जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसुचित जमातीकडे

मंगेश शेवाळकर
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

हिंगोली जिल्हा परिषदेतील सध्याची स्थिती लक्षात घेता शिवसेनेचे गणाजी बेले यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

हिंगोली, ता. १९ ः येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसुचित जमातीसाठी राखीव झाले असून जिल्हा परिषदेतील सध्याची स्थिती लक्षात घेता शिवसेनेचे गणाजी बेले यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेमध्ये पक्षीय बलाबलमध्ये शिवसेनेचे पंधरा, राष्ट्रवादी कॉॅंग्रेस बारा, काँग्रेस दहा, भाजप अकरा; तर तीन अपक्ष सदस्य आहेत. काँग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्याचे सदस्यत्व तिसऱ्या अपत्यामुळे रद्द झाले आहे.

जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी झाली आहे. यामध्ये शिवसेनेला अध्यक्षपद व एक सभापतीपद, राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद व एक सभापतीपद; तर दोन सभापतीपद काँग्रेसला देण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्या अडीच वर्षात अध्यक्षपद अनसुचित जाती महिलासाठी राखीव असल्यामुळे शिवसेनेच्या शिवरानी नरवाडे यांना अध्यक्षपद मिळाले. या शिवाय महिला बालकल्याण सभापती म्हणून शिवसेनेच्या रेणुका जाधव, उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे अनिल पतंगे, कृषी सभापती म्हणून राष्ट्रवादीचे प्रल्हाद राखोंडे, समाज कल्याण सभापती म्हणून काँग्रेसच्या सुनंदाताई नाईक; तर शिक्षण सभापती म्हणून काँग्रेसचे संजय देशमुख हे काम पाहात आहेत.
दरम्यान, मंगळवारी (ता.१९) जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसुचित जमातीसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे मागील वेळी ठरल्यानुसार यावेळी शिवसेनेलाच अध्यक्षपद मिळणार असून शिवसेनेकडून गणाजी बेले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून उपाध्यक्षपदासाठी मनिष आखरे यांची वर्णी लागण्याची शक्यता असून सभापतीपदासाठी तिन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या चर्चेनंतरच निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता अध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, राष्ट्रवादीकडून रामराव वाघडव्ह हे अध्यक्षपदाचे दावेदार आहेत. मात्र, नेमकी कोणत्या पक्षांची आघाडी होणार यावरच सर्व चित्र अवलंबून राहणार आहे.

जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी आहे. पुढील काळतही ही आघाडी कायम राहणार आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसारच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, अध्यक्षपद शिवसेनेकडे कायम राहणार आहे.
 संतोष बांगर, आमदार

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या कोणत्या सदस्यांना या वेळी संधी द्यावयाची याबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे यांच्याशी याबाबत चर्चा करूनच निर्णय होईल.
दिलीप चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉॅंग्रेस

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad presidency to Scheduled Tribe