शालीन कणखर इंदिराजी...

शालीन  कणखर इंदिराजी...

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि जगातील एक कीर्तिवंत असं सशक्त स्त्री नेतृत्व, भारतरत्न इंदिरा गांधी यांची परवा जन्मशताब्दी साजरी झाली. खरं तर वडील जवाहरलाल राजकारणात असल्यामुळे राजकारणी लोकांचा त्यांच्या घरात सतत वावर असे. त्यामुळे इंदिराजींना लहान वयातच राजकारणाचे बाळकडू मिळाले होते.

‘वानर सेना’, ‘बाल चरखा संघ’ यांची स्थापना करून त्या लहानपणापासूनच स्वातंत्र्याच्या चळवळीत अग्रेसर राहिल्या होत्या आणि कणखर नेतृत्व, मुत्सद्दीपणा व योग्य निर्णय घेण्याची कला, आत्यंतिक धाडसीपणा यामुळे त्या भारताच्या पंतप्रधान झाल्या होत्या. त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाचा जगाला प्रत्यय आला तो बांगला देश निर्मितीच्या वेळी. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांनी धाडसी व आबालवृद्ध प्रजेच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या. १४ मोठ्या बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणाचा त्यांनी निर्णय घेतला. भारताचा पहिला उपग्रह इंदिराजींच्या कारकिर्दीतच झेपावला. ‘जय जवान जय किसान’ ही लालबहादूर शास्त्रीजींच्या कारकिर्दीतील घोषणा त्यांनी समर्थपणे प्रत्यक्षात आणली. आदिवासींसाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. हा सारा तर तसा सर्वज्ञात इतिहास आहे, मात्र त्यांचा एक स्वभाव किंवा कार्यविशेष म्हणूया तो याची देही याची डोळी अनुभवण्याचा योग आला, त्याची ही छोटीशी गोष्ट. कामाची कितीही घाई असली तरी इंदिराजी आपल्याला भेटायला आलेल्या सर्व लोकांना भेटत. त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत. हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य होतं.

मला आठवतंय, १९७४ रोजी आम्ही महाराष्ट्रातील ५२ शिक्षक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी दिल्लीला ‘पंचवार्षिक योजनेची शैक्षणिक उद्दिष्टे व त्यावर शिक्षकांचे विचार’ या विषयावर आपले विचार मांडण्यासाठी दिल्लीला शिबिरासाठी गेलो होतो. ७ दिवसांचे ते शिबिर होते. त्या वेळी आम्ही इंदिराजींना भेटलो. १० मिनिटे त्या आम्हा शिक्षकांना भेटल्या, बोलल्या, आमचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांचे त्यासंबंधीचे विचार त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. सर्वांची चौकशी केली. केवढं मोठं मन त्यांचं! भारतीय स्त्रीची शालीनता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. विद्वत्तेचे तेज दिसत होते. अलंकार व मेकअपविना खादीच्या साडीत त्या प्रसन्न दिसत होत्या. शिक्षकांशी बोलून झपझप चालत त्या दुसऱ्या ग्रुपला भेटण्यासाठी निघून गेल्या. तशी छोटीशीच त्यांची भेट ही; पण आम्हा सर्व शिक्षकांच्या आयुष्यातील भाग्याचा आणि अविस्मरणीय दिवस बनून गेली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com