#SaturdayMotivation : स्पर्धा परीक्षेचा सोडला नाद, चहाच्या स्टॉलवर कमावतो 50 हजार!

सुशील राऊत 
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

आधीच शासकीय जागा निघेनात, त्यात मराठा आरक्षणाचाही निकाल लागेना. किती दिवस शिकायचे, असा विचार करून त्याने औरंगपुऱ्यात चहाचे हॉटेल सुरू केले. आज या व्यवसायातून तो 40 ते 50 हजार रुपये महिना कमावतो.

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मनोहर परभणीतून आला होता. इथला खर्च भागवण्यासाठी वर्तमानपत्रेही वाटली. आधीच शासकीय जागा निघेनात, त्यात मराठा आरक्षणाचाही निकाल लागेना. किती दिवस शिकायचे, असा विचार करून त्याने औरंगपुऱ्यात चहाचे हॉटेल सुरू केले. आज या व्यवसायातून तो 40 ते 50 हजार रुपये महिना कमावतो. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षेचा नाद सोडल्याचेही तो सांगतो.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्‍यातील कमलापूर या छोट्याशा गावातील मनोहर विलासराव सुर्यवंशी हा पदवीधर तरूण. घरी आई-वडील, दोन भावंडे आणि 12 एकर शेती. मात्र पाच वर्षांपासून दुष्काळामुळे हाती काहीच लागले नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करून सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी घेऊन त्याने 2017ला औरंगाबाद गाठले. स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली. खाजगी क्‍लासेस लावले. शहरातील खर्च भागवण्यासाठी वर्तमानपत्रे वाटू लागला. पण शासकीय नोकरीच्या जागा निघेनात आणि दिलेल्या परीक्षांत यश येईना, यातून वेळीच सावध होत त्याने चहाचे हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

औरंगपुऱ्यात दुकान किरायाने घेऊन चहाचे हॉटेल सुरू केले. सोबतच स्पर्धा परीक्षेची पुस्तकेही विकायला आणली. हळूहळू व्यावसाय वाढू लागला. लहान भावाला खडकेश्वर येथे वृत्तपत्राचा स्टॉल सुरू करून दिला. त्यातून 10 ते 15 हजार रूपये महिन्याला मिळतात. तर चहाच्या हॉटेलमधून 40 ते 50 हजार रूपये कमाई होत आहे. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षेचा नाद सोडून पूर्णवेळ व्यवसायच करणार असल्याचे मनोहरने सांगितले. 

भावाचे स्वप्न पुर्ण करणार 

"मला स्पर्धा परिक्षा देऊन सरकारी नोकरी करायची होती. परंतु माझे स्वप्न पुर्ण होऊ शकले नाही. लहान भाऊ राम याचे बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न आहे. त्याला लागेल तो खर्च करणार आहे. त्याच्यासोबतच माझेही स्वप्न पूर्ण होईल,'' असे मनोहर म्हणाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth earns 50 thousand on tea stall