपये 
  • महापालिका मालमत्तेचे नुकसान : 2500 
loading image
go to top