येळकोट येळकोट जय मल्हार...

चंद्रकांत गुड्ड
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

  • अणदूर येथील खंडोबाच्या यात्रेला सुरवात 
  • भाविकांनी दंडवत घालून केली नवसपूर्ती 
  • खंडोबाची मूर्ती आज मैलारपुरात 
  • करार पद्धतीने देवाची मूर्ती देण्याघेण्याची अनोखी परंपरा 

अणदूर (जि.उस्मानाबाद) : "येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात भंडारा-खोबऱ्याची मुक्त उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत अणदूर (ता.तुळजापूर) येथील खंडोबाच्या यात्रेला बुधवारी (ता.27) सुरवात झाली. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. 

ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा (सटीची जत्रा) बुधवारी झाली. पहाटे चार वाजता काकडा आरतीनंतर परिसरातील भाविकांनी दंडवत घालून आपापले नवस पूर्ण केले. खंडोबाच्या मूर्तीला अभ्यंगस्नान घालून अभिषेक व विविध धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. दिवसभर मंदिरात भाविकांनी तळीभंडार उचलणे, ओटी भरणे, भंडारा-खोबरे उधळणे, लहान मुलांचे जावळ काढणे, लंगर तोडणे, नवीन वारूंना दीक्षा देणे आदी कार्यक्रम पार पडले. सायंकाळी मानाची काठी मिरवणूक, वाघ्या-मुरळी नृत्य, धनगरी ओव्या गायनाचा कार्यक्रम झाला. यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने आले होते. यात्रेनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 

हेही वाचा ग्रामीण भागात गळक्या शाळा अन्‌ पडक्‍या भिंती, सांगा शिक्षण कसे घ्यावे?

कुस्त्यांचे आकर्षण 
दरवर्षी कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते. मागील काही वर्षापासून यात्रा कमिटीच्या पुढाकाराने आयोजित कुस्ती स्पर्धेत देशभरातील नामवंत मल्ल सहभाग नोंदवतात. यंदाही देशपातळीवरील मल्ल सहभागी होणार असून, विजेत्यांना रोख रकमेची मोठी बक्षिसे देण्यात येणार आहेत. जवाहर महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी (ता. 28) दुपारी दोन वाजता कुस्त्यांची दंगल रंगणार आहे. 

हेही वाचा शेतकऱ्यांना तारण योजनेत चार कोटींचा फायदा

देवाचे वेगळेपण 
मंदिरे दोन अन्‌ देवाची मूर्ती मात्र एकच आहे. वर्षभरातील पावणेदोन महिने देवाची मूर्ती मैलारपूर (नळदुर्ग) येथील मंदिरात, तर उर्वरित सव्वादहा महिने देवाच्या मूर्तीचे वास्तव्य अणदूर येथील मंदिरात असते. करार पद्धतीने देवाची मूर्ती देण्याघेण्याची अनोखी परंपरा आहे. जेजुरीसह महाराष्ट्र व कर्नाटकात खंडोबाची बारा मंदिरे आहेत. अणदूर वगळता यापैकी अन्य एकाही मंदिरातील मूर्तीचे स्थलांतर होत नसल्याचे भाविक सांगतात. 

मूर्ती आज मैलारपुरात 
बुधवारच्या यात्रेतील धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर अणदूर येथील मंदिरातील ही मूर्ती गुरुवारी (ता.28) पहाटेच्या सुमारास नळदुर्ग येथील मानकरी मैलारपूर (नळदुर्ग) येथील मंदिरात घेऊन जातात. त्यामुळे गुरुवारपासून ही मूर्ती पावणेदोन महिन्यांसाठी मैलारपूर येथील मंदिरात असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yelkot Yelkot Jai Malhar ...