अब दिल्ली दूर नही!

अंजली काळे
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

आपण आपल्या मुलाबाळांसाठी सोनेनाणे, पैसा अडका, घरदार काय ठेवायचे याचा विचार करतो; पण त्यांना उद्या जगण्यासाठी गरज असलेली हवा, अन्न, पाणी काय दर्जाचे मिळेल हे खिजगणतीत नसते. आपणच प्रदूषण वाढवतो व मुलांनाही तशाच सवयी लावत असतो.

आपण आपल्या मुलाबाळांसाठी सोनेनाणे, पैसा अडका, घरदार काय ठेवायचे याचा विचार करतो; पण त्यांना उद्या जगण्यासाठी गरज असलेली हवा, अन्न, पाणी काय दर्जाचे मिळेल हे खिजगणतीत नसते. आपणच प्रदूषण वाढवतो व मुलांनाही तशाच सवयी लावत असतो.

"राजधानी दिल्ली व्हेंटिलेटरवर' ही बातमी "सकाळ'मध्ये वाचली आणि प्रदूषणाचे संकट आता अगदी "नाका-तोंडा'शी येऊन ठेपले आहे, या विचाराने मन अगदी बेचैन झाले. प्रदूषणाच्या बाबतीत सर्वच महानगरे दिल्लीच्या पावलावर पाऊल टाकूनच "प्रगती' करीत आहेत.
"दिल्लीत जवळपास प्रत्येक नागरिकाला डोळ्यांना जळजळ, श्‍वसनाचा त्रास', "वाहत्या हवेचे प्रमाण शून्य', "मास्कच्या विक्रीत वाढ,' असे बातमीतील तपशील वाचून धडकीच भरली. पर्यावरणवाले काय ते बघून घेतील, मला काय त्याचे, असा विचार करायची वेळ संपली आता राव!

पुण्यात सुज्ञ लोकांची संख्या जास्त आहे, हे सिद्ध करायची वेळ आता खरेच आली आहे. दिवाळीत पुण्यात ध्वनिप्रदूषण घटले; पण वायुप्रदूषण? त्याने उच्चांक गाठला. मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे कमी-जास्त आवाजाचे फटाके, आतषबाजीची दारू आणून देऊन, विषारी वायूच्या मोबदल्यात त्या चकचकाटाची मजा त्यांना देणे, म्हणजेच मुलांचे लाड का रे भाऊ? चौकाचौकांतले "ट्रॅफिक जॅम्स' आणि बेशिस्त वाहतूक आपल्या एवढी अंगवळणी पडली आहे, की नाकात जाणाऱ्या धुराचे आपल्याला काहीच वाटत नाही; मग सततच त्याला सामोरे जाणाऱ्या पोलिसदादांचे काय, हा विचार तर लांबच! अगदी आवश्‍यक व अटळ असेल, तरच गाडी वापरायची असा निश्‍चय जर आपण केला, तर वाहतुकीची समस्या बऱ्याच अंशी सुटेल. गाडी वापरायचीच नाही असे मनापासून ठरवले तर खरोखर आपल्यालाच कितीतरी पर्याय सुचतील.

आताची मुले खरोखर शहाणी व समंजस आहेत; पण त्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी आपली आहे. अगदी सोळाव्या वर्षांपासून प्रत्येकाला गाडी घेतलीच पाहिजे, असा काही नियम आहे का? चालण्याचे असंख्य फायदे आहेत. चालण्याची सवय आपणच मुलांना लहानपणापासून लावू शकतो. एकेकाळी "सायकलींचे शहर' अशी पुण्याची ओळख होती. ती ओळख जर आपण परत मिळवून देऊ शकलो, तर खऱ्या अर्थाने ते "पर्यावरण स्नेही शहर' होईल. आपले पुणे "स्मार्ट सिटी' होणार आहे. रस्ते कितीही रुंद केले, तरी वाहनांची संख्या मर्यादित राखल्याखेरीज ते पुरेसे मोठे वाटणार नाहीत. झाडे तोडण्यातला आपला उत्साहही पर्यावरणाची हानी करतो आहे. जी झाडे तुमच्यासाठी ऑक्‍सिजनचा एकेक कारखाना आहेत आणि तुम्हीच निर्माण केलेले कार्बनडाय ऑक्‍साइडसारखे वायू शोषून घेऊन जी प्रदूषण कमी करतात, त्या झाडांनाच तुम्ही नष्ट करता?

वायुप्रदूषणाला कारणीभूत असणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे अफाट बांधकामे! पाहावे तिकडे फ्लॅट्‌सच्या, प्लॉट्‌सच्या जाहिराती! विकएंड होम्स, समर होम्स आणि काय काय! "घर हवे' ही गरज झाली आणि "घरे हवीत' ही हाव. पर्यावरणाला घरघर लावणारी! बघता बघता टेकड्या भुईसपाट केल्या जात आहेत. बेफाम वृक्षतोड होते आहे. आपण घराला "वास्तुदेवता' म्हणतो, निसर्गाचा नाश करून उभी राहिलेली वास्तू सुखाचा आशीर्वाद देईल? घर उभारताना झाडेही वाढवायला हवीत, याकडे आपण कधी लक्ष देणार? गावाकडच्या देवरायाही कमी होत चालल्या आहेत. याकडे आपण का दुर्लक्ष करतो?
खरोखर फार आश्‍चर्य वाटते! अवकाशातील कोणत्या तरी अपघाताने तयार झालेली ही पृथ्वी! काहीतरी रासायनिक लोच्यामुळे निर्माण झालेली इथली सजीव सृष्टी! असंख्य प्रकारचे सजीव! त्यांना जगवणारा निसर्ग! इथली जमीन, माती, नद्या, पर्वत, समुद्र, जंगले, माळराने! त्यातलाच एक जीव, कागदाच्या तुकड्यांच्या मोबदल्यात स्वामित्वाची भाषा करतो, अनेक वर्षांपासूनची झाडे, जी मातीचे गाणे आभाळापर्यंत पोहोचवणाऱ्या पक्ष्यांचा, इतर कृमी कीटकांचा आधार असतील, तरीही ती तोडताना माणसाचा हात जराही थरथरत नाही? पृथ्वीवर अल्पकाळासाठीच वास्तव्यास आला आहे, त्याने एखाद्या भूखंडाला "माझाच आहे' म्हणणे जरा हास्यास्पदच वाटते ना? गरज आणि अधिकाचा हव्यास यातील सीमारेषा पार झाली आहे; पण गरजाच कमी केल्या, तर खरोखरच खूप छान वाटते. सध्याच्या सुट्या चलनाच्या चणचणीने कमी गरजेत जगायला शिकवले आहेच की! त्याचा लाभ घेता येईल. नैसर्गिक संसाधनांचा गरजेहून अधिक वापर करायला नको म्हणून घरात विजेचा जोडही न घेणाऱ्या डॉ. हेमा साने आपल्या पुण्याच्याच आहेत, बरे का!
निसर्गाचा माणसाच्या गरजासाठी कायमच वरदहस्त आहे; पण अधाशीपणाला तो कधीच पुरणार नाही आणि मग माणसाला त्याची या अफाट पसाऱ्यातील जागा दाखवून द्यायची वेळ येईल आणि ती आली आहे. कारण चिरस्थायी, सार्वभौम असा आहे, केवळ निसर्ग! निसर्गाशी, पर्यावरणाशी समतोल राखणाऱ्या संस्कृतीलाच अखंडत्वाचे वरदान असते.

म्हणूनच आता तरी क्षणभर थांबू, विचार करू आणि एक तरी पाऊल प्रदूषण निर्मूलनाच्या दिशेने टाकू. कारण "ए भाय, अब दिल्ली दूर नही!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anjali kale's muktapeeth article