जागतिक हस्ताक्षर दिन विशेष : विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षरासाठी पांडुरंग चोपडे यांची धडपड

राजेश दारव्हेकर
Saturday, 23 January 2021

 पंधरा वर्षांपासून कार्यशाळेचा उपक्रम सहा लाख विद्यार्थ्यांना लाभ

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथील हस्ताक्षर तज्ञ पांडुरंग चोपडे हे मागील पंधरा वर्षापासून मराठवाड्यासह विदर्भातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वाचन लेखन कौशल्य सक्षम करण्यासाठी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा हा शैक्षणिक उपक्रम राबवित आहे. आतापर्यंत त्यांनी सहा लाख विद्यार्थ्यांना याचे ज्ञान दिले आहे.

आजपर्यंत शहरासह ग्रामीण भागात सुद्धा हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामध्ये  सहा लाख विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाडीमध्ये वाढ झाली. तसेच २०१७- १८ या वर्षांमध्ये जिल्हा परिषद शिक्षणविभाग अंतर्गत सुंदर अक्षर कार्यशाळा घेण्यात आली त्यामध्ये वर्ग पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये एकूण तीन हजार विद्यार्थी होते तसेच हिंगोली जिल्ह्यातील २२ शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले व विद्यार्थ्यांनी इंग्रजी मराठी दोन्ही हस्ताक्षरात मध्ये अमुलाग्र  बदल घडून आणला. तसेच सन २०१८- १९ या वर्षामध्ये जिल्हा परिषदेतील पंधरा शाळांमध्ये सोळाशे विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षरचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर सुधारण्याचे काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर मध्ये सुधारणा झाल्याचे पाहून तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी  सुद्धा कौतुक केले.

विद्यार्थ्यांचे सुंदर अक्षर सुधारण्यासाठी सुरुवातीस दहा दिवसीय कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. दहा दिवस दररोज एक तास याप्रमाणे वर्ग घेण्याचे सुरू केले. महात्मा गांधीजी म्हणायचे सुंदर अक्षर चांगल्या व्यक्तिमत्वाचा दागिना आहे. म्हणूनच त्यांची प्रेरणा घेऊन श्री. चोपडे यांनी कार्यशाळेला सुरुवात केली. शहरी भागात विद्यार्थ्यांना कोणतेही मार्गदर्शन उपलब्ध होते पण ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ही संधी मिळत नाही. म्हणूनच ग्रामीण भागातील शाळांना भेटी दिल्या हिंगोली जिल्ह्या पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात अशा प्रकारच्या सुंदर अक्षर कार्यशाळा घेतल्या. जिल्हा परिषदच्या शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने हे कार्य केले. 

कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आजही सुंदर हस्ताक्षर यांचा वारसा विद्यार्थ्याना अव्यवहार पणे वाटप करीत असल्याचे पांडुरंग चोपडे यांनी सांगितले. सर्व सुंदर अक्षर कार्यशाळा तीन टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जाते पहिल्या टप्प्यामध्ये अक्षर सुधारणा शिकविल्या जातात. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना अक्षर चांगले काढा असे म्हणतात पण नेमके चांगले काढा म्हणजे काय, खराब हस्ताक्षर म्हणजे कोणत्याचा टोल डावीकडे तर उजवीकडे किंवा खाडातोड , गिचीडमीचीड  याला म्हणतात खराब अक्षर सुंदर हस्ताक्षर म्हणजे मोत्यासारखे अक्षर दोन अक्षरातील अंतर उंची व त्यासोबत प्रमाणबद्धता हे महत्वाचे आहे. त्यासोबत दुसऱ्या टप्प्यात शब्द कौशल्य शब्दांमधील अक्षरांची मांडणी शिकवली जाते तसेच इंग्रजी मधील काही अक्षरे रेषेच्या वर असतात तर काही अक्षरे ५० टक्के उंचीवर घ्यावे लागतात. त्यासोबतच रेषेखालील असलेले अंतर समजून घ्यावे लागते. मराठी  मधील पहिला टप्पा रेषेच्या खाली असणारी अक्षरे दुसरा  टप्पा रेषेला चिपकणारी  अक्षरे यातील प्रमाणबद्धता सांगावी लागते. तिसऱ्या टप्प्यात वाक्य कौशल्य शिकवले जाते त्यामधील प्रत्येक वाक्यातील शब्दातील अंतर मांडणे व शब्द भरून डोक्यावर रेषा माराव्या लागतात. अशाप्रकारचे अक्षर कौशल्य शिकवले जाते.अक्षर सुधार जीवन सुधार हा उपक्रम राबवत असल्याचे श्री. चोपडे यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Handwriting Day Special: For students' beautiful handwriting hingoli news