भाजपचा उमेदवार कोण, हरिभाऊ बागडे की नवीन चेहरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना उमेदवारी मिळण्यात त्यांच्या वयाचा अडसर येत असून, त्यांची उमेदवारी बदलण्याबाबत पक्षपातळीवर गंभीरपणे विचार सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना उमेदवारी मिळण्यात त्यांच्या वयाचा अडसर येत असून, त्यांची उमेदवारी बदलण्याबाबत पक्षपातळीवर गंभीरपणे विचार सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.

या मतदारसंघात श्री. बागडे हे निवडणुकीच्या रिंगणात राहिले नाहीत तर उमेदवारी कोणाला मिळणार, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. "पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्‍याएवढा' या उक्तीप्रमाणे प्रत्येकजण आपली जेवढी राजकीय समज आहे तेवढे आडाखे बांधत आहे. हरिभाऊ बागडे यांच्या तालमीत तयार झालेले, संघाशी निगडित असलेले प्रदीप पाटील, प्रभारी जिल्हाध्यक्ष अनुराधा चव्हाण, उपमहापौर विजय औताडे, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, डॉ. गिरीश गाडेकर या पर्यायी नावांची चर्चा होत आहे.

या मतदारसंघात 2014 ला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेली मतविभागणी व मोदी लाट या दोन ठळक बाबी होत्या. मतदारांनी दहा वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला बाजूला सारून भाजपच्या बाजूने कौल दिला. गेल्या वीस वर्षांचा लेखाजोखा बघितला तर दहा वर्षे कॉंग्रेस, दहा वर्षे भाजपच्या ताब्यात मतदारसंघ आहे. 1999 ला औरंगाबाद पूर्व मतदारसंघ होता. त्यापूर्वी भाजपचे हरिभाऊ बागडे हे सतत निवडून येत होते. कॉंग्रेस पक्षाचे दोन नेते एकाचवेळी बंडखोरी करून निवडणूक लढवीत असत. त्यामुळे भाजपला याचा सरळ फायदा होत गेला. 1999 मध्ये हरिभाऊ बागडे हे निवडून आल्यानंतर 2004 मध्ये कॉंग्रेसने नवीन चेहरा म्हणून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी झाली नाही. याशिवाय ऍन्टीइन्कबसीतून मतदारांना बदल हवा होता. म्हणून मतदारांनी डॉ. कल्याण काळे यांना निवडून दिले. त्यानंतर 2009 मध्येही त्यांना मतदारांनी पुन्हा संधी दिली. 2014 मध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली नाही. दहा वर्षांनंतर भाजपने पुन्हा हरिभाऊ बागडे यांना निवडून दिले. वर्ष 2009 मध्ये शहरी भागाचा फुलंब्री मतदारसंघात समावेश करण्यात आला. तेव्हापासून शहरातील मतदारांचा कल हा भाजपच्या बाजूने दिसून आला. 2009 व 2014 या दोन्ही निवडणुकीत कॉंग्रेसला भाजपपेक्षा कमी मतदान मिळाले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तेव्हाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी चांगली मते मिळविली. डॉ. कल्याण काळे हे तीन हजार 611 मतांनी पराभूत झाले.

भाजपचे इच्छुक
यावेळी कॉंग्रेसकडून डॉ. कल्याण काळे यांचे नाव निश्‍चित मानले जाते. प्रहार संघटनेकडून जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे हेही रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. सध्या तरी हरिभाऊ बागडे हे उमेदवारी कायम राखण्यात यशस्वी होतात की त्यांना बदलून दुसऱ्याला संधी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र एक गोष्ट खरी की, समजा श्री. बागडे यांची उमेदवारी बदलली गेली तरी ते सांगतील त्याच उमेदवाराला उमेदवारी मिळणार, एवढे निश्‍चित मानले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who Will Candidate Haribhau Bagde Or New One ?