Osamanabad : उस्मानाबाद जिल्ह्यात अभिलेखे स्कॅनिंग केव्हा होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद जिल्ह्यात अभिलेखे स्कॅनिंग केव्हा होणार?

उस्मानाबाद जिल्ह्यात अभिलेखे स्कॅनिंग केव्हा होणार?

उस्मानाबाद : जिल्ह्यातील उर्वरित अभिलेखांच्या स्कॅनिंगचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. वर्ष २०१४ पासूनचे हे काम असून, अद्यापही पूर्ण झालेले नसल्याने मौल्यवान दस्तऐवज खराब होण्याचा धोका आहे. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून उर्वरित स्कॅनिंगसाठी निविदा काढण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यातील दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने स्कॅनिंगची प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार २०१४ जमाबंदी आयुक्त कार्यालयाने जिल्ह्यातील अभिलेखे स्कॅनिंग करण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले होते. या कंपनीने स्कॅनिंगचे काम केले. मात्र, काही दस्तऐवज व्यवस्थित स्कॅन झाले नाहीत. काही दस्तऐवज स्कॅनिंग करण्याचे राहिले. त्यामुळे जिल्ह्यातील अभिलेखे व्यवस्थित ठेवता आले नाहीत. दरम्यान, संबंधित कंपनीने उर्वरित काम पूर्वसूचना न देता सोडले. त्यामुळे जिल्हास्तरावर याबाबत वरिष्ठ कार्यालयास संपर्क करण्यात आला. वर्ष २०१४ मध्ये काम देऊनही कंपनीने वेळेत काम पूर्ण केले नाही.

उलट वेळ मागवून घेत काम रेंगाळले. अखेर कंपनीने याबाबत काही न सांगता उर्वरित काम केले नाही. तसा अहवाल जिल्हास्तरावरून वरिष्ठ कार्यालयास देण्यात आला. त्यानंतर उर्वरित कामासाठी स्थानिक स्तरावरून निविदा काढाव्यात अशा तोंडी सूचना जिल्हा प्रशासनास देण्यात आल्या. त्यामुळे आता उर्वरित प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. नव्याने निविदा काढावी, ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चांगल्या दर्जाची एजन्सी नेमणे गरजेचे आहे. त्याची चाचपणी झालेली आहे. संपूर्ण राज्यात हा प्रश्न उद्भवला आहे. त्यासाठी ज्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ, तांत्रिक साधणे आहेत. अशाच एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे. थोड्याच दिवसात एजन्सी नेमण्याचे काम पूर्ण होईल.

- डॉ. वसंत निकम,

अधीक्षक, भूमिअभिलेख, उस्मानाबाद.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वानवा

जिल्ह्यासाठी अधीक्षक भूमिअभिलेख हे प्रमुख असतात. दोन महिन्यांपूर्वीच येथील अधीक्षक बदलून गेले आहेत. मात्र, अद्यापही येथे नव्याने अधिकारी आलेले नाहीत. सध्या जिल्ह्याच्या भूमीअधीक्षक अभिलेख कार्यालयाचा पदभार परभणी येथील अधिकाऱ्यांकडे आहे. त्यांच्या येण्या-जाण्यात दोन दिवस जातात. त्यामुळे कारभार ढेपाळत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय तालुक्यातील अधिकाऱ्यांचीही अनेक पदे रिक्त आहेत.

loading image
go to top