तोंडाला रुमाल बांधून गेल्या सोन्याच्या दुकानात, अन् त्या दोघींनी केली...

प्रा. प्रवीण फुटके 
Wednesday, 26 August 2020

शहरातील अत्यंत गजबजलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक परिसरातील एका सोने-चांदीच्या दुकानात अज्ञात महिलांनी तोंडाला रुमाल बांधून जवळपास दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना दिवसाढवळ्या घडल्याने सोने-चांदीच्या व्यापाऱ्यात घबराट निर्माण झाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी वैजनाथ (बीड) : शहरातील अत्यंत गजबजलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक परिसरातील एका सोने-चांदीच्या दुकानात अज्ञात महिलांनी तोंडाला रुमाल बांधून जवळपास दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना दिवसाढवळ्या घडल्याने सोने-चांदीच्या व्यापाऱ्यात घबराट निर्माण झाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी वैजनाथ येथील शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून श्री गणेश स्थापना आणि महालक्ष्मी या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी आहे. राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरात असलेल्या अरुण टाक अँण्ड सन्स या सोन्याच्या दुकानात दोन महिला तोंडाला रुमाल बांधून गेल्या. सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांनी सोन्या चांदीचे दागिने पाहिले. दुकानात असलेल्या गर्दीचा फायदा घेत या महिलांनी काही सोन्याचे दागिने ज्यात गंठण, व इतर दागिने दाखवले. या महिलांनी एकूण चार तोळे वजन असलेले दोन गंठण ज्यांची अंदाजे किंमत दोन लाख रुपयांचे होते ते दागिने लंपास केले. ही घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

एक दिवसांपूर्वी अशीच घटना एका सोन्याच्या दुकानात घडली होती. ही वार्ता वार्‍यासारखी सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यात पसरली आणि एकच खळबळ उडाली. दरम्यान ही घटना घडलेली लक्षात येताच अरुण टाक अँड संन्सचे मालक अरूण टाक यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. ज्या दुकानात घटना घडली त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर मोठा पोलीस बंदोबस्त आहे. तरी घटना घडल्याने व्यापारी बांधवामध्ये खळबळ उडाली आहे.

संपादन- सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women have robbed a gold and silver shop at Parli Vaijnath