esakal | शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचे काय झाले ? ; प्रवीण दरेकर यांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

news

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परभणी जिल्ह्यासह हिंगोली जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी रविवारी (ता.चार) केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी परभणीत पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी वेगवेगळया विषयांवर त्यांनी भाष्य केले.  

शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचे काय झाले ? ; प्रवीण दरेकर यांचा सवाल

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून भेटी दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्या वचनाचे काय झाले असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (ता.चार) उपस्थित केला. 

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दौरा सुरु केला आहे. रविवारी ते परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पूर्णा, मानवतसह परभणी तालुक्यातील काही गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी त्यांच्या समवेत आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, आनंद भरोसे, डॉ. उमेश देशमुख, बाळासाहेब भालेराव, बाळासाहेब जाधव, बालाप्रसाद मुंदडा, सुनील देशमुख आदींची उपस्थिती होती. 

मंत्रीमंडळातील मंत्र्यांना वचनाचा पडला विसर  
परभणीत रविवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलतांना श्री. दरेकर म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकी आधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळाली पाहिजे हेक्टरी अनुदान तातडीने जमा केले जाईल, असे वचन दिले होते. परंतू, या वचनाचा विसर मुख्यमंत्र्यासह त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना पडला आहे. 

हेही वाचा - जिंतूरमध्ये पाण्याच्या प्रतिक्षेत नागरिक आतूर; पन्नास वर्षात तीन योजना, तरीही प्रश्‍न कायम -

परभणीसह हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय 
परभणी जिल्ह्यासह लगतच्या हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले उत्पन्न बुडाले आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरे तर शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी धाव घ्यायला पाहिजे होती. पालकमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेवून शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला पाहिजे होते. परंतू तसे झाले नाही. त्यामुळेच विरोधी पक्षनेत्यांना राज्यात फिरावे लागत असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात विम्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे विमा व कर्जमाफीची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरून शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली गेली पाहिजे. या मागण्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्या आहेत, असेही श्री. दरेकर यांनी सांगितले. 

हेही वाचा - सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये

सत्ता टिकविण्याच्या नादात मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष 
सध्या राज्यातील जनता अनेक संकटांचा सामना करत आहे. या प्रसंगी राज्य सरकारने गंभीर होऊन खंबीरपणे त्या प्रश्नाची सोडवणुक केली पाहिजे होती. परंतू, अतंर्गत लाथाळ्यामुळे सरकार टिकविण्याच्या नादात राज्य सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला. 

संपादन ः राजन मंगरुळकर