आभासी जगातलं 'ती'चं बोलणं

आशा गाडगीळ
गुरुवार, 30 मार्च 2017

"व्हॉट्‌सऍप'वरून स्त्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्या आभासी जगात व्यक्त होतात; पण हा संवाद त्यांना त्यांच्या वास्तव जगात अधिक सुंदर करीत असतो. ती अधिक बोलकी होऊ लागली, सर्जनशील होऊ लागली, स्वीकारशील होऊ लागली.

परवा माझ्या मैत्रिणीचा "काय म्हणता?' (व्हॉट्‌सऍप) वरून एक संदेश आला. "आयुष्य म्हणजे एक शाळा असते. त्या शाळेतले संताप, अस्वस्थता, हट्ट, नैराश्‍य, काळजी, कटकटी हे सर्व विद्यार्थी हजर असतात. आणि आनंद, शांतता, समाधान हे गैरहजर असतात,' असं काहीसं त्या संदेशात होतं.

"व्हॉट्‌सऍप'वरून स्त्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्या आभासी जगात व्यक्त होतात; पण हा संवाद त्यांना त्यांच्या वास्तव जगात अधिक सुंदर करीत असतो. ती अधिक बोलकी होऊ लागली, सर्जनशील होऊ लागली, स्वीकारशील होऊ लागली.

परवा माझ्या मैत्रिणीचा "काय म्हणता?' (व्हॉट्‌सऍप) वरून एक संदेश आला. "आयुष्य म्हणजे एक शाळा असते. त्या शाळेतले संताप, अस्वस्थता, हट्ट, नैराश्‍य, काळजी, कटकटी हे सर्व विद्यार्थी हजर असतात. आणि आनंद, शांतता, समाधान हे गैरहजर असतात,' असं काहीसं त्या संदेशात होतं.

मी तो संदेश लगेचच पुसून टाकला. तिलाही कळवलं, आयुष्यात काय, आपल्या वर्गातही किती प्रकारचे विद्यार्थी होते; पण आनंदानं आपण शिक्षकी पेशा स्वीकारला. तसंच आयुष्याचं असतं. आपलं आयुष्य तरी काय वाईट आहे? सुखात आहोत की! "काय म्हणता?' मधून वेगवेगळे संदेश येत असतात. विचारांना मोकळीक देण्यासाठी, चांगलं पाहिलं असलं, ऐकलं असलं तर ते शेअर करण्यासाठी, ज्ञानात भर घालण्यासाठी, उत्तम व्हिडिओ, सर्जनशीलतेचा आविष्कार, कधी मदतीचा हात देण्यासाठी, कधी घेण्यासाठी, कधी आनंदाचा बूस्टर डोस देण्यासाठी अशी अनेक कारणं असतात.

काही दिवसांपूर्वी माधवी कुंटेनं छायाचित्र आणि एक कविता पाठवली. पार्लेपण जपणार त्यांचं ते छोटसं घर पुन्हा विकसित केलं गेलं. आता तिथे उंच इमारत उभी राहिली आहे. गेली तीन-चार वर्षे इमारतीच्या बांधणीमुळे ती या वातावरणापासून दूरच होती आणि आली तीदेखील उंच इमारतीत. इमारत तिला परकीच वाटत होती; पण खिडकीतून दिसणाऱ्या आम्रतरुनं तिला खुलवलं, जुन्या आठवणींत रमवलं. ते झाड कितीतरी वर्ष त्या घराची संगतसोबत करत होतं, मोहरत होतं. कैऱ्या देत होतं आणि मधे काही वर्ष अगदी गप्पगप्पच झालं. थोडी फार हळहळ वाटली. त्याच्या फुलण्याच्या, फळण्याच्या आठवणी काढल्या. नंतर आठवणी काढणारी माणसंही हरवली. घराच्या नूतनीकरणात ते झाड तोडलं जाईल असं वाटलं होतं; पण बिल्डर पर्यावरणप्रेमी निघाले आणि त्यांनी ते झाड वाचवलं. झाडानंही आभार मानण्याची अभिनव पद्धती वापरली. चक्क मोहरून उठलं आणि जानेवारीत कैऱ्यांमागे पानं दडली.

कैऱ्यांनी लगडलेल्या त्या झाडाला पाहून तिला चार ओळी सुचल्या आणि छायाचित्रासोबत चार ओळी पाठवल्या,
"आम्रतरुच्या वस्त्रावर या
जडाव पाचू लखलखती,
विशाल हिरव्या झुंबरातुनी
गोलक मोहक झगमगती'

असे संवाद, अशा घटना मनाला उभारी देतात. हा संवाद जीवनातलं एक रहस्य सांगून गेला. त्या झाडानं दुःख किती सहन केलं असेल, फळतफुलत नाही म्हणून मनातल्या मनात रडलं असेल, बांधकामाच्या वेळी, रेताड, सिमेंटच्या पर्यावरणात राहिलं असेल, पण पुन्हा पालवी फुटली, फुललं, फळलं. स्वतःसाठी नव्हे पाखरांसाठी, माणसांसाठी. तसं पाहिलं तर प्रत्येक घरात कसलं ना कसलं दुःख असतंच. अनेक शतकांपूर्वी गौतम बुद्धांनी सांगितलेली "सुखी सदऱ्या'ची गोष्ट वारंवार आपल्याला आठवण करून देते. अजूनही प्रत्येकाचा शर्ट कुठे ना कुठे तरी फाटलेला असतो. कधी छिद्ररुपी किंवा खूप; पण फाटतोच. त्याचं दुःख करायचं नसतं.

दर रविवारी सकाळी मला एका विद्यार्थिनीचा सुप्रभात म्हणून संदेश येतो. संदेश फुलांबरोबर येतो. मला ती फुलं आनंद देतात. आठवड्याची सुरवात छान होते. विद्यार्थ्यांशी मैत्री ताजी राहते. आपल्या भोवतालची सारी प्रसारमाध्यमं आपल्याला आनंदीत करायचा त्यांच्या परीनं प्रयत्न करत असतात. प्रत्येक पिढीच्या आवडी बदलत असतात; पण तरीही सत्यं-शिव-सुंदरम्‌ जे खरं आहे, पवित्र आहे, ते कोणत्याही काळात सुंदरच भासतं. आपण त्यातील विचार निवडताना अधिक सजग व्हायला हवं.
हल्ली प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला जीवनकौशल्याची ओळखच नव्हे; तर रुजवणूक भरून घ्यायची असते. हे केवळ महाराष्ट्र सरकारचे शैक्षणिक धोरण नाही तर, मुलांच्या मनाच्या आणि शरीराच्या योग्य मशागतीसाठी जागतिक आरोग्य संघटनेनं दहा जीवन कौशल्यांवर विशेष भर दिला आहे. त्यातील एक महत्त्वाचं म्हणजे निर्णयक्षमता, निवडक्षमता. आयुष्यातील अडचणींवर लक्ष केंद्रित करून आयुष्यावर काजळी चढवायची, की आयुष्यात सुंदर गोष्टी असू शकतात यावर विश्‍वास ठेवून आयुष्य हसरं करायचं?

आता हसण्याचाच संदर्भ आला आहे, म्हणून एका विनोदाबद्दल बोलू या. सव्वीस जानेवारीला हा विनोद एका सर्जनशील स्त्रीनं मला पाठविला. एका कागदावर पावट्याच्या दोन शेंगा चिकटवल्या होत्या. त्या कोंबड्या वाटत होत्या आणि एकीच्या बाजूला आठ एक पावटे पिल्लांसारखे चिकटवले होते, तर दुसरीच्या शेजारी दोनच पावटे.
जास्त पिलावळ असलेली कोंबडी दुसरीला विचारते, ""अय्या, दोनच.''
दुसरी कोंबडी - ""हो, माझं माझ्या देशावर प्रेम आहे.''
सव्वीस जानेवारीला लोकसंख्येचा मोठा प्रश्‍न "ती'नं आपल्या परीनं मांडला होता. मी तिच्या सर्जनशीलतेचं शब्दांनीच कौतुक केलं नाही तर, एक छोटीशी भेट नेली. त्या छोट्याशा भेटीनं तिला फुलवत तिच्या सर्जनशीलतेला जागवलं.
सामान्य स्त्रियांचं "काय म्हणता'चं जग हे असं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aasha gadgil write article in muktapeeth