औरंगाबाद : प्रसूतीसाठी आणले पोलिस ठाण्यात, पोलिसांनी केले बाळांतपण

आर. के. भराड
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

खाकीची संवेदनशीलता, महिला पोलिस झाल्या दायी 

वाळूज (जि. औरंगाबाद) - पोलिस ठाणे म्हटले की कायम भांडण, चोरी, खून, बंदोबस्त असेच चित्र आपल्या समोर उभे राहते अन्‌ पोलिस म्हटले की रागीट चेहराच समोर येतो; पण पोलिस ठाण्याच्या चार भिंतीआडही माणुसकी, रागीट चेहऱ्याआड संवेदनशील काळीज आहे, याची प्रचिती बुधवारी (ता. 25) येथे आली. झाले असे की, रिक्षातून बाळांतपणासाठी
रुग्णालयात जात असलेल्या एक महिलेला तीव्र वेदना होत होत्या. वेळेत रुग्णालयात पोचणे शक्‍य नसल्याने रिक्षा थेट पोलिस ठाण्यात रिक्षा नेली. महिला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ मदत केली आणि पोलिस ठाण्यात एका गोंडस मुलीचा जन्म झाला. 

येथील हिराबाई रमेश सरोदे यांची मुलगी सोनाली धम्मपाल थोरात काही दिवसांपूर्वी हिराबाईंकडे बाळंतपणासाठी आली होती. बुधवारी सोनालीला प्रसूती कळा आल्या. हिराबाई तिला रिक्षातून रुग्णालयात नेत होत्या; मात्र सोनालीला जास्त त्रास सुरू झाला. त्यातच रुग्णालय जवळ नसल्याने हिराबाई आणि रिक्षा चालत भांबावून गेले. त्यांनी 108 या रुग्णवाहिकेला
कॉल लावला. रुग्णवाहिका पोलिस ठाण्याजवळ होती. चालकाने थेट रिक्षा पोलिस ठाण्याकडे वळविला. रुग्णवाहिकेचे डॉ. एम. एस. दारकोंडे यांच्यासह सहकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी सोनालीला जास्त त्रास जाणवत असल्याचे लक्षात येताच डॉक्‍टरांनी सोनालीचे बाळंतपण पोलिस ठाण्यातच करण्याचा निर्णय घेतला. ठाण्यातील महिला पोलिस शिपाई
आरती कुसळे, फातेमा पठाण, वैशाली चव्हाण यांनी दायीची भूमिका निभावल्याने हे बाळंतपण यशस्वी झाले. 
  
माय-लेकीची प्रकृती ठणठणीत 
पोलिस ठाण्यात जन्मलेल्या नवजात चिमुकलीसह तिच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे. बाळांतपणानंतर बाळ आणि बांळतिणीला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी 108 रुग्णवाहिकेचे पायलट राजू रोकडे, विशेष पोलिस अधिकारी सूरज जाधव यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. 

 

रांजणगाव (शेणपुंजी) येथील गर्भवती महिला बाळंतपणासाठी ऑटो रिक्षातून तिच्या आईसह जात होती. मात्र, तिला जास्त कळा येत असल्याने ऑटोरिक्षा सरळ पोलिस ठाण्यात आली. येथील 108 रुग्णवाहिकेत तिला बसविण्यापूर्वी जास्तच कळा सुरू झाल्या. ही माहिती मिळताच आमच्या ठाण्यातील महिला पोलिसांनी तत्काळ धाव घेत आडोसा करून त्या महिलेचे बाळंतपण केले. बाळ व बाळंतीण सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर पोलिस ठाण्याचे स्ट्रेचर आणून नाळ कापण्यासाठी व पुढील उपचारार्थ बाळ व बाळंतिणीला घाटी रुग्णालयाकडे रवाना केले. 

- अनिल गायकवाड, पोलिस निरीक्षक वाळूज एमआयडीसी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman delivered baby in police station