सापांच्या आसपास

अंजली काळे
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पावसाळी रात्र. मंदिरात थोडी कोरडी जागा पाहून पथारी अंथरली. तेथेच आसपास सापांची वेटोळीही होती.

पावसाळी रात्र. मंदिरात थोडी कोरडी जागा पाहून पथारी अंथरली. तेथेच आसपास सापांची वेटोळीही होती.

तीस वर्षांपूर्वीची घटना; पण कालच घडल्याप्रमाणे मनात ताजी आहे. जुलै महिना होता. "राजगड' ट्रेक ठरला होता. मी, माझा भाऊ अभिजित व आमचा मित्र विवेक वैद्य असे तिघे निघालो. मार्गासनीला उतरलो, तर मुसळधार पावसाने आमचे स्वागत केले. वाटाड्या घेऊन "साखर' मार्गे चालू लागलो. पाऊस असा, की अर्ध्या वाटेवरून वाटाड्या परत फिरला. आधी आमचा राजगड झाला असल्याने तशी अडचण नव्हती. चार तासांनी चोरदिंडीतून राजगडावर पोचलो. रेनकोट असूनही चिंब भिजलो होतो. पळतच पद्मावतीचे मंदिर गाठले. ते कोरडे होते. एका कोपऱ्यात सॅक्‍स टाकल्या. अजून एक ग्रुप आलेला होता. त्यांचे खाणे चालू होते. आम्हीपण खाऊन घेतले. संध्याकाळी गड फिरायला बाहेर पडलो. पावसाने अद्यापही विश्रांती घेतली नव्हती. अंधार पडल्यावर मंदिरात परत आलो. खाल्ले. पथाऱ्या पसरून गप्पा मारत बसलो.

मेणबत्ती लावली. सहज समोर लक्ष गेले, तर कोनाड्यात सापाची वेटोळी. पावसामुळे तेही मंदिराच्या आश्रयाला आले असावेत. अठरा-विशीतल्या बिनधास्तपणामुळे असेल किंवा गडकिल्ल्यांवरच्या अतोनात प्रेम व विश्‍वासामुळे असेल, भीतीचा लवलेशही कोणाच्याच मनात नव्हता. त्यामुळे अंथरुणाला पाठ लागताक्षणी गाढ झोप लागली. मधेमधे उंदरांच्या खुडबुडीमुळे झोप एक-दोनदा किंचित चाळवली तेवढेच! पहाटे जाग आली. मेणबत्ती कधीच विझली होती. टॉर्चचा झोत टाकून पाहिले, तर वेटोळी निवांत जागेवरच होती. निरखून पाहिले तर तीन साप होते. त्यांच्यासोबत रात्र सुखेनैव पार पडली होती.

आता वाटते, की आमच्याकडच्या अन्नाच्या वासाने उंदीर खुडबुडत होते. त्यांच्यामागे साप येऊ शकले असते, पण तेव्हा तसे काहीही मनात न येता निःशंकपणे झोपलो. दुसऱ्या दिवशी पूर्ण गड, तिन्ही माच्या, बालेकिल्ला पाऊस व धुक्‍यातच हिंडलो. दुपारी गड उतरलो. पुढेही कैक वेळा राजगड झाला. पण सापांसोबत घालवलेली राजगडवरची रात्र केवळ अविस्मरणीय आहे. तिच्या केवळ स्मरणानेच आजही मनात आनंदाचे क्षण जागतात आणि हुरूप वाढतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anjali kale write article in muktapeeth