मंदिर बनले उभ्या घराचे

मंदिर बनले उभ्या घराचे

काहीजणी अल्पशिक्षित, तर काही उच्चशिक्षित. सगळ्याच मध्यमवर्गीय. संस्कृतशी कधी संबंध आलेला नव्हता; पण त्या चिकाटीने स्तोत्रे, सूक्ते शिकत गेल्या आणि हडपसर परिसरात मंत्रपुष्प उमलले.

कोथरूडमधून आम्ही हडपसरला राहायला आलो. अगदी नवखा, अनोळखी परिसर; पण आमच्या शेजारी कांता गायकवाड यांनी परिसराचा परिचय करून दिला. मन रमत नव्हतेच. माझ्या सुख-दुःखाचे साक्षीदार असलेले कोथरूडमधले ते छोटेसे घरकुल मला खुणावत होते. मुलगा रोहित, दिवसभर घरात चिवचिवणारी नात शारदा आणि मुलीसारखी सून वीणा या सर्वांचा विरह सहन करणे अशक्‍य होते. तिथून येताना माझा मुलगा म्हणाला होता, ""तुमच्या हातून काही तरी विशेष कामगिरी करून घेण्याचा नियतीचा हेतू असावा.'' या वाक्‍याने जगण्याला बळ मिळाले. घरातील एकटेपणा घालविण्यासाठी मी शिकवण्या सुरू केल्या. वेळ चांगला जाऊ लागला व आर्थिक हातभारही लागला. पण बदललेली शिक्षणपद्धती आणि आमची जुनी शिक्षणपद्धती यांचा मेळ जमेना, म्हणून शिकवण्या बंद केल्या.

आता वडिलांनी दिलेल्या संस्कृत ज्ञानाची शिदोरी सोडली आणि पौरोहित्य करायला सुरवात केली. एक- एक करता अनेक पूजा मला मिळत गेल्या. या भागात प्रसिद्धी मिळाली. शेवाळवाडी येथे एका मंदिरात श्री गणेश, श्री दत्त व श्री स्वामी समर्थ या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होती. त्यासाठी गणेश अथर्वशीर्षाचे सहस्रावर्तन करण्याचे आमंत्रण मिळाले. मी "हो' म्हटले; पण त्यासाठी मेळा कसा जमवावा, हा प्रश्‍न पडला. अथर्वशीर्षाचे पुस्तक पाहताच प्रत्येकीने नकार द्यायला सुरवात केली; पण त्यांना धीर देऊन म्हणाले, ""नवरात्रात रोज माझ्याकडे आरतीला येता, तसेच आताही या. जमेल तुम्हाला. मी शिकवते.'' त्यांच्यातील आत्मविश्‍वास जागा केला. दहा जणी तयार झाल्या. एकीचाही कधी संस्कृतशी संबंध आला नव्हता. दहा जणींना शिकवताना मला तारेवरची कसरत करावी लागत होती. शब्दांतील संधीचा विसर्ग करून, शब्दाची उकल करून लिहून दिले. ज्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असेल त्या शब्दाला काना, मात्रा, वेलांटी व उकार काय आहे, त्याप्रमाणे उच्चार कसा करायचा हे शिकवले. अनुस्वाराचा उच्चार "म' होतो हे असंख्य वेळा सांगून सांगून माझ्यातले ममत्व संपत आले. शांतिमंत्र शिकवताना माझ्याच मनाची शांती ढळू लागली. "त्वं ब्रह्ममयः' याचा उच्चार "त्मम्‌ ब्रह्मा महेश' होऊ लागला. पण डोके शांत ठेवून प्रयत्न करायचे ठरवले. माझे अथक परिश्रम आणि या भगिनींची चिकाटी यामुळे सर्वजणींना बऱ्यापैकी जमू लागले आणि अथर्वशीर्षाच्या मंत्रपुष्पाची पुष्पमाला श्री गणेशाला अर्पण केली. अशा तऱ्हेने आम्हा अकरा जणींच्या गटाचा श्रीगणेशा झाला. भरघोस दक्षिणा आणि कौतुक पदरात पडले.

आता सर्व जणींचा उत्साह खूपच वाढला. अगोदर नकार देणाऱ्या भगिनी आता उत्स्फूर्तपणे येऊ लागल्या. त्यांना प्रत्येक स्तोत्र शिकवताना शब्दांच्या संधी सोडवत गेले, तसा अर्थही सांगत गेले. त्यामुळे त्यांना गोडी वाटू लागली. नवरात्रात श्रीसूक्त आणि कुंकुम अर्चना यासाठी आमंत्रणे येऊ लागली. यातील काही भगिनी उच्चशिक्षित व काही भगिनी अल्पशिक्षित आहेत. माधुरी देवदास, राजश्री देसाई आणि अनिता बावीसकर या भगिनी नोकरी, घरकाम, मुलांचे शिक्षण या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून रोज रात्री नियमितपणाने शिकायला येत. वीणा किणी, मंगला भाट, शैलजा कुलकर्णी या नोकरी करणाऱ्या सुना-लेकी, नातवंडांची जबाबदारी, घरकाम सर्व आवरून धावतपळत पठणाची वेळ गाठत होत्या. त्यातील एक म्हणाली, ""आम्ही शाळेत जाऊन शिक्षण घेतले; पण ज्ञान येथे येऊन मिळवले.'' मनीषा नलगे यांचा मुलगा "विशेष मुलगा' आहे; पण तो आईबरोबर आवडीने ऐकायला येतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव समाधान देतात. नकळत त्याच्या हाताच्या बोटांची हालचाल होते आणि उच्चारासाठी ओठांची हालचाल होते. त्यातूनच त्याला कधी तरी बोलता येईल अशी आशा वाटते. वैशाली निंबाळकर म्हणाल्या, ""आवड असून सवड नसतानाही येत राहिल्यामुळे जळी- स्थळी- काष्टी- पाषाणी तेच शब्द दिसतात. नव्हे, ते कानात घुमतच असतात.'' अल्पशिक्षित महानंदा हेंबाडे यांना त्यांच्या कर्नाटकी ढंगाच्या मराठी बोलीचा अडसर आला नाही.

या सर्वजणींची ऋषी पंचमीला श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्षाच्या कार्यक्रमाला जाण्याची प्रबळ इच्छा होती. पास मिळवून आम्ही पहिल्यांदा कार्यक्रमाला गेलो. आता दरवर्षी दगडूशेठ गणपती व श्रीदत्त मंदिरात पठणासाठी जातो.
अथर्व, श्रीसूक्ताच्या शांत, मधुर सुरांची जागा आता सप्तशतीच्या घनगंभीर पण आश्‍वासक सुरांनी घेतली. देवी भगवतीपर्यंत आमची आळवणी पोचली. आता रूद्राचा सर्वोच्च टप्पा गाठण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले. रूद्र उच्चाराने घराचा घुमट दणाणून गेला. श्री चंद्र मौलेश्‍वर मंदिर, हडपसर येथे महाशिवरात्रीला लघुरूद्राच्या पठणाची संधी मिळाली. अक्कलकोट स्वामी जयंतीला लघुरूद्र अभिषेकाची संधी मिळाली. बघता- बघता घराचे मंदिर कधी, कसे झाले कळलेच नाही. आता या सगळ्या भगिनी व्यावसायिक यश, दक्षिणेची अपेक्षा न करता संपादन करीत आहेत.
खरोखरच माझ्या मुलाचे शब्द किती आश्‍वासक आणि सयुक्तिक होते ना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com