चमचाभर तूप... फक्त चमचाभर

चमचाभर तूप... फक्त चमचाभर

सायंकाळी उन्ह उतरणीला लागण्यापूर्वीच वय उतरणीला लागलेल्या आम्ही पाच-सहाजणी तपोवनाच्या मैदानावर पाय मोकळे करतो. पेपरमधल्या, टी.व्ही.वरच्या बातम्यांवर, शहरात आयोजित व्याख्यानांवर चर्चा करतो. घरातील विशेष घटना ऐकवतो. विशाखाताईंचे विनोदी किस्से या वयातही खदखदून अथवा खुदूखुदू हसायला भाग पाडतात.

आज त्या गपगपच होत्या. जानकीने न राहावून विचारलेच, ‘‘काय झालंय विशाखा? बरं वाटत नाही कां? कंटाळलाय?’’ ‘‘छेऽ छेऽ! छान आहे तब्येत! कंटाळाही नाही आलाय आज.’’ ‘‘मग चेहऱ्यावर अशी उदासी कां अंथरलीय आज?’’ ‘‘अलका मॅडम, लेखक आहात म्हणून नव-नव्या कल्पनांचे पांघरूण का घालता आहात ऐकणाऱ्यांच्यावर!’’ मधुरावैनींनी डोळे मिचकावित अलकांना चिडविले.

विशाखाताईंना अलका मॅडम-मधुरावैनींच्या जुगलबंदीला फोडणी घालायची आवड होती; पण आज त्या गप्पच राहिल्या. आमच्यातील ज्येष्ठ कलाताईंनी विशाखांचा हात थोपटत विचारले, ‘‘काही खटकलेय का चित्राशी? मनावर घेतच नाही तिचे वागणे तुम्ही. स्वभाव! स्वभावाला औषध नसते म्हणून दुर्लक्ष करताच नेहमी.’’ ‘‘सणासुदीलाही पंगतीला ताट वाढत नाही ती हल्ली म्हणे! एकटेच जेवून मागचे आवरायचे गप्प राहून.’’

कलाताईंचे विशाखांकडे येणे-जाणे खूप. चित्राच्या सीनियर म्हणून निवृत्त झाल्या. माहेरकडून नाते आणि कॉलेज - घरी मदत - मार्गदर्शन चित्रा घेई. ‘‘कलाताई, सुनेची गाऱ्हाणी सांगणे आवडत नाही विशाखांना.’’ ‘‘मधुरावैनी, माहिती आहे त्यांचा स्वभाव! विदुला नाही का शिकवत आईला. दोन पिढींतील विचारांत फरक पडतोच म्हणतात; पण आज...’’ ‘‘आज-काल अतीच झालेय कलाताई. गणपतीचा नैवेद्यही.. गौरीची भाकरी - वडीही मागे ठेवली नाही. रमामावशींना ताट वाढून दिले. मी भात, डावभर आमटीवर जेवण उरकले.’’ ‘‘डोळे पुसा ताई. हवे ते करून खाताच ना तुम्ही. सर्वांसाठी ठेवता शिल्लक. आज का मनाला लागले एवढे?’’ 

सायंकाळी भूक लागल्यावर विशाखाताईंनी रमामावशींना गरम चपाती करण्यास सांगितले. दुपारी अपुरे जेवण झालेले. टेबलवर बसून चपातीवर चमचाभर ताजे तूप वाढून घेतले. गरम चपातीवर तूप खूप आवडायचे त्यांना लहानपणापासूनच. चित्राने तुपाचे भांडे समोरून उचलून रॅकवर ठेवले. ताटात दुसरी चपाती कोरडीच राहिली.

रमाबाईंनी शेंगदाण्यांची चटणी व तेल वाढताना डोळे मोठे करीत विशाखांची समजूत घातली होती. विशाखांच्या डोळ्यांना धारा लागल्या. शांत... सहनशील... कधीही तक्रार न करणाऱ्या त्या स्वतःला सावरू-आवरू शकल्या नाहीत. ‘‘कलाताई... माझ्या माहेरी दावणीला चार-दोन म्हशी-गाई दुभत्या असत. आठवड्यातून दोन-तीनदा आजी साय हालवायची. गल्लीतील, हरिजनवाड्यातील बायका लोटकी भरून ताक न्यायच्या.

एखाद्या ओल्या बाळंतिणीला लोणकढे तूप चेंबल्यातून नेऊन गरम-गरम भातावर वाढण्याचा आनंद मी शाळकरी असताना लुटलाय.’’ ‘‘विशाखा, तुम्ही वतनदार! गरीब... गरजूंना देताना हात मोठाच असे तुमचा.’’ ‘‘अलका मॅडम, गरम भाकरीचा पापुद्रा बाजूला करून आजी लोण्याचा गोळा आत सारायची. मीठाची चिमूट पसरायची वरती. कधी खोबऱ्याची.. तिळाची-शेंगदाण्यांची चटणी ढकलायची. गळ्याला येईपर्यंत भाकरी हाणायची मी. तूप-लोण्याने थबथबलेली अर्धी भाकरी उरायचीच. काळ्या-धिप्पाड राजा-राणीला ती चारायची मी. हात उंचावून धरलेली भाकरी हिसकावण्यासाठीची या कुत्र्यांची स्पर्धा किती गमतीदार वाटायची. ताज्या लोण्याच्या गोळ्यांमध्ये मूठ-दोन मूठ साखर घालून फन्ना उडवायची आम्हा भावंडांची स्पर्धा आजही तोंडाला पाणी आणते आणि मीच भरभराटीला आणलेल्या माझ्या घरात गरम चपातीवर चमचाभर तूप घेतेय म्हणून तुपाची तपेली एकुलती एकच सून उचलून दूर ठेवते. कोणते पाप केलेय मी!’’ विशाखाला हुंदके आवरेनात. ‘‘विशाखा... कंट्रोल... प्लीज कंट्रोल.’’

‘‘मधुरावैनी, बारक्‍या वासरांना, कुत्र्या.. मांजरांना लोण्या-तुपात-दुधात भिजलेली भाकरी या हातांनी खाऊ घातली त्या हातांनी एक चमचाभर तूप घातलेली चपाती-भाकरी खाताना मज्जाव करावा. सुनेने तुपाचे भांडे समोरून दूर करावे.’’ कलाताई विशाखांना कवटाळून डोळे पुसून शांत करीत असतानाचा बकुळीवर कलकलाट करणाऱ्या पाखरांनी जणू स्वतःला चूप केले. चोची मिटवून स्वतःला गप्प केले. जणू विशाखांचे हुंदके ऐकून शांत झाली पाखरे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com