esakal | Beed : अंबाजोगाईत यंदा साजरा होणार योगेश्वरीचा नवरात्रोत्सव
sakal

बोलून बातमी शोधा

BEED

अंबाजोगाईत यंदा साजरा होणार योगेश्वरीचा नवरात्रोत्सव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई : मागील १९ महिन्यापासून बंद असलेले योगश्वरी मंदिर मंगळवारी (ता.७) दर्शनासाठी खुले होणार आहे. याच दिवशी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. परंतु अद्यापही भक्तांना देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश असणार नाही. या उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम व पूजेचे साहित्यही आत नेण्यास निर्बंध आहेत. त्यामुळे भक्तांना फक्त दर्शन घेता येईल.

राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरीचा हा नवरात्रोत्सव दसरा महोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. योगेश्वरी देवी अंबाजोगाईकरांची ग्रामदैवता व कोकणस्थांची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या कोरोनाच्या महामारीमुळे हे मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर फक्त दोन महिने हे मंदिर खुले झाले होते. मात्र पुन्हा कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने मंदिर बंद करण्यात आले होते. तब्बल १९ महिने हे मंदिर बंद ठेवण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. गुरुवारी हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले होत आहे.

या दिवशी सकाळी नऊ वाजता तहसीलदार विपिन पाटील यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना होऊन दसरा महोत्सवास प्रारंभ होईल. महापूजा व इतर धार्मिक विधी दररोज होतील. परंतु अजूनही कोरोनाचे निर्बंध असल्याने भजन, कीर्तन, संगीत व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यातही प्रवेश नसणार, बाहेरूनच कासवा पासून भक्तांना दर्शनास प्रवेश असेल. याच ठिकाणी देवीची उत्सव मूर्ती आहे. तेथूनच हे दर्शन घ्यावे लागणार आहे. बुधवारी (ता.१३) पूर्णाहुतीचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी (ता.१५) दसऱ्यानिमित्त योगेश्वरीची पालखी मंदिरातच निघेल. बाहेर सार्वजनिक मिरवणूक निघणार नाही.

loading image
go to top