
परभणीचे नाव वगळण्याचे कारण काय ? असा संपप्त प्रश्न भाजपचे माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे
परभणी ः अधिवेशनासंदर्भात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीत परभणीचे नाव सुध्दा नाही. परभणीचे नाव वगळण्याचे कारण काय ? असा संपप्त प्रश्न भाजपचे माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे. परभणीकरांच्या भावनाशी खेळण्याचा काडीमात्र अधिकार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी एका जाहिर सभेतून परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करण्यात आले असल्याची माहिती दिली होती. या मंजुरीच्या फाईलवर सही देखील झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याच बरोबर परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक
यांनी देखील आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली जाईल असे परभणीत सांगितले होते.
सोपस्कार पूर्ण झालेले असतांनाही परभणीचे नाव का वगळण्यात आले ?
इतके सगळे झाल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या अभिभाषणाच्या 13 व्या मुद्यात राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीचा उल्लेख आहे. त्यात उस्मानाबाद, सिंधूदुर्ग व नाशिक या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर केल्याचे म्हटले आहे. सर्व काही सोपस्कार पूर्ण झालेले असतांनाही परभणीचे नाव का वगळण्यात आले ? यात काही काळे बेरे तर नाही ना ? असा संतप्त सवाल भाजपचे माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे.
परभणीकरांच्या भावनाशी खेळू नका, आमचा अंत पाहू नका अन्यथा परभणीकरांच्या संघर्षाची ठिणगी पडल्या शिवाय राहणार नाही याची दक्षता राज्य सरकार मध्ये बसलेल्यांनी घेतली पाहिजे असा इशारा देखील श्री.गव्हाणे यांनी दिला आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे