
सोनपेठ : उष्णतेच्या लाटेने उच्चांक गाठल्याने सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथील दत्ता पोमा जाधव (वय८२वर्षे) यांचे उष्माघाताने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दत्ता जाधव हे नेहमीप्रमाणे ७ मे शनिवार रोजी आपल्या शेतात गेले होते. जास्त ऊन लागल्याने त्यांना सोनपेठ येथे प्रथमोपचार करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र ८ मे रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दत्ता जाधव हे सोनपेठ व परिसरातील अत्यंत सुस्वभावी व्यक्ती म्हणून परिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, पाच भाऊ, नातवंड असा मोठा परिवार आहे. दरम्यान या घटनेनंतर सोनपेठ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी उन्हापासून बचाव करावा, कामाशिवाय घराबाहेर निघू नये, जास्तीत जास्त पाणी प्यावे तसेच वयोवृद्ध व मुलांना उष्णतेपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.