दिव्यत्वाची प्रचिती

अंजली काळे
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

गडचिरोलीला जाताना मनात अनेक शंका होत्या. परतताना केवळ चैतन्य होते.

गडचिरोलीला जाताना मनात अनेक शंका होत्या. परतताना केवळ चैतन्य होते.

आमच्या भटक्‍या आयुष्यातील सर्वांत आनंददायी सहल म्हणजे गडचिरोलीतील डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्यासोबत घालवलेला काळ. त्यांच्या "सर्च' शोधग्राम प्रकल्पात आमचे अतिशय आस्थेने स्वागत झाले. अत्यंत साधेपणा व कमालीची स्वच्छता ही वैशिष्ट्ये लगेच नजरेत भरली. सायंप्रार्थनेच्या वेळी डॉ. अभय, डॉ. राणी यांनी आमची ओळख करून घेतली. समाजातील चांगल्या गोष्टी मुलांपर्यंत पोचवण्यासाठी ही सहल आखल्याचे सांगितल्यावर त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने आमच्या प्रश्‍नांना सविस्तर उत्तरे दिली. बंग दांपत्य सर्वांत मागासलेला भाग निवडून काम करायचे म्हणून गडचिरोलीत आले. अतिशय चिकाटीने त्यांनी आदिवासींचा विश्‍वास मिळवला. बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटवले. राणीताईंची साधी राहणी व गोड वाणीमुळे आदिवासी स्त्रियांत त्या फारच प्रिय झाल्या. गावोगाव प्रशिक्षण देऊन सुईणी व आरोग्यदूत तयार केले. आम्ही दोन-तीन दिवस तेथे होतो. सर्व पाहताना बंग दांपत्य सतत आमच्या बरोबरच होते. शोधग्राम म्हणजे रमणीय तपोवन वाटत होते. सर्वत्र फुलांचे ताटवे, फुललेले बगीचे व चौफेर हिरवाई. सर्व वास्तूंना झाडांची, फुलांची नावे, सर्व घरे बैठी, नैसर्गिक रंगांत रंगवलेली, सुंदर. राणीताईंचे बोलणे म्हणजे मूर्तिमंत ऋतुजा. आमच्यासाठी त्यांनी एवढा वेळ द्यावा यामुळे आम्हाला अवघडल्यासारखे वाटत होते. तसे त्यांना म्हणताच राणीताई गोड हसून म्हणाल्या, ""असे मनातही आणू नका. आमच्या आयुष्यात तुमचे स्थान बहाव्याचे आहे. रखरखीत उन्हाळ्यात सोनपिवळ्या घोसांनी लगडलेला बहावा जशी बहर आणतो. तसेच आमच्या एकसुरी, निरस रुटीनमध्ये तुमच्यामुळे चैतन्य येते. तेच आमचे टॉनिक आहे. म्हणून आम्ही पाहुण्यांच्या निवासस्थानाला बहावा नाव दिले आहे.''

वास्तविक सहलीच्या आधी एवढी मोठी माणसे आपल्यासारख्या जनसामान्यांशी कशी वागतील, बोलतील याचे काहीसे दडपण होते; पण त्यांच्या सरळ साधेपणाने, अनौपचारिक आपलेपणाने त्यांनी आमची मने तर जिंकलीच; पण आदिवासी त्यांच्यावर भरभरून का प्रेम करतात याचे रहस्यही उलगडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anjali kale write article in muktapeeth