मजुरीसाठी शेतात निघाली महिला अन् असे घडले... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

परभणी जिल्ह्यात बुधवारी तालुक्यातील भोगाव देवी येथे ४९ वर्षीय मजूर महिलेचा वीजेची तार तुटून अंगावर पडल्याने मृत्यू झाला. तर दोनवेळा पेरणी करूनही सोयाबीनच बियाणांची उगवण झाली नसल्याने तालुक्यातील बोरी पोलिस ठाणे हद्दीतील पाचलेगाव शिवारात नारायण सुगाजी काळे या साठ वर्षीय शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना बोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (ता.चार) घडली. 

जिंतूर ः तालुक्यातील भोगाव देवी येथे ४९ वर्षीय मजूर महिलेचा वीजेची तार तुटून अंगावर पडल्याने मृत्यू झाला. महेमूदबी शेख सरदार असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी (ता.पाच) सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. महेमूदबी ह्या रोजच्याप्रमाणे सकाळी सातच्या सुमारास मजुरीसाठी शेतात जात असताना वाटेत अचानक विजेच्या खांबावरची तार तुटून त्यांच्या अंगावर पडून त्यांना वीजेचा जबर धक्का बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती समजताच पोलिस व महावितरणचे अभियंता, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी सरपंच कृष्णा देशमुख, महिलेचे नातेवाईक, ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेऊन रोष व्यक्त करत महावितरण अभियंता व कर्मचाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे गावातील महिलेचा बळी गेला असल्याचा आरोप करत अभियंता व कर्मचाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मयताच्या कुटुंबाला आर्थिक शासकीय मदत द्यावी अशी मागणी करत दोन ते तीन तास घटनास्थळाचा पंचनामा सुद्धा पोलिसांना करु दिला नव्हता. पोलिस उपनिरीक्षक स्वामी यांनी मध्यस्ती करून गावातील सरपंच, नातेवाईक, ग्रामस्थ यांना समजावल्यानंतर अभियंता यांनी महावितरणाच्या नियमानुसार चौकशीअंती मयताच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येईल याबाबत वरिष्ठ अधिकारी दोन दिवसात येऊन कुटुंबीयांची भेट घेऊन निर्णय घेतील असे सांगितले. त्यानंर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिंतूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

हेही वाचा - Video ; हिंगोली दुमदुमले श्रीरामांच्या घोषणेने, भाजपच्या वतीने आनंदोत्सव..

साठ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
जिंतूर ः दोनवेळा पेरणी करूनही सोयाबीनच बियाणांची उगवण झाली नसल्याने तालुक्यातील बोरी पोलिस ठाणे हद्दीतील पाचलेगाव शिवारात नारायण सुगाजी काळे या साठ वर्षीय शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना बोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (ता.चार) घडली. आत्महत्याग्रस्त शेतकरी काळे यांना दोन एकर शेती असून यंदा मान्सूननंतर दोनदा सोयाबीनची पेरणी करुन सुध्दा सोयाबीन बी बोगस निघाल्याने शेतात पेरलेले काहीच उगवत नाही. त्यामुळे हतबल होऊन नैराश्येपोटी त्यांनी घरात एकटे असताना मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घरातील लाकाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांची पत्नी शेतातून घरी आल्यावर घटना उघडकीस आली. मयत काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहीत मुले व एक विवाहित मुलगी असुन मुले रोजगारानिमित्त बाहेरगावी राहतात. घटनेची माहिती समजताच बोरी ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून शवविच्छेदन जिंतूर शासकीय रुग्णालयात करण्यात आले. बोरी पोलिसात घटनेची अकस्मात मूत्यू अशी नोंद करण्यात आली.

हेही वाचा - Corona Breaking, हिंगोलीचे जिल्हाधिकारी पॉझिटिव्ह

पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पालमची बाजारपेठ बंद 
पालम ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी संपूर्ण पालममध्ये बुधवारी (ता.पाच) बंद पाळण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात संबंधीत पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर नागरिक शांत झाले. 
पालम शहरातील पोलिस कर्मचारी जगन्नाथ काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप केला जात आहे. सदरील कर्मचाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मोबाईलवरून बोलताना अक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळे शिवप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या असून त्या पोलिस कर्मचारी गुन्हा दाखल करून निलंबित करावे अन्यथ पूढील घटनांना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला होता. घटनेमुळे व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद करून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला. बाजारपेठ कडकडीत बंद होती. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक क्लिपच्या माध्यमातून अशब्द वापरले असून या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

जागेच्या वादावरुन सहा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा 
गंगाखेड : शहरातील डॉ. आंबेडकर नगरपरिषद वसाहतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची नियोजित जागा अशी पाटी व निळा झेंडा लावलेला होता. सदर जागा आमची आहे असा आरोप ॲड. आरती ब्रह्मनाथकर यांनी केला. यामुळे सदर जागेचा नगरपरिषदेच्या वतीने पंचनामा चालू असताना आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केल्याचे आरोप करत सहा जणांवर ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याची घटना (ता.चार) ऑगस्टला घडली. डॉ.आंबेडकर न.प. वसाहत या ठिकाणी मागील पंधरा वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची नियोजित जागेची पाटी व निळा झेंडा लावलेला होता. हा निळा झेंडा व पाटी (ता.एक) जुलै रोजी काढून टाकण्यात आला. या जागेचा पंचनामा करण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी आले असता ॲड. आरती नेताजी ब्रह्मनाथकर व तिच्यासोबत अन्य पाच जणांनी चंद्रमुनी भानुदास साळवे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चंद्रमुनी भानुदास साळवे यांच्या फिर्यादीवरून ॲड. आरती नेताजी ब्रह्मनाथकर व अन्य पाच जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपविभागीय अधिकारी बलराज लांजिले करत आहेत. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is what happened to the woman who went to the field for wages ..., Parbhani News