शेती साहित्य निर्मितीची चाके रुतली, कशामुळे ते वाचा...

विलास शिंदे
Friday, 19 June 2020

सेलू तालुक्यातील निरवाडी बु येथील बाळासाहेब हेंगडे यांनी आधुनिक पध्दतीने व शेतकऱ्यांना परवडतील अशी बैलगाडी, वखर, तिफन, खत पेरणी यंत्रासह अन्य औजारे, साहित्य निर्मिती केली आहे. फिटर व्यावसायिक पात्रताधारकाचा माल लॉकडाउनमुळे विक्रीअभावी धुळखात पडून आहे. 

सेलू ः सर्वसामान्य परिस्थीतीतून दहावीनंतर फिटर अभियांत्रिकीचे व्यावसायीक शिक्षण पुर्ण करुन मेहनत, जिद्दीने पै न पै जमवत गावातच सुरू केलेल्या इंजिनिअरिंग वेल्डिंग व्यवसायाच्या माध्यमातून शेतीकामाचे सर्व औजारे तयार करून वार्षिक पाच लाख उत्पन्न मिळविणारे सेलू तालुक्यातील निरवाडी बु. येथील बाळासाहेब हेंडगे यांची ही यशोगाथा बेरोजगार युवकांसाठी नक्कीच आदर्श ठरु शकते. मात्र, हेंडगे यांच्या या व्यवसायाला यावर्षी कोरोनाचा फटका बसला असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

सेलू तालुक्यातील निरवाडी बु. येथील बाळासाहेब भागुजी हेंडगे यांना शेतजमीन नाही. जेमतेम परिस्थितीतुन बाळासाहेब हेंडगे यांनी दहावीनंतर फिटर अभियांत्रिकी व्यावसायीक शिक्षण पुर्ण केले. आर्थिक परिस्थीती कमकुवत असल्याने नोकरीचा प्रयत्न असफल झाल्याने त्यांनी व्यावसायीक कौशल्याच्या माध्यमातून गावातच लाकडापासून शेतीची औजारे करण्यास प्रारंभ केला. व्यवसायातून पैशाची जमवाजमव करत त्यांनी २०१० साली राजकोट येथुन मशनरी खरेदी करुन निरवाडी बु.येथे दिपक इंजिनिअरिंग वेल्डिंगचा व्यवसाय सुरू केला. 

ही औजारे केली तयार 
यामध्ये आधुनिक पध्दतीने व शेतकऱ्यांना परवडतील असे बैलगाडी, वखर, तिफन, खत पेरणी यंत्र, हळद कुकर व ड्रम, कोळपे, लेझर वखर, तिरी पंजी, मोगडा हे लोखंडी औजारे तयार करण्यास सुरूवात केली. यासाठी लागणारे लोखंड ते मुंबई येथुन आणत. बघता बघता हेंडगे यांच्या व्यवसायाने गती घेतली. याकामात भाऊ रमेश हेंडगे व पुतण्या यशवंत हेंडगे यांची कामासाठी मदत आहे. तयार केलेल्या साधनाच्या विक्रीसाठी बाजारपेठेत जाण्याची गरज भासली नाही. जिल्ह्यासह जालना, हिंगोली, बीड, लातुर येथील शेतकऱ्यांनी जागेवरुन साधन खरेदी केले, असे बाळासाहेब हेंडगे यांनी सांगितले. या व्यवसायातुन सर्व खर्च वजा जाता वार्षिक पाच लाख रूपये उत्पन्न होते.

हेही वाचा - सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी......कुठे ते वाचा

नवीन साधन निर्मिती बंद
इंजिनिअरिंग वेल्डिंग व्यवसायाला दहा वर्ष पुर्ण होत आहेत. कोरोना लॉकडाउनने मात्र मात्र माझ्या व्यवसायाच्या दशकपुर्तीला नजर लागली. अडीच महिन्यापासून कच्चा माल न आणता आल्याने नवीन साधन निर्मिती बंद झाली आणि तयार केलेल्या साधन विक्रीचा खरा हंगाम सुरू होताच कोरोनामुळे या साधनाची विक्री ठप्प झाली. यामुळे माझ्या व्यवसायाचे दशकपुर्तीकडे जाणारे चक्र थांबले असेही हेंडगे यांनी सांगितले.

हेही वाचा - नांदेडकरांना दिलासा : शुक्रवारी पाच वाजेपर्यंत एकही रुग्ण वाढला नाही

 

व्यवसाय सूरू होण्याची प्रतिक्षा 
फिटर या अभियांत्रिकी शिक्षणातील कौशल्यातुन हा व्यवसाय उभारला. यासाठी कुठल्याही बँकेचे अर्थसहाय्य घेतले नाही. साडेतीन, चार, पाच फुट अंतरासाठी आधुनिक पध्दतीने एकच वखर व तिफन तयार केली. ती आज शेतकऱ्यांना सोईची ठरत आहे. तसेच हाळदसाठी लेझर वखरला चांगली मागणी असून हळद कुकर व ड्रमची सर्वाधिक विक्री होत आहे. या व्यवसायातून चांगले उत्पन्न घेत आहे. मात्र, कोरोनामुळे तिन महिन्यापासून काम नाही, ग्राहक नाही आणि दाम नाही. त्यामुळे मन अस्थिर झाले आहे. लॉकडाउन संपवून कधी व्यवसाय सूरू होईल या प्रतिक्षेत आहे. 
- बाळासाहेब हेंगडे, अभियांत्रिकी करागीर, निरवाडी बु. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Wheel Of Agricultural Material Production Has Turned, Why Read It ... parbhani news