लेखन ही नेहमीच दुय्यम दर्जाची कला, नाटककार महेश एलकुंचवार यांचे मत

Atul Deoulgaonkar And Mahesh Elkunchwar News
Atul Deoulgaonkar And Mahesh Elkunchwar News

लातूर  : संगीत जिथे पोचते, तिथे साहित्य किंवा शब्द पोचत नाहीत. त्यामुळे संगीतापुढे लेखन ही नेहमीच दुय्यम दर्जाची कला आहे, असे स्पष्ट मत ख्यातनाम नाटककार महेश एलकुंचवार यांनी गुरूवारी व्यक्त केले. ज्याची व्याख्या करता येत नाही, त्या विश्वापर्यंत गायक आपल्याला घेऊन जातात. लेखकांना तिथंवर जाता येत नाही. केवळ ज्ञानेश्वर, तुकाराम यांना हे जमले. त्यामुळे मराठी साहित्याचा इतिहास ज्ञानेश्वरांपासून सुरू होतो आणि तुकारामांपाशी संपतो, असे मला वाटते. कारण त्यांच्या आसपासही आपल्याला अद्याप पोचता आले नाही, असेही ते म्हणाले.

कोरोना काळात वेगवेगळ्या क्षेत्रातील अभ्यासक, मान्यवर, प्रतिभावंतांशी पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर हे गेल्या काही दिवसांपासून फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. त्यानूसार त्यांनी एलकुंचवार यांच्याशी संवाद साधला. लेखन, दिग्गजांचा सहवास, ‘वाडा चिरेंबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगांन्त’ आदी नाटकांचा प्रवास आदी पैलू एलकुंचवार यांनी उलगडले.

एलकुंचवार म्हणाले, अनुभवासमोर आपण अपुरे पडतो, हे जगातील सगळ्या शहाण्या लेखनांना कळते. अनुभव जितका जास्त, जितका खोल तितके आपण अपुरे पडत जातो. याचे कारण लेखकाजवळ जे माध्यम आहे, ते शब्दांचे आहे. काही अनुभव वैश्विक असतात. ते बुद्धीच्या पकडीच्या बाहेरचे असतात. संवेदनांच्या पातळीवरचे असतात. मनात असा एक अज्ञात प्रदेश असतो, तिथले अनुभव लिहिता येत नाहीत. कारण शब्द माणसांच्या बुद्धीने तयार केलेले असतात. बुद्धी जिथंवर जाते, तिथंवरच शब्द जाणार आहेत. अनुभवांच्या अफाट समुद्रात शब्दांची एवढूशी नाव घेऊन जाता येत नाही. पण, तिथे गाणे जाते. कारण शब्द कृत्रिम आहेत. गाणाऱ्यांचा सूत्र कृत्रिम नसतो. त्याइतकी नैसर्गीक गोष्ट दुसरी कुठलीही नाही. म्हणून मला चांगले गाणाऱ्यांचा नेहमी हेवा वाटतो.

स्वत:ला लेखक-कलावंत म्हणवून घेण्याची आजही माझी हिंमत नाही . कलावंतांपर्यंत झेप घेण्याची ताकद आहे का, याचा विचार केला पाहीजे. मात्र, काहीजण स्तंभलेखन करतात आणि स्वत: सिद्धहस्त लेखक म्हणून मिरवतात. दोन चित्रपटांत किंवा नाटकात काम केले की स्वत:ला कलावंत म्हणवून घेतात. काहींना तर लगेच दिग्गज-प्रतिभावंत म्हटले जाते. ही धोकादायक गोष्ट आहे. लेखकाने रियाज केला पाहीजे. पण रियाज म्हणजे दररोज लेखन, हेच नव्हे. जगणे हेही महत्वाचे आहे. स्वत:ला सतत बौद्धीक पातळीवर वाढवणे, जे माहित नाही ते जाणून घेणे हेही रियाजात महत्वाचे आहे. ज्या लेखनाला अनेकार्थता प्राप्त होते, ते लेखन
चांगले होय, असे एलकुंचवार म्हणाले.

बऱ्याच चांगल्या माणसांचा सहवास मिळाला. रोहिणी भाटे, विंदा करंदीकर, डॉ. श्रीराम लागू, डॉ. रा. चिं. ढेरे, पुलं, सुनीताबाई अशा अनेकांनी जिव्हाळा दिला. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून, त्यांच्या सानिध्यातून सतत काहीतरी नवीन मिळत गेले. त्यांनी एखादे वाक्य जरी बोलले तरी विचारचक्र सुरू व्हायचे. आपण आरपार बदलत आहोत, अशी अनुभूती यायची. या सर्वांसमोर मी छोटा आहे, ही जाणिव मनात कायम असायची. त्यामुळे मी नवनवे शिकत आलो, असेही ते म्हणाले.

पाणी टंचाईने सुरवात
एलकुंचवार हे नागपूरमध्ये राहतात. गप्पांची सुरवात झाली ती नागपूरमधील तापमानावरून. तिथे तापमानाचा पारा ४७ असेल, मराठवाडाही आता नागपूरच्या दिशेने हळूहळू प्रवास करत आहे, असे देऊळगावर म्हणाले. त्यावर ‘नागपूर एका बाबतीत सुखी आहे. इथे पाणी भरपूर आहे. घरोघरी विहिरी आहेत. त्या अजून आटलेल्या नाहीत. २४ तास पाणी आहे’, असे सांगत एलकुंचवार यांनी लातूरातील पाणी टंचाईवर अप्रत्यक्ष भाष्य केले. पाण्याच्या बाबतीत नागपूर सुखी आहे. लातूरात मात्र दहा दिवसांतून एकदा पाणी मिळते, असे देऊळगावकर म्हणाले.


कोरोना आला म्हणून नव्हे तर कोरोना येण्याआधीच भय या विषयावर मी विचार करत होतो. माणसाचे संपूर्ण जीवन भयग्रस्त असते. आपण सुरक्षित का नसतो? कायम कुठले ना कुठले तरी भय घेऊन वावरत असतो. आपण तसे का वावरत असतो, यावर सध्या मी लेखन करत आहे.
- महेश एलकुंचवार, ख्यातनाम नाटककार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com