समान संख्याबळामुळे सभापती कोण होणार, याची उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

फुलंब्री बाजार समिती सभापतिपदासाठी मंगळवारी (ता. 24) निवडणूक होत आहे. कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली ही बाजार समिती आपल्याकडे खेचून घेण्याचे डावपेच भाजप-शिवसेनेने आखले असून, या दोन्ही पक्षांच्या संचालकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. दोन्ही गटांकडे प्रत्येकी नऊ असे समान संख्याबळ असल्यामुळे सभापती नेमका कोणत्या पक्षाचा होणार, याकडे फुलंब्रीकरांचे लक्ष लागले आहे.

फुलंब्री, ता. 23 (बातमीदार) : फुलंब्री बाजार समिती सभापतिपदासाठी मंगळवारी (ता. 24) निवडणूक होत आहे. कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली ही बाजार समिती आपल्याकडे खेचून घेण्याचे डावपेच भाजप-शिवसेनेने आखले असून, या दोन्ही पक्षांच्या संचालकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. दोन्ही गटांकडे प्रत्येकी नऊ असे समान संख्याबळ असल्यामुळे सभापती नेमका कोणत्या पक्षाचा होणार, याकडे फुलंब्रीकरांचे लक्ष लागले आहे.

सभापतिपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याविषयी सर्वत्र तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजपमध्ये झालेली आवक व भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची स्थानिक पातळीवर झालेली दिलजमाई पाहता सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाजार समितीचे कॉंग्रेसचे सभापती संदीप बोरसे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा इतर पदाधिकाऱ्यांना सभापतिपदाची संधी मिळावी म्हणून ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला.

निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी आगळीवेगळी आघाडी करून पंधरा संचालक निवडून आणले होते. भाजपच्या पॅनेलमधून तीन संचालक निवडून आले होते. त्यावेळी कॉंग्रेसचा सभापती आणि "राष्ट्रवादी'चा उपसभापती करण्यात आले होते. भाजप, शिवसेना यांचा स्थानिक पातळीवर समझोता घडवून आणण्यात आला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची समजूत काढण्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना यश आल्याचे दिसते. कॉंग्रेसचे काही संचालक भाजपच्या तंबूत दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेचे चार, भाजपचे चार असे आठ संख्याबळ असून, कॉंग्रेसचा एक संचालक आपल्याकडे ओढण्यात भाजप-शिवसेनेला यश आले आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे नऊ तर भाजप व शिवसेना युतीकडे नऊ असे समसमान संचालक असल्याने सभापतिपदी कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who Will Become Chairman Of Market Committee