भांडण सोडविणारी महिला गेली देवाघरी 

कृष्णा पींगळे
Thursday, 26 March 2020

विशेष म्हणजे पोलिसांनी सापळा लावून काही तासाच्या आतच आरोपीला अटक केली. गुरूवारी (ता. २६) त्याला सोनपेठ न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले

सोनपेठ (जिल्हा परभणी) : उसने घेतलेल्या पैशावरून होणारे भांडण सोडवायला गेलेल्या महिलेवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन तिचा निर्घृण खून झाल्याची घटना दौनापूर तांडा (ता. सोनपेठ) येथे गुरुवारी (ता. २५) सायंकाळी घडली. विशेष म्हणजे पोलिसांनी सापळा लावून काही तासाच्या आतच आरोपीला अटक केली. गुरूवारी (ता. २६) त्याला सोनपेठ न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

दौनापूर तांडा (सायखेडा) येथील सडकेल उर्फ शिवा सुरचंद भोसले याने आपले चुलते राजू उर्फ खांच्या उर्फ राजू जुमन्ना भोसले यांना सहा महिन्यांपूर्वी उपचारासाठी पाच हजार रुपये हातउसने दिले होते. मात्र आजार कमी झाल्यानंतर हातउसणे घेतलेले पैसे परत करण्यास तो टाळाटाळ करत होता. मंगळवारी (ता. २४) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सडकेल भोसले याने चुलते खांच्या भोसले याला उसने घेतलेले पैसे परत मागितले. त्यावरून दोघात वाद झाला. वादाचे पर्यावसन तुंबळ मारामारी झाले. 

अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू 

हे भांडण सोडवण्यासाठी सडकेल भोसले याची पत्नी शर्मा भोसले ही समोर आली. यावेळी राजू भोसले याने तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने पाठीत जबर वार केला. यामध्ये सडकेल भोसले तसेच शर्मा भोसले हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा ... तर परभणी शहराला मिळेल आठ दिवसाआड पाणी
 
आरोपी राजू भोसले याला अटक

ऐन पाडव्याच्या दिवशी म्हणजेच बुधवारी (ता.२५) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उपचार चालू असताना शर्मा भोसले हीचा मृत्यू झाला. यानंतर या गावात चांगलाच तणाव निर्माण झाला. यानंतर सोनपेठ पोलिसांनी अंबेजोगाई रुग्णालय व मयत महिलेचे गाव गाठले. त्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त लावला. जखमी सडकेल भोसले यांच्या फिर्यादीवरून राजू भोसलेविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपी राजू भोसले याला सोनपेठ पोलिसांनी मोठ्या सिताफीने तात्काळ अटक केली. 

गुरूवारी (ता. २६) न्यायालयासमोर हजर करणार

सदरील प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे हे करत आहेत. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षक भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. गवारे, पोलीस नायक महेश कवठाळे, आत्माराम पवार आणि चालक श्री. करवर यांनी परिश्रम घेतले. बुधवारी रात्री शर्मा भोसले हिच्या मृत्तदेहाची उत्तरीय तपासणीकरुन अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman who solved the brawl was gone parbhani news