केव्हाही करा शालेय  रेकॉर्डमधील दुरुस्ती

सुषेन जाधव
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

  • औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
  • नोकरी, व्यवसायापासून मुकावे लागणार नाही 

औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती आता कधीही करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे आता शाळा सोडलेले विद्यार्थीही आपल्या शालेय प्रमाणपत्रावर झालेली चूक दुरुस्त करू शकतील. शालेय रेकॉर्डमध्ये झालेल्या साधारण चुकांमुळे विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसायापासून मुकावे लागणार नाही. 

जनाबाई हिंमतराव ठाकूर (रा. अमळनेर) यांनी आपल्या शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्रात दुरुस्ती करून मिळावी यासाठी जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. शिक्षणाधिकारी यांनी जनाबाई यांचा अर्ज फेटाळत अशा प्रकारची दुरुस्ती करता येत नसल्याचे स्पष्ट केले होते. माध्यमिक शाळा संहिता नियम 26.3 व 26.4 अन्वये फक्त शाळेमध्ये सद्यःस्थितीत शिक्षण घेत असलेल्या पाल्याच्या शालेय रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करता येते. एकदा शाळा सोडल्यानंतर दुरुस्ती करता येत नाही, असे शासनाचे म्हणणे होते. सुनावणीप्रसंगी खंडपीठाच्या निदर्शनास औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाचे निर्णय आणून दिले. औरंगाबाद खंडपीठाच्या तीन निर्णयात दुरुस्ती करता येते, असे म्हटलेले असून नागपूर खंडपीठाच्या एका निर्णयात दुरुस्ती करता येत नसल्याचे म्हटलेले आहे. खंडपीठाच्या निर्णयामधील विसंगती लक्षात घेता प्रकरण पूर्णपीठासमोर सुनावणीस ठेवण्यात आले. 

कधीही दुरुस्त करता येणार चूक 

औरंगाबाद खंडपीठाचे यासंबंधीचे निर्णय व्यापकता दर्शविणारे असून नागपूर खंडपीठाचा निर्णय संकुचित वाटतो असे या पूर्णपीठाने मत नोंदविले. या पीठाने चारही निर्णयाबद्दल असमर्थता दर्शविली. शालेय रेकॉर्डमध्ये नजरचुकीने अथवा अनवधानाने चूक झाली असेल तर ती कधीही दुरुस्त करता येईल, असा निर्णय पूर्णपीठाने दिला आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने ऍड. स्वप्नील राठी, राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे तर सुमोटो याचिकाकर्ता म्हणून ऍड. अमेय सबनीस यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात पूर्णपीठाने बाजू मांडण्यासाठी वकील संघासह इतरही वकिलांना मुभा दिली होती. ऍड. सबनीस यांनी माध्यमिक शाळा संहिता ही केवळ मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यामुळे त्यात केव्हाही दुरुस्ती करता येते, असा युक्तिवाद केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whenever Possible then correct School Record, Aurangabad Bench Decosion