वेदना अंतरीची

आशा माहुले
गुरुवार, 26 एप्रिल 2018

एकटेपणाची आग त्रासदायक असते. आपण कुणाला तरी हवे आहोत, ही भावनाच मनाला उभारी देणारी असते. पैसाअडका नव्हे, तर मायेचा स्पर्श माणसाला हवा असतो.

एकटेपणाची आग त्रासदायक असते. आपण कुणाला तरी हवे आहोत, ही भावनाच मनाला उभारी देणारी असते. पैसाअडका नव्हे, तर मायेचा स्पर्श माणसाला हवा असतो.

काही दिवसांपूर्वी अचानक पाय घसरून स्वयंपाक घरात पडले. नशीब हाड मोडले नाही. पण, गुडघ्याच्या आणि कमरेच्या स्नायूंना जबरदस्त दुखापत झाली. वाकणे, चालणे, काम करणे अवघड झाले. घरात आम्ही दोघेच राहत असल्यामुळे असले परावलंबी जगणे आले, की अंगावर काटा येतो. पण, परिस्थितीपुढे माणूस हतबल होतो, वेळ निभावून न्यावीच लागते. डॉक्‍टरांनी पंधरा दिवस "बेड रेस्ट' सांगितली. फिजिओथेरपी, घरच्या घरी उपचार असल्यामुळे हुश्‍श झाले. तरी, मानसिक आणि शारीरिक त्रास नको होतोच. अशावेळी मुले लांब असल्याची जाणीव त्रास देते.
माझ्या मैत्रिणीचाच मुलगा अतुल फिजिओ थेरेपिस्ट आहे. त्याचे क्‍लिनिक लांब असले, तरी तो काही रुग्णांसाठी घरी जातो. त्याने घरी येऊन व्यायाम करून घेण्याचे कबूल केले. बाहेरून डबा आणणे आणि उरलेली बाकीची कामे मिस्टर मनापासून करीत होते. अशा वेळी जाणवते, शेवटी दोघेच एकमेकांना असतो.

अतुल रोज संध्याकाळी यायचा, तास-दीड तास गुडघ्याचे आणि कमरेचे व्यायाम घ्यायचा, त्याचा प्रेमळ स्वभाव आणि मनापासून धीर देणे माझ्या वेदना सुसह्य करीत होता. जाता जाता रोज सांगून जायचा, "काळजी करू नको मावशी, मी आहे.' धीराचे शब्द. एकदा अतुल आला, गप्पा मारत बसला. एक-एक किस्से सांगून कधी हसवत होता, तर कधी मन हळवे होत होते. त्याच्या एका अशाच आजोबा रुग्णाविषयी बोलला. ते बरेच आजारी होते. त्यांचीही मुले परदेशी होती. म्हणाला, ""मावशी, मी फिजिओ थेरेपीस्ट असलो, तरी व्यायाम घेताना वेगळ्या भूमिका बजावाव्या लागतात. कधी मुलगा, तर कधी मित्र, तर कधी डॉक्‍टर. व्यवसाय म्हणून बघितले, तरी त्यात प्रेम, आपुलकी जोडावीच लागते. मग रुग्ण उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देतो. कधी कधी अगदीच अगतिक झालेली व्यक्ती उपचाराला नीट प्रतिसाद देत नाही, तेव्हा खूप प्रेमाने त्यांचे घरचे होऊन बोलावे लागते. त्या वेळी जाणवते ती वेदना शारीरिकपेक्षाही मानसिक असते. वेदना सहन होण्यापलीकडे असतात, तेव्हा कोणतेही तत्त्वज्ञान उपयोगी पडत नाही, कुणी कितीही उपचार सांगितले, तरी विचारांनी आणि मनाने खचतच जातो, त्या वेळी उपयोगी पडतात फक्त आणि फक्त प्रेमळ शब्द. तेही अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीचे.

आपल्या आयुष्यात आपण कुणाला तरी हवे आहोत, ही जाणीव मन प्रसन्न करते, त्या आपल्या माणसांकरिता आपण जगावे, ही उमेद औषधांचा "पॉझिटिव्ह' परिणाम करतात, कुठेतरी अंतर्मनात एखादा आशेचा किरण असतो आणि तेवढ्या उजेडातही पुढच्या आनंददायी आयुष्याचे स्वप्नरंजन करायला लागतो. पण, चुकूनही सेवा करणाऱ्याच्या चेहऱ्यावर कंटाळा किंवा वैताग दिसला, तर आजारी माणूस आतून खचतो, त्या वेळी आपली सेवा करणाऱ्या व्यक्तीविषयी प्रेम असले, तरी त्याच्या कर्तव्यात ते मोडते, इतकी वेदनादायी व्यक्ती अगतिक झालेली असते. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी नुस्ती असून चालत नाही, तर कुठे तरी स्पर्शात आणि शब्दांत ती दिसायला हवी असते, अशा वेळी पैसाही काम करू शकत नाही, फक्त तुम्ही आमच्यासाठी खूप काही आहात आणि तुम्ही आम्हाला हवे आहात, या जाणिवेसह शब्द गरजेचे असतात. प्रत्यक्ष हजर असून, आपुलकीचा स्पर्श मिळाला, तर वेदना अजून लवकर कमी होतात. जगातली कितीही श्रीमंत व्यक्ती असली, तरी शारीरिक वेदना ज्याच्या त्यालाचा सहन कराव्या लागतात, त्या कुणास हस्तांतरित करता येत नाहीत, फक्त मायेच्या शब्दांनी त्याची तीव्रता कमी होते.

एक आजी-आजोबा आहेत. पैसा, घरदार सगळे काही आहे, समाजात मानाचे स्थान आहे, मित्र परिवारही बराच आहे. मुलांना उच्च शिक्षित केले. काळानुरूप नोकरी निमित्ताने परदेशी स्थायिक झाले. आजी-आजोबांना खूप आनंद झाला. आजी-आजोबा एकमेकांना खूप जपतात, सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात, पण सणावाराला उदास होतात, प्रकृती बिघडली की दोघे घाबरेघुबरे होतात, सतत कुणाशी तरी संपर्क ठेवून असतात, कुणी भेटलेच, तर खूप छान असल्याचे दाखवतात, पण एखाद्या क्षणी त्यांच्या डोळ्यांत जे एकटेपण दिसते ते त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमत होत नाही, पण त्यांना येत जा कधीतरी भेटायला, या शब्दामागे लपलेले एकटेपण हृदय पिळवटून काढणारे असते. आम्हीही बोलतो. काळजी करू नका, आम्ही आहोत. शब्दांचे बुडबुडे, दुसरे काय? निघताना अगदी सहज विचारतात, आज फोनला रेंज नाही का, की नेट बंद आहे? त्यांची अधीर नजर आणि कान मुलांचे शब्द ऐकायला आतुर असतात, हे सहज कळते. अशा सगळ्या रुग्णांसाठी मी त्यांचा मुलगा जास्त होतो आणि डॉक्‍टर कमी, पण माझेही मन सैरभैर होते, कारण रक्ताच्या नात्याची ओढ काही वेगळीच असते. फक्त देवाकडे प्रार्थना करतो, अशा व्यक्तीसाठी अगदी डोळ्यांत पाणी आणून!''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aasha mahule write article in muktapeeth