Ausa News : पोलीस भरतीत वेटिंगवर असल्याने तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

पोलीस भरती होणार नसल्याच्या नैराश्यातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल.
Nagnath Yadav
Nagnath Yadavsakal
Updated on

औसा - हलाखीची परिस्थिती, एक एकर शेतीवर कुटुंबाचा असलेला उदरनिर्वाह, हुशार म्हणून घरच्यांनी पोलीस भरतीच्या तयारीसाठी केलेला खर्च, पाच सहा परीक्षांमध्ये एक दोन गुणांनी दिलेली हुलकावणी आणि शेवटी वेटिंगवर असल्याने आपली भरती होणार नसल्याच्या नैराश्यातून सुसाईडनोट मध्ये आई मला माफ कर, म्हणत एका तेवीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (ता.१२) रोजी औसा तालुक्यातील बोरफळ या ठिकाणी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नागनाथ उर्फ नागेश यादव असे मृत तरुणाचे नाव आहे.

या बाबत मृताच्या नातेवाईकांनी आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोरफळ ता. औसा येथील तरुण नागेश यादव हा घरातील परिस्थिती नाजूक असतानाही पोलीस भरतीची तयारी करीत होता. त्याने अनेक ठिकाणी भरतीसाठी परीक्षा दिली होती. मात्र नेहमी एक किंवा दोन गुणांनी त्याला अपयशी व्हावे लागले होते. शेवटी मुंबई येथे त्याने परीक्षा दिली. या परीक्षेत तो वेटिंगवर होता.

दोन तीन जण वेटिंगवर असल्याने आपण भरती होणार नसल्याची भीती त्याला वाटत होती. त्यामुळे तो गेल्या कांही दिवसापासून उदासच होता. परिस्थिती हलाखीची असतानाही कुटुंबातील लोकांनी आपल्यावर केलेला खर्च वाया जाऊन पोलीस बनण्याचे आपले स्वप्न भंगणार या नैराश्यात तो होता. बुधवारी सकाळी त्याने आईला पण याच भाषेत निराश होऊन बोलला होता. आईने त्याला घाबरू नकोस नाही लागली नोकरी तर कांही फरक पडत नाही.

कष्ट करून आपण आपला उदरनिर्वाह करू, शेळ्या राखतोस तर अजून शेळ्या वाढवू त्यातून आलेल्या उत्पन्नावर जगू असा धीर पण दिला. बुधवारी सकाळी शेळ्या घेऊन तो शेतीकडे उदास मनाने हातात पुस्तक घेऊन गेला. चार वाजता घरी आला. पुन्हा लाईट आल्याने मोटार चालू करतो म्हणून शेताकडे गेला आणि शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

....वडिलांच्या नावातही कागदोपत्री होता बदल...

नागेशच्या शैक्षणिक कागदपत्रांवर आणि आधारकार्डवर वडिलांचे नाव कुठे बापू तर कुठे बापूराव असे होते. त्यामुळे भरती झाल्यावर कागदपत्रांची छाननी करतांना या नावाच्या बदलाची अडचण येऊन आपल्याला डावलले जाऊ शकते अशी शंकाही त्याने अनेकवेळा आईकडे आणि नातेवाईकांकडे बोलून दाखविली होती. वेटिंगवर असल्याने आणि कागदपत्रांवर वडिलांच्या नावात बदल असल्याने तो अधिकच निराश होता. आपले आणि कुटुंबातील सदस्यांचे स्वप्न भंगणार याच काळजीने त्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

....आई मला माफ कर.... माझ्यासाठी खूप खर्च केला...

नागेशच्या खिशात पोलिसांना एक सुसाईडनोट सापडली असून यामध्ये 'आई मला माफ कर, माझ्यावर तुम्ही भरपूर खर्च केला. मात्र माझी पोलीस भरती होईल असे वाटत नाही. मला माफ कर... अशी आपल्या कुटुंबाची माफी मागितली असल्याचे पोलिसांनी आणि नातेवाईकांनी सांगितले. परिस्थितीने गरीब असूनही सरकारी नोकरीसाठी धडपड करणारा एक गुणी तरुण गेल्याने बोरफळ गावावर शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत औसा पोलिसात सदर घटना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com