घोंगडीला पुनर्जिवीत करण्यासाठी सरसावल्या महिला

Nanded News
Nanded News

नायगाव : आधुनिक काळात यंत्रमाग व्यवसाय सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसीत झाला असताना नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे हाताने बनवण्यात येणारी घोंगडी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. सर्वत्र हातमाग व्यवसाय शेवटच्या घटका मोजत असताना हजारो वर्षाची परंपरा राहिलेल्या व धनगर समाजाची ‘लक्ष्मी’ म्हणून ओळख असलेल्या घोंगडीला पुनर्जिवीत करण्यासाठी येथील बचत गटाच्या महिला पुढे सरसावल्या आहेत. घोंगडी बनवण्याचा व्यवसाय हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे.
 
खरे तर घोंगडीला हजारो वर्षाची परंपरा आहे. कापसाचा धागा अस्तित्वात येण्याअगोदर पासून घोंगडीचा वापर चालू आहे. पंढरीच्या पांडुरंगाच्या खांद्यावर आपण घोंगडीच पाहिली आहे. पूर्वीच्या काळी ‘तोरणा जागी’ व  ‘मरणा जागी’ घोंगडीचे अनन्यसाधारण महत्त्व होते. लग्नात शेवंतीच्या वेळेस (सिमंतपूजन) नवरदेवाच्या खांद्यावर हमखास घोंगडी टाकण्याची पद्धत होती. आता ती जागा उलनच्या शाॅलने घेतली असली; तरी आजही अंत्यसंस्काराच्या वेळेस विधी घोंगडी पांघरूनच केले जातात.

यामुळे घोंगडीची मागणी कमी 
पूर्वी अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी घोंगडीचाच वापर केला जात असे. मात्र देश विदेशातून येणारे उलनचे कपडे आले, यंत्रमाग व्यवसाय विकसित झाला आणि विविध प्रकारच्या चादरी बाजारात येऊ लागल्यामुळे मागणीअभावी घोंगडी व्यवसायाला उतरती कळा लागली. तरीही ‘घोंगडी शौकिन’ अगदी दोन-तीन दशकापर्यंत होतेच!  परंतु नाजूक जमान्यात मऊ मुलायम चादरींना मागणी वाढल्यामुळे ओबडधोबड घोंगडी वापरणाऱ्यांची संख्या तशी कमीच झाली. दोन-तीन दशकापूर्वी मेंढ्या चारवत-चारवत त्यांच्यामागे मेंढरांच्या केसा पासून चाता फिरवत दोऱ्या बनवणारा मेंढपाळ मेंढराच्या मागे फिरताना आपण पाहिलेलाच आहे. पण हे दृश्य आता दुर्मिळ झाले आहे. एकीकडे मेंढरांची संख्या कमी झाली तर दुसरीकडे घोंगडीची मागणीही कमी झाली आहे.

सांघिक पद्धतीने बनवतात घोंगडी 
मऊ मुलायम कपड्यावर व गादीवर झोपू लागल्यामुळे सुखासीन माणसांना अनेक व्याधीने त्रस्त करून सोडले आहे. रक्तदाब, कंबर दुखी, मणके दुखी, मान दुखी आदी आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना गादीवर झोपू नका, जमिनीवर झोपा अशा अनेक डाॅक्टरांच्या सूचनेचे पालन करून त्रस्त व्हावे लागत आहे. यापासून सुटका करण्यासाठी अनेक शारिरीक आजाराने त्रस्त असलेली मंडळी घोंगडीचा शोध घेताना दिसत आहेत. त्याचाच फायदा घेत कुंटूर येथील धनगर समाजातील महिला बचतगट स्थापून सांघिक पद्धतीने घोंगडी बनवण्यासाठी सरसावल्या आहेत. 
 
काय आहे घोंगडीचे लाॅजिक 
अडीच हात रूंद व सात हात लांब घोंगडी बनवण्यासाठी साधारणतः तीन किलो मेंढराचे लोकर (केस) लागतात. केसांना बाणाच्या आकाराच्या ताणाने पिंजून घ्यावे लागते. केसाची रूई बनली की चाता फिरवत त्याचा दोरा वळायचा असतो. घरकाम उरकून उरलेल्या वेळात या महिला तासन् तास हातात चाता फिरवत घोंगडीसाठीचा दोरा वळतात. एका घोंगडीला लागणारा दोरा विनायला तब्बल एक आठवडा लागतो. चिंचेच्या चिंचोक्याची चिक्की करून वळलेल्या दोऱ्यांना लावून गडी माणसाकडून दर दिवशी पाचशे रुपये प्रमाणे मजूरी देऊन घोंगडी विणून घेतात. त्याला दोन दिवस लागतात. तीन किलो वजनाची एक घोंगडी असते. काळी घोंगडी दोन हजार रूपयाला तर पांढरी घोंगडी अडीच हजार रूपयाला विकली जाते. 
  
अल्पभूधारक महिला सरसावल्या
अंजना संभोड, धुरपता वड्डे, जनाबाई संभोड, गोदावरी संभोड, राजाबाई बहिरे, पूजा बिस्मीले, शिवनंदा गोदे, अनीता शिंगणे, गंगुबाई शेटे, देऊबाई शेळगावे या दहा महिला एकत्र येऊन गिरजामाय महिला बचत गट स्थापन करून आपल्या धनगर समाजातील घोंगडी बनवण्याच्या व्यवसायाला पुनर्जिवीत करण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे अद्याप पावेतो कोणत्याच बॅँकेकडून कर्ज न घेता मोलमजुरीच्या आलेल्या पैशातून भांडवल उभे करून पन्नास रूपये प्रतिकिलो केस विकत घेऊन या व्यवसायाला प्रारंभ केला आहे. 

घोंगडीला मिळावी हक्काची बाजारपेठ
घोंगडी बनवणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे हे काम किचकट असले तरी अशक्य नाही. आमच्या बचत गटाची आठवड्याला दहा घोंगडी सुद्धा बनवण्याची क्षमता आहे. परंतु सध्या आम्ही मागणी नुसार घोंगडी बनवून देतो. माळेगाव यात्रा, नांदेड, औरंगाबाद, मुंबई, जालना, परभणी, लातूर आदी ठिकाणी होणाऱ्या बचतगटाच्या मेळाव्यात ही घोंगडी आम्ही विक्रीसाठी घेऊन जातो. याही परिस्थितीत घोंगडी बनवण्याचा व्यवसाय हा आमच्या उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे. परंतु घोंगडीला हक्काची बाजारपेठ मिळाली तर अधिक आर्थिक दृष्ट्या समृद्ध होऊ.  
- अंजनबाई संभोड, अध्यक्ष, गिरजामाय स्वंयसहाय्यता महिला बचत गट कुंटूर
  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com