एक गोष्ट हारांची

अद्वैता उमराणीकर
गुरुवार, 22 मार्च 2018

समारंभात पाहुण्यांसाठी हार हवेच होते आणि नेहमीचा फुलवाला आला नव्हता. व्यवस्थापकाने एका हरकाम्याला कामाला लावले आणि त्याने आणलेल्या हारांचीच गोष्ट झाली.

समारंभात पाहुण्यांसाठी हार हवेच होते आणि नेहमीचा फुलवाला आला नव्हता. व्यवस्थापकाने एका हरकाम्याला कामाला लावले आणि त्याने आणलेल्या हारांचीच गोष्ट झाली.

कलादालनात एका सरकारी समारंभाचे आयोजन केले होते. आयोजक नामवंत "इव्हेंट मॅनेजर' असल्याने त्यांनी सकाळीच येऊन कार्यक्रमाची तयारी सुरू केली होती. मंचावर मखमली कापडाने झाकलेल्या खुर्च्या, टेबले, मागचे फलक, माळा, प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा व फुलदाण्या प्रेक्षकांच्या खुर्च्यांवर नावाची लेबले, वातावरण सुगंधी करायला एअर फ्रेशनर, बिसलरी पाण्याच्या बाटल्या... सगळे काही व्यवस्थित होते. आता समारंभात धावपळ करून मिरवणारे लोक जमा व्हायला लागले होते. उगीचच भ्रमणध्वनीवर मोठमोठ्याने बोलून कसा झापला त्याला, असा आविर्भाव तोंडावर आणत होते. छायाचित्रकार "अँगल' बघत होते, तर ध्वनिक्षेपकवाले आवाजाची तपासणी करत होते.

इतक्‍यात, "इव्हेंट मॅनेजर'च्या लक्षात आले, की फुलवाले अद्याप आलेले नाहीत. कार्यक्रमाला लागणारे हार न चुकता आणणारा पांडुरंग फुलवाला आला नव्हता, त्याचा भ्रमणध्वनीही "स्वीच ऑफ' येत होता. त्यांनी दारावरच्या रम्याला खुणेनेच बोलावले. नेमकी हातावर तंबाखू घ्यायला अन्‌ साहेबांनी हाक मारायला एकच वेळ आली. तो शांतपणे तंबाखू मळून गालामध्ये बार भरून आला. खुणेनेच काय काम आहे, विचारले. त्यांनी हार न आल्याचे सांगितले व घाईघाईने शंभरच्या दोन नोटा कोंबल्या. महिनाअखेरला आलेले ते पैसे म्हणजे रम्याला खूप आनंदाचा क्षण होता. त्याचे डोळे चमकले. तो घाईने बाहेर पडला. दुपारी दीड वाजताची वेळ अन्‌ ऊन मी म्हणत होते. पुण्यातली दुकाने वामकुक्षीच्या मार्गावर असल्याने शांतताच होती. रम्याने सायकल काढली. डेक्कन जिमखाना गाठला. पण छे, फुलवाले दिसत नव्हते. परत सायकल मारत संभाजी पूल ओलांडून पुढच्या चौकात आला. आता घशाला कोरड पडली होती. खिशात पैसे होतेच. देशी दारूचे दुकान टाळून जायला त्याला बरे वाटेना. दुकानात गेला, पन्नास रुपयांची दारू घशात ओतली आणि सायकलला गती आली. सायकलला कुठे जायचेय ते कळतच नव्हते. पण उन्हाची काहिली जाणवायला लागली. एका झाडाखाली पाच मिनिटे विश्रांतीसाठी बसला. आता हार आणायला थेट मार्केट यार्ड गाठायला लागते का, या विचारानेच वैतागला. इतके उन्हात सायकल मारतो आहोत; पण एकसुद्धा फुलवाला दिसेना. संप असेल असे सांगून नेऊ वेळ मारून! पण पन्नास रुपयांचे काय सांगणार? हं, सायकलची पाच-सहा पंक्‍चर काढायला लागली म्हणून सांगू, म्हणजे झाले! विचार पक्का ठरला, आता निघू म्हणून तो उठला. तेवढ्यात उदबत्त्यांचा, तुळशीचा वास नाकात भरून राहिला. एकदम डोक्‍यात प्रकाश पडावा तसा टुणकन उडी मारून उठला. काम पूर्ण केले आणि सायकल मारत परत सभागृह गाठले. दोन मोठी हारांची पुडकी व्यवस्थापकाच्या हातात दिली. व्यवस्थापकाने त्याला प्रेमाने मिठी मारली आणि अडचणीच्या वेळेला देवासारखी मदत केली म्हणून पुन्हा पुन्हा आभार मानले. बक्षीस म्हणून आणखीन शंभर रुपयांची नोट हातात ठेवली. आज रम्याला बंपर लॉटरी लागल्याचाच आनंद होत होता.

आता कार्यक्रमात सत्काराची वेळ आली. अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे त्या भल्यामोठ्या हारांनी आणि सत्काराने भारावून गेले होते. त्यांना हार इतके आवडले, की पूर्ण कार्यक्रमभर त्यांनी ते गळ्यातून काढलेच नाहीत. बरेच जण त्यांच्याबरोबर सेल्फी काढून घ्यायला मागे-पुढे करत होते. लहान मुले येता जाता हाराला हात लावून बघत होते. फक्त प्रेक्षकांमधला एक माणूस कार्यक्रम संपेपर्यंत अस्वस्थ होता. इकडे दारावर रम्या तंबाखूचा बार लावून समाधी अवस्थेकडे जात होता. पोटातील दारू, उरलेले पैसे अन्‌ बक्षिसाचे पैसे काय करावे सुचत नव्हते. कार्यक्रम संपत आला तसा तो अस्वस्थ झालेला माणूस व्यवस्थापकाला शोधत निघाला. तो व्यवस्थापक कॅफेटेरियात चहा पीत निवांत बसला होता. तो माणूस आल्या आल्या व्यवस्थापकाच्या अंगावर ओरडायलाच लागला. ""काय राव, पैसे घेऊन कार्यक्रम करता. मग तुम्हाला शोभते का हे वागणे?''

व्यवस्थापक गडबडलाच. ""काय झाले नीट सांगा.'' म्हणून विनंती केली त्याने.
""अहो, तुम्ही त्या अध्यक्षांना हार घातला ना! हा हार कुठून आणला होता?'' ""आमच्या त्या रम्याने, डोअरकीपरने आणला, लई कामाचा माणूस बघा. आपण तर आज जाम खूष हाय त्याच्यावर. कमी पैशात लई भारी हार आणला गड्याने.''
""कमी पैशात? अहो, माझ्या नवीन कारचा हार काढून आणलाय त्या नालायकाने!''
""मग तो दुसरा हार?'' तो दुसरा हार ज्याच्याकडून आणला होता, तो आता भांडायला येणार नव्हता. कारण त्याच्यावर आतापर्यंत वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेही असतील. इकडे रम्या जिवाची मुंबई करायला पुन्हा त्याच दुकानात आला होता. व्यवस्थापकाच्या डोळ्यांसमोर रम्या, तो गाडीचा मालक, ते प्रेत आणि आनंदाने हार मिरवणारे अतिथी फेर धरून नाचत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adwaita umranikar write article in muktapeeth