काटेरी गालिचा

अनंत बाबूराव नाईक
शुक्रवार, 9 मार्च 2018

ती वेळच तशी होती. परप्रांतातून आलेला छोटा व्यावसायिक काही कारणाने अडचणीत आला होता. त्या वेळी सर्वसामान्य माणसांनी एकत्र येऊन त्याला मदत केली आणि त्याला घरी परतण्यासाठी व्यवस्था केली.

ती वेळच तशी होती. परप्रांतातून आलेला छोटा व्यावसायिक काही कारणाने अडचणीत आला होता. त्या वेळी सर्वसामान्य माणसांनी एकत्र येऊन त्याला मदत केली आणि त्याला घरी परतण्यासाठी व्यवस्था केली.

मी एका "लॉज'मध्ये व्यवस्थापक म्हणून दरमहा नव्वद रुपये पगारावर नोकरी करीत होतो, तेव्हाची ही गोष्ट. नेहमीप्रमाणे मी कामावर असताना एक युवक टांग्यामधून पाच-सहा लांबलचक गालीचे घेऊन लॉजमध्ये दाखल झाला. त्याला "सिंगल रूम' हवी होती. नियमाप्रमाणे मी "लॉज'ची नोंदवही त्याच्या पुढे ठेवली. खोलीभाडे दिवसाला आठ रुपये सांगितले. त्याने हातात पेन घेतला, पण नोंदवहीत लिहिण्याऐवजी माझ्याकडे पाहत म्हणाला, ""भाईजान थोडा प्रॉब्लम है।'' मी म्हणालो, ""क्‍या प्रॉब्लम है?''

त्याने पटकन खिशातून एक "व्हिजिटिंग कार्ड' काढून माझ्या हातात दिले. त्या कार्डावर कोरेगाव पार्कचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक होता. मी त्याला काही तरी विचारणार त्यापूर्वीच तो सांगू लागला, ""भाईजान, मेरा नाम नसरुल्ला याकूब है। मै जम्मू से यहॉं आया हूँ। ये जो साब है, ये एक महिना पहले जम्मू-कश्‍मीर घुमनेके लिये वहॉं आये थे। साथमे उनकी बीबी भी थी। उन्होने पाच गालिचा का ऑर्डर दिया था। एक हजार रुपया ऍडव्हान्स और ये कार्ड। बोले थे, गालिचा पूना लेके आवो फिर बाकी पैसा और आने जानेका किराया दुँगा। मैं आजही उनके पास जानेवाला था। मगर चार बजे पूना पहुंचनेवाली गाडी पाच घंटा लेट पहुंची। अभी इतनी रात को उनके घर जाना ठीक नही, इसलीये सोचा एक रात आपके लॉज मे रह के सुबह साब के घर जाऊंगा। मेरे पास जितने पैसे थे वो स्टेशनपर ऑक्‍ट्रॉयवालोने निकाल लिये। सिर्फ पंधरा रुपये बचे है। फिर सुबह तांगे का किराया देना पडेगा। इसलीये आपके रिक्वेस्ट है, रूम का किराया मै कल दुपहर बारा बजे दुंगा। प्लीज मेहरबानी करना।''

मला त्याच्या बोलण्यात प्रामाणिकपणा वाटला. त्याची अडचण लक्षात घेऊन उद्याच्या कबुलीवर त्याला खोली दिली. त्या दिवशीचे काम संपवून घरी गेलो. दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता परत कामावर आलो, तोच नसरुल्ला रडत माझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्याच्या पुढे मोठी समस्या उभी होती. ती घटनाच अशी घडली, की त्यात नसरुल्लाचा काहीच दोष नव्हता. दोष होता तो त्याच्या नशिबाचा. ज्या व्यक्तीने गालिच्याची मागणी नोंदवली होती ती व्यक्ती चार दिवसांपूर्वीच हृदयविकाराने मरण पावली होती. पतीच्या निधनाच्या धक्‍क्‍याने प्रकृती बिघडल्याने पत्नीला रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. इतर कोणाला गालीच्याच्या व्यवहारासंबंधी काहीही माहिती नसल्याने नसरुल्ला गालिच्याने भरलेला टांगा घेऊन हताश मनस्थितीत लॉजवर परत आला होता.

आता प्रश्‍न होता त्याला परत जम्मूला जाण्याचा. खर्च होता सहाशे रुपयांचा. त्याकाळी सहाशे रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. अनेकांना ते गालिचे दाखविले. निम्म्या किमतीतही घेण्यासाठी कोणी तयार होईना. कारण त्या वेळी बहुतेक लोक नोकरदारच होते. पगारही कमी होते. गालिचा अंथरण्याजोगी घरेही नव्हती. बहुंताश लोक चाळीत अथवा वाड्यात राहणारे होते. त्याकाळी पुण्यात फक्त डेक्कन जिमखाना, प्रभात रस्ता, कोरेगाव पार्क, कॅम्प अशा मोजक्‍याच ठिकाणी उच्चभ्रू व श्रीमंत लोक राहात होते.

पैसे उभे करण्यासाठी काही तरी हालचाल करणे भाग होते. माझ्याकडे सायकल होती. चार गालिचे सायकलला बांधून डेक्कन जिमखाना व प्रभात रस्त्यावर नसरुल्लाला पाठविले. पूर्ण दिवस उपाशीपोटी फिरूनसुद्धा काहीही उपयोग झाला नाही. मी ज्या लॉजमध्ये कामाला होतो तो शिवाजीनगरच्या मध्यभागी होता. त्या भागात अनेक गॅरेजेस्‌, मालवाहतूक कंपन्या, स्पेअर पार्टसची दुकाने होती. त्या मालवाहतूक कंपन्यांच्या मालमोटारी भारतभर सामानांची वाहतूक करायचे. त्याच भागात माझे एक पंजाबी स्नेही होते. त्यांचे नाव मनजितसिंग सहानी. मोठा दिलदार माणूस. त्यांना माझी अडचण सांगितली. ते लगेचच मदत करायला तयार झाले. मला म्हणाले, ""प्यारे, तू काही काळजी करू नको. माझ्या ड्रायव्हरला सांगतो, तो त्या गालिचेवाल्याला दिल्लीपर्यंत फुकट सोडेल.''

नसरुल्लाला खूप आनंद झाला. त्याने अक्षरशः माझ्या गळ्याला मिठी मारली. त्याच दिवशी रात्री गालिच्यासह त्याला एका मालमोटारीत बसविले. नको नको म्हणत असतानासुद्धा त्याने एक छोटा गालिचा मला भेट दिला व जम्मूला येण्याचे आंमत्रण दिले. मी व लॉजमधील इतर सहकाऱ्यांनी जमविलेले साठ रुपये त्याला खाण्यासाठी दिले. त्याचा दिल्लीकडे प्रवास सुरू झाला. दोन-तीन दिवसांच्या सहवासात प्रथमच एक नवीन अनुभव मिळाला होता. जाताना त्याची कृतज्ञतेची नजर खूप काही सांगून शिकवून गेली. माणुसकीला जात, पात, धर्म यापैकी कशाचीही गरज भासत नाही. हे बाकी नसरुल्लाच्या नजरेतून मला दिसून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anant naik write article in muktapeeth