esakal | मराठवाड्याचा पहिलवान राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Wrestler Rahul Aware

बीड जिल्ह्यातील पाटोद्याचा भुमिपुत्र व कुस्तीपटू राहूल बाळासाहेब आवारे याची क्रीडा प्रकारात मानाचा समजल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नेमलेल्या समितीने शिफारस केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट आहे.

मराठवाड्याचा पहिलवान राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी निवड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटोदा (जि.बीड) : पाटोद्याचा भुमिपुत्र व कुस्तीपटू राहूल बाळासाहेब आवारे याची क्रीडा प्रकारात मानाचा समजल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नेमलेल्या समितीने शिफारस केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट आहे. दरम्यान राहुलला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे कळताच पाटोदा शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. केलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना राहुलचे वडील पहिलवान बाळासाहेब आवारे यांनी यावेळी व्यक्त केली.

वाचा : जैन मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरल्या सहा मूर्त्या, पोलिसांकडून शोध सुरु


आवारे कुटुंब मूळ माळेवाडी (ता.जामखेड, जि.नगर) येथून पाटोद्याला स्थलांतर झाले व तिथेच स्थिरावले. राहुलचे वडील बाळासाहेब आवारे हे एकेकाळी नावाजलेले पहिलवान होते. त्यांना मुळातच कुस्तीची आवड असल्याने त्यांनी आपले दोन्हीही मुल राहुल व गोकुळ यांना सुरवातीपासुनच तालमीची, व्यायामाची सवय लावली. प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी आपली दोन्ही मुलांना याच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कायम प्रोत्साहन दिले. राहुलने पुणे येथे पहिलवान हरिश्‍चंद्र बिराजदार मामा यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे अनेक डावपेच शिकण्यास सुरवात केली व त्याने राज्यस्तरीय तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धेत यशाची शिखरे पादाक्रांत करत त्याने थेट ऑलिंपिकच्या निवड चाचणीपर्यंत मजल मारली. त्या ठिकाणी त्याची ऑलिंपिकची संधी थोडक्यात हूकली होती.

परंतु जिगरबाज राहुलने हार न मानता कठोर मेहनत सुरुच ठेवली व आपल्या गुरु व कुटुंबाचा विश्वास सार्थ ठरवत २०१८ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या व कुस्ती क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकुन देशाचे नाव उंचावले होते. त्याच प्रमाणे राहुल याने अनेक महत्त्वाच्या व मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. यामध्ये २००८ साली कॉमनवेल्थ पुणे -सुवर्ण, २००९ मध्ये ज्युनिअर आशियायी गेम्स -सुवर्ण, याच वर्षी जागतिक ज्युनिअरमध्ये रौप्य, तब्बल ५ वेळा राष्ट्रीय स्पर्धा सुवर्ण, २०११ आशियन चॅम्प. ताश्कंद -कांत्स्यपदकासह अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या पोलिस उपअधीक्षक असलेल्या राहुलची नुकतीच कुस्तीच्या राष्ट्रीय शिबिरासाठी देखील निवड करण्यात आली आहे. राहुलची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचे कळताच पाटोदा येथे फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

(संपादन : गणेश पिटेकर)