Women's Heart Week : महिलांनो, घराची काळजी घेताच... स्वतःचे हृदयही जपा

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : हृदयरोग हा प्रामुख्याने पुरुषांचा आजार आहे, असा एक मोठा गैरसमज असतो. पण हे खोटे आहे. महिलांमध्येही हृदयरोगाचे प्रमाण पुरुषांइतकेच आहे. कारण घरात सर्वांच्या आरोग्याची काळजी करताना महिलांच्या आरोग्याकडे पुष्कळच दुर्लक्ष होत असल्याचे अनेक पाहण्यांमधून समोर आल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

हृदय अचानक बंद पडणे (हार्ट ऍटॅक) व त्यानंतर हृदयाच्या गतीवर होणारा परिणाम, त्यापासून वाचण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, निदान, उपचार, काळजी याबद्दल अनेक तज्ज्ञांनी आजवर लिहून ठेवले आहे. औरंगाबादेत नुकत्याच झालेल्या एका परिषदेत तर देशभरातून आलेल्या 170 तज्ज्ञांनी या विषयावर मंथन केले. 

महिलांमधील हृदयरोगाचे प्रमाण तसे तुलनेत कमी आढळण्याची काही कारणेही आहेत. रजोनिवृत्तीपूर्वी महिलांच्या शरीरात दर महिन्यात होणाऱ्या हार्मोन्सच्या स्त्रावामुळे त्यांच्या हृदयाचे संतुलन चांगले राहते. मात्र मासिक पाळी संपल्यानंतर हा समतोल बिघडतो. 

रक्तवाहिन्या असतात बारीक

पुरुषांच्या हृदयाला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या तुलनेत महिलांच्या हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या बारीक असतात. त्यामुळे त्यांचे आकुंचन पावणे वाढते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका अधिक संभवतो. यावर काय काळजी घ्यावी, याबद्दल तज्ज्ञ सांगतात... 

तपासणीचे तंत्रज्ञान हृदयाला वरदान

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन बुरकुले म्हणतात, "रुग्णाची लक्षणे बघून हार्ट फेल्युअर निदान शक्‍य होत नाही. त्यासाठी इको कार्डिओग्राफी, हृदयाची सोनोग्राफी गरजेची असते. त्यातून निदान केल्यास हृदयाच्या गतीचा व आजाराचे निदान सोपे होते. काही रुग्णांत कार्डियाक एमआरआयची गरज भासते. ही चाचणी खर्चिक असली, तरी काही जणांत ती करणे आवश्‍यक ठरते. शिवाय रक्त तपासण्यांत बायोकेमिकल मार्करमुळेही हार्ट फेल्युअरचे निदान होऊ शकते. अद्ययावत तंत्रज्ञान त्यासाठी लाभदायी ठरत आहे.''

अर्नीमुळे वाढले दोन वर्षांनी आयुष्य

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिल ढाल सांगतात, "या दशकात हृदयरोग फेल्युअरचे प्रमाण वाढले आहे. सर्जरी, प्रोसिजरचे तंत्रज्ञान प्रगत झाले. त्यासोबत हृदयाची गती मंदावणे याबाबतही संशोधन होऊन गेम चेंजर्स ड्रग्स आले. यापूर्वी स्टॅण्डर्ड ड्रग्स होते. त्याचा अधिक काळ फायदा नव्हता. नव्या एआरएनआय (अर्नी) या प्रकारातील औषधोपचाराने 20 टक्के अधिक लाभ होत आहे."

"रुग्णाचे आयुष्यही दोन वर्षांनी वाढल्याचे संशोधनातून समोर आले आहे. या औषधांच्या प्रभावी वापरावर या परिषदेत चर्चा झाली. एसजीएलटी दोन या ऍडव्हान्समधील मधुमेहासंदर्भातील औषधांचा हार्ट फेल्युअरमध्ये जास्त उपयोगी सिद्ध होत असून, त्या औषधी वापरात आल्या असल्या, तरी गाईडलाइन्स अद्याप बाकी आहे. सोबतच सर्वांना चांगला आहारविहार आणि व्यायामाची गरज आहे,'' असे मत त्यांनी व्यक्त केले. 

पेसमेकर हार्ट फेल्युअरसाठी वरदान

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशिष नाबर म्हणाले, "हार्ट फेल्युअरच्या निदानानंतरही पाच वर्षांतील मृत्यूचे प्रमाण पन्नास टक्के आहे. दम वाढणे, पायाला सूज येऊन दगावण्याचा त्यात समावेश आहे. त्यामुळे उपचारात मर्यादा येतात. नाडी जलद होऊन अचानक कोसळणे यावर इलेक्‍ट्रिक शॉक ट्रीटमेंट आजतरी आयसीयू बाहेर शक्‍य नाही. त्यामुळे डिव्हाइस रोपणचा पर्याय आहे."

"कमजोर हृदयाला सावरण्यासाठी पेसमेकर बसवण्यात येते. त्यामुळे ते आत व बाहेरून आधार देत पंपिंग वाढवते. त्यामुळे दम लागणे काहीसे थांबते. हार्ट फेल्युअरमध्ये पेसमेकर ही प्रगती मानली जाते. अचानक मृत्यू येऊ शकतो. त्यामुळे कमजोर हृदयासाठी सीआरटी व हृदय बंद पडल्यास त्याला शॉक देऊन पुन्हा कार्यरत करण्यासाठी आयसीडी हे डिव्हाइस वापरले जाते. त्यामुळे हृदयाचे पंपिंग सुरळीत होण्यास मदत होते. यासाठी तीन ते साडेतीन लाखांचा खर्च असून, ते सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आलेले नाही. शिवाय आयसीडी व सीआरटी असे जोड यंत्रही उपलब्ध झाले आहेत,'' अशी माहिती डॉ. आशिष नाबर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com