मनातल्या मोराची त्या मोराशी दृष्टभेट होईल का?

अ‍ॅड. विलास पाटणे
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

लख्ख चांदण माडाच्या झावळांमधून झिरपत नदीत पडत आणि सारा आसमंत चांदण्यात न्हावून निघतो. जणू निसर्गातल सार सौंदर्य आणि आनंद आपल्या कवेत येत. छोट्याश्या होडीतून वल्ही मारत केलेला फेरफटका आनंदनिधान असत. तुंबड म्हणजे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्न.

बाळानं आपल्या आईच्या कुशीत शांतपणे झोपावं तसं तुंबाड जगबुडी नदीच्या काठावर विसावलं आहे. खेडहून नागमोडी वळण घेत निघालेली जगबुडी तुंबाडहून पुढे दाभोळला समुद्राला मिळते. संथ काळेशार पाणी, पाण्यात पाय सोडून बसलेले मचवे, हिरवेगार डोंगर, पिवळीधम्मक शेती, खाजणात विसावलेल्या सुसरी मगरी, भारभूत होवून हेलकावणारे माड यातून सर्वात प्रथम दिसतो टेकडीवरचा सवणसचा दर्गा. एक वळण घेतलं की समोर दिसत ते निसर्गातील सार सौंदर्य आपल्या अंगणात घेवून उभं असलेलं ‘तुंबाड’.

1987 साली श्रीनांची ‘तुंबाडचे खोत’ ही कादंबरी तुंबाडलाच प्रकाशित झाली. विंदा करंदीकर, ना.सं. इनामदार, सुभाष अवचट आदी साहित्यिक प्रकाशन समारंभाला हजर होते. जवळजवळ सर्वच साहित्यिकांना तुंबाडची अनिवार ओढ आहे. माधव मनोहरांपासुन ते विश्वास पाटील मधु मंगेश कर्णिकापर्यंत सार्‍यांनी तुंबाडला हजेरी लावली आहे. तुंबाड हे माझ्या आयुष्यात जीव जडलेलं गाव. माणसांचे ऋणानुबंध जसे माणसांशी जुळतात तसे गावाचे. तुंबाडला जायचे म्हणजे पौर्णिमा हवी. लख्ख चांदण माडाच्या झावळांमधून झिरपत नदीत पडत आणि सारा आसमंत चांदण्यात न्हावून निघतो. जणू निसर्गातल सार सौंदर्य आणि आनंद आपल्या कवेत येत. छोट्याश्या होडीतून वल्ही मारत केलेला फेरफटका आनंदनिधान असत. तुंबड म्हणजे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्न.

धक्क्यावरुन अंगणात शिरतो आणि क्षणार्धात आपल्या लक्षात येत या अंगणातच सार्‍या घराचा जीव आहे. सभोवताली झाडांची गर्द सावली, गार मंद वारा, पारिजातकाचा दरवळलेला मंद सुवास, मध्येच पिकलेल्या आंब्याच्या झाडांना झालेला आवाज या सार्‍या नैसर्गिक वातावरणात आपण ताजेतवाने, प्रसन्न होतो. संध्याकाळी औदुंबारापाशी लावलेला दिवा वातावरणातील मांगल्य व पावित्र्याची जाणीव करु देतो. घराच्या मागील बाजूने डोंगराच्या दिशेने जाणार्‍या लाल मातीच्या वळण घेतलेल्या चढणीवरुन केलेली भटकंती तुम्हांला वेगळ्याच दुनियेत घेवून जाते. गर्द झाडीतून येणार्‍या कोवळ्या उन्हाची तिरीप तुमच्या गात्रात उर्जा निर्माण करते. जाळीतील करवंद, काजूची बोंड, पिकलेल जांभूळ आणि गाभूळलेली चिंचेची चव घेत वार्‍याच्या मंद झुळकीबरोबरची भटकंती कधी संपू नये असं वाटत. सार कस स्वच्छंद, मनसोक्त.

नदीकाठच्या शेवरीच्या फुलांचा नदीच्या पाण्यात सडा पडतो आणि “लव्हेंडर” रंगाची फुलांची नदीने पांघरलेली शाल आपण अनुभवतो तेव्हा आपल्याला काश्मिर खोर्‍याचा भास होतो. अधूनमधून दिसणारे लाव्हा, ससाणा, धनेश पक्षी या रानसौंदर्याची नजाकत आणखीनच वाढवतात. तुंबाडमधील पहाट शुचिर्भूत, सकाळ प्रसन्न, संध्याकाळ रमणीय तर रात्र काहीशी गूढ, गंभीर आणि अनाकलनीय..... पावसाळ्यात प्रचंड पुरामुळे “जगबुडी” आक्राळविक्राळ रुप धारण करते आणि आपलं नांव सार्थ करते. एरव्ही जगबुडीचा प्रवाह शांत, समजूतदार. जगबुडीत यथेच्छ डुंबाव, पोहाव. धक्क्यावरुन मारलेला सूर नदीचा तळ दाखवितो. जगबुडीच्या काठावर खाजणात सुसरी, मगरी विसावलेल्या असतात. एव्हाना भोरप्यांनी होडीतून आणलेले ताजे फडफडीत मासे आपली वाट पहात असतात.

भल्या पहाटे कोकीळेच्या आवाजाने पक्षांच्या किलबिलाटात आपल्याला जाग येते आणि धुक्याने आच्छादलेल्या आसमांत आपण धक्क्यावर उभे असतो. आपल्या नजरेतून हिरवाई झिरपत असते. आपलं मन अवघडलेल असत तेव्हा कशाचच भान रहात नाही. अवघी सृष्टी आपल्या नजरेत असते. धक्का सुटला तरी “तुंबाड” एव्हाना मनात खोलवर रुतलेलं असतं. अनुभवलेले हे सारे क्षण आयुष्य पुढे नेतात, हेलावून टाकतात. एवढ्यात समोर थुईथुई नाचणारा ‘मोर’ दिसतो. मनातल्या मोराची त्या मोराशी दृष्टभेट होते.

‘तुंबाड’ च्या रस्त्याचं उद्घाटन आज झाले. कै. बाबल्याशेट वरवाटकर यांनी उराशी बाळगलेल स्वप्न सत्यात येईल. भास्करशेठ जाधव यांच्या प्रयत्नाने रस्ता मार्गी लागला. स्वागत व आनंद आहे. पण मनाला चूटपूट लागली आहे. ‘निवांत’ तुंबाड कॅनव्हासवरुन निसटल्याचा भास होतो आहे. दोन चार दिवस का होईना आपल एक लहानस शांत, निवांत जग असाव अस वाटतं. त्यात कमालीच अप्रुप आणि निखळ आनंद आहे. शहरातील अतिरिक्त गरज नसणार्‍या सोईसुविधा माणसाला परावलंबी बनवितात. निसर्गापासून दूर नेतात. त्या जगण्यात सहजता नाही, आनंदही नाही, अशावेळी ‘तुंबाडची’ ओढ लागते. प्रश्‍न पडतो मनातल्या मोराची त्या मोराशी दृष्टभेट होईल का?

Web Title: Ad. Vilas Patnae article