गावांमधील आठवडे बाजारांना ब्रेक, छोट्या व्यावसायिकांची उपासमारी

अविनाश काळे
Monday, 14 September 2020

कोरोनाच्या संसर्ग काही केल्या कमी होत नसल्याने मानवी जीवनावर परिणाम झाला आहे. शिवाय बाजारपेठेतील व्यवहारही ठप्प झाले आहेत. उमरगा शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या गावातील आठवडे बाजार गेल्या सहा महिन्यांपासुन बंद असल्याने छोटे व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोनाच्या संसर्ग काही केल्या कमी होत नसल्याने मानवी जीवनावर परिणाम झाला आहे. शिवाय बाजारपेठेतील व्यवहारही ठप्प झाले आहेत. उमरगा शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या गावातील आठवडे बाजार गेल्या सहा महिन्यांपासुन बंद असल्याने छोटे व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान आठवडे बाजार बंद झाल्याने विविध प्रकारच्या ताजे पालेभाज्या, गावरान डाळींसह चटकदार खाद्य पदार्थांचा शोध घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

संपूर्ण जगात कोरोना संसर्ग पसरत चालल्याने राज्यातही त्याचा प्रसार सुरू झाला आणि राज्य सरकारने २३ मार्चपासून लॉकडाउन जाहीर केले. तेव्हापासुन बाजारपेठा बंद झाल्या. मध्यंतरी काही वेळेत सवलत देऊन बाजारपेठा सुरु झाल्या. मात्र त्यातही अनियमितता राहिली आहे. आठवडे बाजाराची परंपरा तर मोडीतच निघाली. उमरगा शहराचा आठवडे बाजार रविवारी असतो. त्याची जागा आता जनता संचारबंदीने घेतली आहे.

लॉकडाउनमुळे शिकवणी बंद, टोमॅटो पिकाने वाचवले, तरुणाने कमावला वीस गुंठ्यांतून...

मुरुम, गुंजोटी, तुरोरी, नारंगवाडी, येणेगुर, कसगी, कदेर, माडज आदी गावातील आठवडे बाजार ओस पडली. शेतकरी महिलांनी तयार केलेल्या तूर, हरभरा, मूग डाळी विक्रीसाठी यायच्या. त्या आता दिसत नाहीत. नागरिकांना मॉलमधील पॉलिस केलेल्या महागड्या दाळी घ्याव्या लागताहेत. घरगुती झाडू विक्रेते आठवडे बाजारात यायचे आता त्यांना गल्लोगल्ली फिरून व्यवसाय करणे शक्य होत नाही. छोट्या व्यावसायिकातील कापड व्यापारी, भूसार, पादत्राणे विक्रेते, मनियार यांचा व्यवसाय तर बंदच झाला आहे. दरम्यान आठवडे बाजार बंद असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.

कोरोनादूत जाणार अडीच कोटी कुटुंबांपर्यंत, संशयित रुग्णांचा घेणार शोध

लाल मिरचीचा ठसकाच झाला बंद !
उमरग्याच्या आठवडे बाजारात लाल मिरच्याचा मोठा व्यापार व्हायचा. तेथून जाणाऱ्या नागरिकांना नक्कीच ठसका यायचा. बाजारच भरत नसल्याने ठसका बंद झाला आणि कोरोना संसर्गाचा खोकला सुरु झाला. कर्नाटकातील चटकदार गरम मसाला विक्रीसाठी यायचा. तोही बंद झाल्याने बंद पाकिटातील मसाल्याचे पदार्थ वापरावे लागताहेत. खारा, गरम भजे तयार करणारे सहा ते सात स्टॉल असायचे. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना कमी दरात त्याची चव चाखायल्या मिळायची. पण भट्टीच बंद करावी लागल्याने पदार्थ मिळणे शक्य होत नाही.

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekly Markets Closure Due To Corona Umarga News