गेवराईत पाय घसरल्याने तरुणाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महादेव संत

गेवराईत पाय घसरल्याने तरुणाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू

गेवराई (जि.बीड) : गेवराई (Gevrai) तालुक्यातील भोजगाव येथे पुन्हा एक दुर्दैवी घटना घडली आहे. गावालगत असलेल्या अमृता नदीवरील पुल वाहून गेल्याने कठड्यावरुन नदी पार करताना गावातील एक पस्तीस वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवार (ता.२६) सकाळी नऊ वाजता घडली आहे. दरम्यान ग्रामस्थांनी नदीकाठी (Beed) मोठी गर्दी केली असून तरुणाचा मृतदेह धोंडराई येथील पुलाजवळ आढळून आला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी नदी पार करण्यासाठी पुलच नसल्याने एका आत्महत्या केलेल्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अक्षरशः नातेवाईकांना खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागली होती. हे विदारक चित्र असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

हेही वाचा: 'पक्षीय भूमिका बाजूला ठेऊन मराठवाड्यासाठी एकत्र येण्याची गरज'

त्यातच रविवारी पुन्हा या पुलावरुन तरुण वाहून जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली असून अजून किती बळी गेल्यानंतर हा पुल करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे गेवराई तालुक्यातील भोजगाव गावालगत अमृता नदी आहे. दरम्यान तळणेवाडी फाटा ते भोजगाव दरम्यानचा अमृता नदीवरील पुल ऑक्टोबर 2019 मध्ये पावसाळ्यात खचला होता. यानंतर याकडे ना प्रशासनाने लक्ष दिले, ना लोकप्रतिनिधींनी. सदरील पुलाची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधीत विभाग तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यातच मागील गतवर्षी ऑक्टोबरमध्ये सतत जोरदार पावसामुळे खचलेला पुल पुरता वाहून गेला. यावेळी रात्री उशिरा गावाकडे परतणारे भोजगाव येथील महादेव संत (वय ४०) यांना पाण्याचा अंदाज न आल्याने खचलेल्या पुलात वाहून गेले होते. यानंतर त्यांचा तब्बल १५ तासानंतर मृतदेह सापडला होता. दरम्यान वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुल दुरुस्तीची मागणी करुन देखील तो दुरुस्ती न केल्यानेच महादेव संत यांचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत पुलावरच ठिय्या मांडला होता.

हेही वाचा: पैठण तालुक्यात दुमजली इमारत कोसळून आजोबा, नात ठार; आजी बचावली

जोपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. यानंतर याठिकाणी आमदार लक्ष्मण पवार, पोलिस, महसूल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होऊन त्यांनी लवकरच पुल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. यानंतर देखील पुल दुरुस्ती न झाल्याने शेवटी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या पुलाची दुरुस्ती केली. मात्र यावर्षी जुलैमध्ये जोरदार पावसाने नदीला पूर आला आणि दुरुस्ती केलेला पुल पुन्हा वाहून गेला. तेव्हापासून ग्रामस्थांची पुलावरील रहदारी बंद असून दळणवळणाचा प्रश्न गंभीर आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी गावातील निकिता दिनकर संत (वय 17) या मुलीने आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जाताना अक्षरशः नातेवाईकांना तो खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागल्याने अखंड महाराष्ट्राचे मन हेलावून गेले होते. त्यातच रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निकिताला सावडण्यासाठी जाण्यासाठी निघालेला गावातील तरुण सुदर्शन संदीपान संत (वय 35) हा पुलच नसल्याने कठड्यावरुन नदी पार करत होता. यावेळी पाय घसरून तो नदीत पडून वाहून गेला त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह धोंडराई येथील पुला जवळ आढळून आला.या पुलाने आतापर्यंत दोन बळी घेतले आहेत. दरम्यान येथील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न बिकट असताना देखील प्रशासन, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. तर अशाप्रकारच्या दुर्देवी घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींविषयी प्रचंड चिड निर्माण झाली आहे.

Web Title: Youth Died In Flood In Gevrai Tahsil Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..