जपानमधील वारी

अद्वैता उमराणीकर
शनिवार, 7 जुलै 2018

जपानमध्ये देवाला भेटायला जायची वाट श्रमदानातून जाते, हे कळले तो क्षण वेगळा.

अहिल्यादेवी शाळेतील विद्यार्थिनींसंगे जपानच्या वारीला गेलो. जपानची तीन वारसास्थळे तीन ठिकाणच्या पर्वतरांगांवर स्थिरावली आहेत. त्यातल्या कुमानो कोदी या वारीला आम्ही गेलो. या देवळांना श्राईन असे म्हणतात. प्रत्येक देवळाची धाटणी सारखीच. लाकडांमधील भक्कम बांधणी, दारावर घंटा आणि कमरेत वाकून देवाला विनम्रतेने शरण जाण्याची पद्धत. मी उत्सुकतेने बंद दाराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा ओकायामाच्या अधिकाऱ्याने सांगितले, ‘गाभारा रिकामा आहे’. कुसुमाग्रजांची देव सोडून गेलेल्या गाभाऱ्याची कविता आठवली. तेवढ्यात तो पुढे म्हणाला, ‘‘देव नाही देव्हाऱ्यात. जपानमध्ये बौद्ध धर्म आहे. गौतम बुद्धांनी मूर्ती पूजेच्या विरोधातच हा धर्म स्थापन केला होता. त्यांचे विचार रोजच्या जगण्यात आणणे म्हणजेच त्याचा धर्म स्वीकारणे. जपानमध्ये कोणताही धार्मिक उत्सव करत नाहीत. सर्वश्रेष्ठ निसर्गालाच देव मानून त्याची चोवीस तास पूजा करतो. आपले जगणे हीच वारी आणि वारीला जाणे म्हणजे हे जे सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत, ती आहेत तशी जपणे.’’

कुठलीही पाटी, फ्लेक्‍स, जाहिराती नसलेले, पर्वतावरचे छोटेसे गाव ओलांडून वारीच्या ठिकाणी जायचे होते. कोणत्याही देवाचे नाव नाही, भजनाचे आवाज नाहीत, फक्त निसर्गाचे संगीत. वारी म्हणजे देवाकडे जायची अरुंद वाट. एकावेळी एकच चालू शकेल अशी वाट. मला रहीमचा दोहाच आठवला,

‘‘रहीमन गली है साँकरी ज्यां में दो न समाए
जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं’’

देवाकडे जाताना जोवर मीपणा आहे, तोवर देव भेटणार नाही आणि तो भेटेल तेव्हा मीपण असणार नाही!

निसर्गाने जेवढा रस्ता दिला तेवढ्याच रस्त्यावरून पुढे जात, त्या रस्त्याची डागडुजी करून तो जशाचा तसा पुढच्या पिढीला वारसा हक्काने देणारी ही वारी. आम्हीही श्रमदान केले. या श्रमदानालाच जपानी भाषेत ‘मिचिबुशीन’ - देवाचिया दारी उभा क्षणभरी राहण्याचा मार्ग म्हणतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advaita Umranikar Write Article In Muktapeeth