गॅजेटच्या गुंत्यात युवा पिढी

प्रमोद चौधरी
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

तळहाताएवढ्या मोबाईलने तर माणसाच्या मन आणि मेंदूचा ताबा केव्हा घेतला हे कळण्याआधीच माणूस त्यात नको एवढा अडकून पडला आहे; एवढा की जगण्याच्या किमान अत्यावश्यक गोष्टीत मोबाईलचा समावेश करावा वाटण्याइतपत.

नांदेड : महाकाय यंत्रयुगात माणसानं आपल्याला वापरता यावी म्हणून यंत्र बनविली, पण हळूहळू ती यंत्रच माणसाला वापरू लागली. तळहाताएवढ्या मोबाईलने तर माणसाच्या मन आणि मेंदूचा ताबा केव्हा घेतला हे कळण्याआधीच माणूस त्यात नको एवढा अडकून पडला आहे; एवढा की जगण्याच्या किमान अत्यावश्यक गोष्टीत मोबाईलचा समावेश करावा वाटण्याइतपत. परिणामी, आज कुटुंबासोबतचा वेळ, मैदानी खेळ, वाचन आदी गोष्टी हद्दपार झाल्या आहेत. अजूनही वेळ गेलेली नसून पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे मत शिक्षण विस्तार अधिकारी व कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले आहे.

त्या म्हणाल्या की, इवल्याशा गॅजेटमुळे आज सोशल माध्यमाचा अवाढव्य अवकाश व्यापून आणि ढवळून निघालाआहे. माणसांची व्यक्तिगतता एका क्लिकवर बऱ्या वाईट दोन्ही अर्थाने व्हायरल होऊ लागली आहे. समाजमन नावाची गोष्ट पूर्वी वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिनी या मोजक्याच साधनांद्वारे कळण्याचा व कळविण्याचा पर्याय होता; पण आता मोबाईलमुळे व्हाटसअॅप, फेसबुक, ट्विटर अशी अनेक समाजमाध्यमे समांतरपणे नको एवढा हस्तक्षेप करताना दिसत आहेत. सत्य प्रचारकी बनले आहे. चव्हाट्यावरची सोंगं खोटे मुखवटे तयार करण्याला पूरक ठरतायत. एखाद्या ओळीची माथेफिरू पोस्ट दंगे, दहशतवाद माजवायला पुरेशी असते. स्वतःच्या बनावटी फाॅलोअर्सची फौजच्या फौज तयार करता येते, अंगठ्याच्या ढगभर लाईक्सद्वारे आभासी भिंतीवर लाखो येलेचपाटे आणि भाडोत्री भाट पाळता येऊ लागल्याची संतप्त प्रतिक्रियाही सौ. खल्लाळ यांनी व्यक्त केली.  
 
पालकच जबाबदार
मुलांना हवे ते महागडे गॅजेट्‍स त्यांनी मागितले की तत्परतेने पुरविणे, म्हणजे चांगले आईबाप असणे अशी अपरिपक्व धारणा असणारा नवश्रीमंत उथळ पालकवर्ग मोठ्या प्रमाणात दिसतो. आपलं बालपण अभावात गेलं. त्यामुळे मुलांना कशाची कमतरता पडायला नको म्हणून मागणी करण्याआधीच पुरवठा अशा अडाणी समजूतीत मुलं वाढवताना अतिलाड, शिस्तीचा अभाव आणि नकार एेकण्याची, पचविण्याची सवय नसणं अशी बिघडू शकणारी पिढी येऊ घातली जात आहे. मग अशी लाडावलेली मुलं मोबाईलच्या आहारी न गेली तर नवल काय?

मोबाईलचे व्यसन भीषण
केवळ युवा आणि प्रौढच नाही तर लहान मुलं, कुमारवयीन पिढी मोबाईलच्या आहारी जावून आभासी दुनियेत हरवत चालली आहे. तासनतास मोबाईल खेळणारी पोरं, मिनिटभर मेसेजला रिप्लाय आला नाही म्हणून अस्वस्थ होणारी तरुणाई मोबाईल नावाच्या भीषण व्यसनात पुरी अडकत चालली आहे. किंबहुना अडकली आहे.  कुटुंबासोबतचा वेळ, संवाद, मैदानी खेळ, वाचन अशा गुणवत्तापूर्ण गोष्टींची जागा या तळहाताएवढ्या राक्षसाने गिळून टाकली आहे.

भुलाव्यात तरुणाई

कसले कसले जीवघेणे गेम्स, सेल्फीचा अतिनाद, चॅटिंग अशा भुरळ पाडणाऱ्या गोष्टी आता बाजारपेठ बनल्या आहेत. या भुलाव्यात तरुणाईला आकर्षकपणे अडकवून करोडो रुपये कमवण्याचा धूर्त उद्योग नव्या पिढीचं कर्तृत्व गोठवून टाकत असताना हे आपल्या लक्षातही येत नाही, याची खंत वाटते.
- सुचिता खल्लाळ, शिक्षण विस्तार अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The younger generation involved in gadgets