कामगार जेव्हा उद्योजक बनतात...

- अभिजित हिरप
गुरुवार, 12 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

१९९६ च्या मंदीने बेकार झालेले; पण पोटासाठी मिळेल त्याच्याकडे, मिळेल तिथे काम करणाऱ्या सव्वाशे कामगारांबद्दलची माहिती अनिल बोकील यांना मिळाली. कला, कौशल्य, प्रचंड अनुभव असूनही या कामगारांवर हलाखीची वेळ आली होती. विखुरलेल्या या कामगारांना एकत्रित आणून त्यांची मोट बांधण्याचा निश्‍चय बोकील यांनी केला. ‘डॉट प्रीसीजन’ नावाने कंपनी चालवत असलेल्या बोकील यांनी या कामगारांची इत्थंभूत माहिती मिळविली. मग १९९८ मध्ये ‘टाईनी इंडस्ट्रीज को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट लिमिटेड’ची स्थापना केली. 

श्री. बोकील यांनी प्रत्येकातील कलागुण हेरले. त्यांना एकत्र आणून इंडस्ट्रीज सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शून्यातून विश्‍व निर्माण करण्याचा दिशेने उचललेले हे पाऊल होते. चिकलठाणा एमआयडीसीत एच-५ मध्ये थाटण्यात आलेल्या पत्र्याचा शेडमधील ऑफिसमध्ये या सर्व कामगारांच्या बैठकी व्हायला लागल्या. त्यातून स्वःताची जागा घेण्याचा विचार पुढे आला.

पैशांसह अनंत अडचणींचा डोंगर समोर होताच. त्यातून मार्ग काढण्याचा निर्धार बोकील यांनी केला. पुढे बोकील यांच्या अध्यक्षतेखाली अकरा जणांचे संचालक मंडळ आकाराला आले. तिथून कर्जासाठी बॅंकांशी संपर्क साधण्याची मोहीम सुरू झाली. सिडकोतील देवगिरी बॅंक शाखेशी कर्जासाठी संपर्क साधला. त्यांनीही सिक्‍युरिटीचा प्रश्‍न उपस्थित केला. त्यांनतर सर्व सभासदांचे देवगिरी बॅंकेत चालू खाते उघडून त्यात ५०० रुपयांची एफडी प्रत्येकाने करण्याचे ठरले. त्यानुसार सर्व काही झाले आणि बॅंकेच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यवहार सुरू झाले. याशिवाय प्रत्येकाकडून शंभर रुपये सभासद शुल्क घेतले. एका वर्षाने बोकील आणि काही कामगार कर्ज मागण्यासाठी पुन्हा बॅंकेत गेले. पुन्हा सिक्‍युरिटीचाच मुद्दा पुढे आला. अखेर एका बॅंकेने विनातारण कर्जाची तयारी दर्शविली.

कर्ज, जागा मिळाल्यानंतर २००२ मध्ये पहिल्या टप्प्यातील २९ गाळ्यांच्या बांधकामाला सुरवात झाली. सिमेंटचे ब्लॉक, खिडक्‍या, ग्रील बनविण्याचे काम, त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासह कामगारांना त्यांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात वीस टक्के प्रॉफीटही दिला. ही रक्कम गाळ्याची किंमत म्हणून जमा करून घेतली. त्यामुळे कर्जाची परतफेडही सुरू झाली. तयार झालेल्या गाळ्यांचे ड्रॉ पद्धतीने सभासदांना वाटप झाले. २००५-०६ मध्ये २० आणि नंतर टप्प्याटप्प्याने एकूण ८० गाळे बांधून कामगारांना देण्यात आले. 

गाळ्यांचे वाटप झाल्यावर ८० उद्योजकांनी ‘टाईनी’अंतर्गत उद्योग सुरू केले. लेथ मशीन, ड्रीलिंग, ग्राईंडिंग मशीनचा खडखडाट घुमू लागला. भाड्याच्या जागेत काम करणारा कामगार आता स्वतःच्या जागेतून कंपन्यांच्या ऑर्डर पूर्ण करू लागला. ८० लघुउद्योगांच्या माध्यामातून साडेचारशे कामगारांच्या हाताला काम मिळाले आणि त्यांचेही संसार उभे राहिले. कधीकाळी दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या ९० टक्‍के कामगार कम उद्योजकांकडे बंगला, गाडी, पैसा, स्वतःचे सॅटेलाईट युनिट आणि सर्वांत महत्त्वाचे समाधान आहे. पायपीट किंवा सायकलने कंपनीत येणारे २० कामगार जगभरातील नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी २०१५ मध्ये आठ दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाऊन आले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, सबसिडीचा लाभ घेत ‘टाईनी’तील लघुउद्योजकांची गगनभरारी सुरू आहे. 

क्‍लस्टरसाठी २० कोटींचा प्रस्ताव
‘टाईनी जनरल इंजिनिअरिंग अँड अलाईड इंडस्ट्रीज क्‍लस्टर’चे चेअरमन संतोष कुलकर्णी म्हणाले, की लघुउद्योजक म्हणून यशस्वी ठरलेल्या ‘टाईनी’तील विविध उद्योजकांनी आता आधुनिकतेची कास धरण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ‘टाईनी जनरल इंजिनिअरिंग अँड अलाईड इंडस्ट्रीज क्‍लस्टर’ निर्माण करण्यात येत आहे. त्यात अत्याधुनिक यंत्रे, उत्पादित पार्टची गुणवत्ता तपसण्यासीठीचे कॅलिब्रेशन सेंटर, डिझायनिंग सेंटर या ठिकाणी उपलब्ध असेल. याशिवाय या सेंटरतर्फे नव्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. २० कोटी ४८ लाखांचा हा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला असून, या क्‍लस्टरसाठी आम्ही ८० हजार चौरस फूट जागा खरेदी केली आहे. कल्स्टरला मंजुरी मिळताच काम सुरू होईल.

Web Title: When workers become businessman