रुग्णालयाचं देणं!

आश्‍नी अभिजित जोशी
शनिवार, 20 जानेवारी 2018

रुग्णालयांविरुद्ध खूप बोललं जातं. नकारात्मकच जास्त. पण प्रत्येकवेळी खरंच तशी परिस्थिती असते? कित्येक सकारात्मक गोष्टीही रुग्णालयांत होतच असतात. डोळसपणे त्याही टिपल्या पाहिजेत.

रुग्णालयांविरुद्ध खूप बोललं जातं. नकारात्मकच जास्त. पण प्रत्येकवेळी खरंच तशी परिस्थिती असते? कित्येक सकारात्मक गोष्टीही रुग्णालयांत होतच असतात. डोळसपणे त्याही टिपल्या पाहिजेत.

शिक्षक आणि डॉक्‍टरांना समाजात वेगळा सन्मान मिळायला हवा; परंतु अतिशय संवेदनाशील अशा या दोन्ही क्षेत्रांविषयी कमालीची व्यावहारिकता आणि असंवेदनाशील मानसिकता झाल्यामुळे एकूणच समाजव्यवस्था अस्वस्थ झाल्यासारखी वाटते. सामाजिक उद्रेकाच्या बातम्या ऐकू येतात. काहीही चौकशी न करता डॉक्‍टरांना मारहाण, रुग्णालयाचं नुकसान याच्या बातम्या ऐकू येतात. डॉक्‍टरांकडून फसवणूक झाल्याच्या, पैशांसाठी उपचार थांबवण्यात आल्याच्या, विनाकारण शस्त्रक्रिया केल्याच्या तक्रारीही ऐकू येतात. डॉक्‍टर व रुग्णालयं यांच्याविषयी नकारात्मक गोष्टीच अधिक ऐकायला मिळत असतानाच मला, आम्हाला आलेला अनुभव खूप वेगळा आहे.

माझे वडील हृदरोगाचे रुग्ण असल्यामुळे हृदरोगतज्ज्ञ डॉ. नितीन पत्की यांच्याकडे गेली सात-आठ वर्षं उपचार घेतात. डॉ. पत्की हे अत्यंत निष्णात, शांत आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व! वागण्यात नम्रता आणि बोलण्यात मृदुता. त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या कुटुंबात कमालीचा आदर. मध्यंतरी माझ्या वडिलांना थोडा त्रास होत असल्याचं जाणवताच त्यांनी डॉ. पत्की यांना त्याची कल्पना दिली. डॉ. पत्की यांनीही वडिलांच्या सर्व तपासण्या केल्या, स्ट्रेस टेस्ट केली आणि अँजिओग्राफी करण्याचं ठरवलं. आमच्या दृष्टीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुढचे उपचार करणं सोयीचं ठरणार होतं. कारण हे रुग्णालय आमच्या सर्वांच्याच परिचयाचं, विश्‍वासाचं अन्‌ सोयीचं होतं. आधुनिक सोयींनी परिपूर्ण, कमालीची स्वच्छता, नम्र, मृदुभाषी स्टाफ- डॉक्‍टर, डॉक्‍टरांचे सहायक, अगदी परिचारिका, मदतनीस यामुळे हे रुग्णालय आपलंसं वाटतं. म्हणून या रुग्णालयामध्येच पुढील उपचार करण्याचं ठरवलं. पण आमच्यापुढे एक अडचण आली. कारण डॉ. पत्की हे मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित नव्हते. आता काय करायचं, असा प्रश्‍न उभा राहिला. आम्हाला याच रुग्णालयात; परंतु आमच्या डॉक्‍टरांकडून उपचार हवे होते. रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णाच्या मागणीला प्राधान्य दिलं अन्‌ या रुग्णालयात येऊन डॉ. पत्कींनी वडिलांची अँजिओग्राफी केली. त्यामध्ये "ब्लॉक' दिसल्याने डॉक्‍टरांनी अँजिओप्लास्टी करण्यासाठी आम्हाला सर्व कल्पना देऊन परवानगी मागितली. डॉक्‍टरांवर आमचा पूर्ण विश्‍वास असल्याने डॉ. पत्कींनी वडिलांची लगेचच अँजिओप्लास्टी केली. दोन दिवसांनंतर डॉ. पत्कींनी लगेचच घरी जाण्यास परवानगी दिली. वडिलांचं वय, त्यांना आधीपासून होणारा त्रास लक्षात घेता, "अंडर ऑब्झर्वेशन' म्हणून अजून दोन-तीन दिवस रुग्णाला रुग्णालयात ठेवता आलं असतं. पण रुग्णाला रुग्णालयात ठेवण्याची गरज नाही, हे लक्षात येताच डॉक्‍टरांनी आणि रुग्णालयानेही लगेच रुग्णाला घरी पाठवलं. वैद्यकीय विमा (मेडिक्‍लेम) असल्याने सर्व बाजूंची पूर्तता त्वरित करण्यात आली आणि आम्ही घरी आलो.
खरी गंमत यानंतर घडली.

यानंतर तीन-चार दिवसांनी रुग्णालयामधून मला फोन आला, की "तुमच्या बिलातील क्‍लेमची काही रक्कम परत द्यावयाची आहे. त्या रकमेचा धनादेश काढून ठेवण्यात आला आहे. आपण तो धनादेश आपल्या सवडीने घेऊन जावा.' मला आणि घरातील सर्वांनाच हे खरं वाटेना किंवा असतील किरकोळ हजार-दोन हजार रुपये असा विचार करून सात-आठ दिवसांनी रुग्णालयात गेले. मला त्वरित धनादेश देण्यात आला. विलंबाबद्दल आणि तसदीबद्दल मला "सॉरी' म्हणण्यात आलं. असा एक सुखद अनुभव घेत मी धनादेशावरील रक्कम पाहिली अन्‌ मला धक्काच बसला. धनादेशावर चौसष्ट हजार रुपयांपेक्षा जास्तच रक्कम लिहिलेली होती. मी संबंधित लेखा कर्मचाऱ्यास भेटून विचारलं, तर त्याने सांगितलं, ""हो! ही रक्कम बरोबर आहे आणि हा धनादेश अजून तुम्ही नेला नव्हता, म्हणून उद्या घरी नेऊन देण्याच्या सूचना होत्या.'' आता आणखी चकित होण्याची वेळ होती.

रुग्णालयं रुग्णांना किती खर्चात पाडतात, विनाकारण बिलं वाढवत नेतात याविषयी ऐकलं होतं. पण रुग्णालयाचं देयक दिल्यानंतर एवढी मोठी रक्कम परत करणारं रुग्णालय सापडलं होतं. रुग्णालयं विनाकारण खर्चात पाडतात हा ऐकीव अनुभव दोन वेळा खोटा पडला होता. पहिल्यांदा रुग्णाला विनाकारण रुग्णालयात अडकवून ठेवलं गेलं नाही तेव्हा आणि आता उर्वरित मोठी रक्कम परत केली तेव्हा. पारदर्शी असा हा कारभार, आपुलकीचं बोलणं रुग्णालयाविषयी सकारात्मक बाजू दाखवणारं ठरलं. वाटलं, एखाद्यावेळी कुठच्याही रुग्णालयात काही घडलं, तर आपल्या रुग्णाच्या बाबतीत नाजूक मनःस्थितीतही स्वतःवर विवेकाने ताबा मिळविला पाहिजे. एकूण परिस्थितीचं अवलोकन करून परिस्थिती हाताळायला हवी, असं मला वाटलं. उद्रेकाने विध्वंस करता येईल, अविचारातून तोडफोड करता येईल; पण तसं करून मनाला शांतवणं सोपं नाही. त्यामुळे होणारे परिणाम भयानक असतात याची जाणीव ठेवायला हवी.

रुग्णालयात शेकडो रुग्ण असतात. त्या प्रत्येकाची तेवढ्याच मेहनतीने आणि जबाबदारीने काळजी घ्यावी लागते. डॉक्‍टरांना प्रचंड ताण असतो. मनुष्याच्या आयुष्याशी संबंध असताना डॉक्‍टरांची मनःस्थिती किती नाजूक, तणावाखाली असेल, याचा विचार डॉक्‍टर हाही एक माणूस आहे, याचं भान ठेवून व्हावयास हवा. डॉक्‍टरांवर, रुग्णालयांवर विश्वास टाकायला हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aashni joshi write article in muktapeeth