
वसमत तालुक्यातील कळंबा पाटीजवळ एका युवकास प्रेयसीसोबत का बोलतो. या कारणावरून डोक्यात लोखंडी एंगल मारुन खून केल्याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध मंगळवारी (ता.२४) गुन्हा दाखल झाला आहे.
हट्टा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील कळंबा पाटीजवळ एका युवकास प्रेयसीसोबत का बोलतो. या कारणावरून डोक्यात लोखंडी एंगल मारुन खून केल्याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध मंगळवारी (ता.२४) गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुंडा (ता. वसमत) येथील ज्ञानेश्वर चव्हाण (वय २१) हा त्याचा मावस भाऊ दिपक हातांगळे (रा.हट्टा) याच्यासोबत राहून झिरोफाटा येथे मोबाईल शॉपीवर काम करीत होता. तो नेहमी गुंडा ते झिरोफाटा मोटारसायकलने ये-जा करत असत. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी (ता.२१) रात्री दुचाकीवर गुंडा येथे जात असल्याचे सांगितले.
मात्र, रात्री तो गावी पोहचला नसल्याने त्याचा नातेवाईकांनी शोध घेतला. तो सापडला नसल्याने हट्टा पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता त्याची दुचाकी हिवरखेडा येथील पुलाखाली दिसल्याने बिट जमादार व पोलिस पाटील यांनी पंचनामा करून दुचाकी ताब्यात घेतली. अधिक शोध घेतला असता सोमवारी (ता.२३) कळंबा शिवारात तुरीच्या शेतात या युवकाचा मृतदेह आढळला. त्याच्यावर धारदार शस्त्राने घाव घातल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, याबाबत सुधाकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद खाडे, याने त्याच्या प्रेयसीसोबत का बोलतो? याचा मनात राग धरुन ज्ञानेश्वर चव्हाण यास विनोद कापुरे (रा. हट्टा), प्रविण अंभोरे (रा. परभणी) या दोघांनी जिवे मारण्याचा कट रचून ज्ञानेश्वरची मोटार सायकल अडवली. त्यास २१ ते २३ नोव्हेंबरच्या रात्री लोखंडी एंगलने डोक्यात व इतर ठिकाणी मारुन त्याचा खून केला. हा प्रकार कोणाला कळू नये, म्हणून त्याची मोटार सायकल हिवरखेडा येथील पुलाखाली पाण्यात टाकली. तर ज्ञानेश्वरचा मृतदेह कळंबा शिवारातील तुरीच्या शेतामध्ये टाकून दिला होता.
या तिघांविरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रभारी सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी यतीन देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक जी.के.मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जी.के.मोरे करीत आहेत.
संपादन - सुस्मिता वडतिले