'मॅडम'चा महिमा!

अपर्णा मोहिले
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

स्त्री शिकू लागली आणि कार्यालयात जबाबदारी स्वीकारू लागली. कोणत्याही पदावर असली तरी ती "मॅडम'. एखाद्या कार्यालयात एकाहून अधिक मॅडम झाल्या, की गमतींना सुरवात होते. पण, या मॅडमच अडचणींचे निवारणही वेगाने करू शकतात.

स्त्री शिकू लागली आणि कार्यालयात जबाबदारी स्वीकारू लागली. कोणत्याही पदावर असली तरी ती "मॅडम'. एखाद्या कार्यालयात एकाहून अधिक मॅडम झाल्या, की गमतींना सुरवात होते. पण, या मॅडमच अडचणींचे निवारणही वेगाने करू शकतात.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी लावलेला स्त्री-शिक्षणाच्या रोपट्याचा वेलू आता गगनावरी गेला आहे. याचा एक परिणाम म्हणजे सगळ्या कार्यालयांमधून "मॅडमां'ची संख्या लक्षणीय झाली आहे. आपल्याकडे सगळेच "सर' नि "मॅडम' असतात. मग त्यांचा हुद्दा काहीही असो. त्यामुळे होते काय, की कुठल्याही कार्यालयात गेलात, की तेथे अनेक मॅडम असतात. म्हणजे पाहा, की मंत्रालयात गेलात, तर सेक्‍शन ऑफिसर असलेल्या स्त्रीलाही मॅडम म्हणतात आणि अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, ऍडिशनल सेक्रेटरी आणि बरेचदा सेक्रेटरीसुद्धा मॅडमच. असे सारे "स्त्री'राज्य असते.

मच्छिंद्रनाथांच्या गोष्टीतल्या सारखेच. गंमत अशी, की सगळ्या निजीसचिव म्हणजे प्रायव्हेट सेक्रेटरीज्‌नाही "मॅडम'च म्हणायचे. म्हणजे आता बघा, ""मॅडम तुम्हाला बोलवत आहेत'' किंवा ""मॅडम, तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे,'' याचे किती वेगवेगळे अर्थ होऊ शकतात! आमच्या टपालसेवा संचालनालयात मी 2001 च्या जानेवारीत "डाक सेवा बोर्डा'ची सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारला, तेव्हा तिथपर्यंत पोचणारी मी पहिली भारतीय महिला होते. पण त्यानंतर एक काळ असाही आला, की सगळे "डाक सेवा बोर्ड' पूर्णपणे स्त्रियांचे होते!

खूप मॅडम कार्यालयात असल्या, की गमतीजमती होतात. एक बॉस शिपायाला सांगतो, ""जा, मॅडमला बोलावून आण.'' गरीब बिचारा शिपाई "कोणत्या मॅडमला?' असे विचारत नाही. तो त्याच्या मनाप्रमाणे एका मॅडमला निरोप सांगतो. इकडे खूप वेळ झाला तरी, "ती' मॅडम येतच नाही, त्यामुळे बॉस कावतो. तो त्या मॅडमला फोन करतो. ती सांगते, की तिला निरोपच मिळाला नाही. दरम्यान, ती दुसरी मॅडम गडबडीने बॉसकडे जाते. त्यांच्या खोलीत बैठक चाललेली असते. ही मॅडम खूप घाबरलेलीच; पण कशीतरी "घुसते.' पण तिच्या अशा अकाली "एन्ट्री'मुळे बॉस रागावतो. महत्त्वाच्या चर्चेत हे असे विघ्न आल्यामुळे रागावलेला बॉस ओरडतो, ""काय काम आहे?'' ""सर, आपण मला बोलवले असल्याचा निरोप मिळाला.'' बिचारी ओशाळलेली मॅडम तोंडातल्या तोंडात कशीबशी पुटपुटते आणि काढता पाय घेते.
मी "फिल्म सेन्सॉर बोर्डा'त असतानाची गोष्ट. एकदा एक फोन मी घेतला. ""मॅडम, आज शाम को फिल्म देखेंगे और बाद मे बाहर खानाभी खाएंगे।'' पलीकडचा पुरुषी आवाज सांगत होता. मी जागेवर उडालेच, ""आँ?'' यावर पलीकडच्या आवाजाने ""क्‍या बनती है, मॅडम?'' असा प्रतिसादही दिला. माझ्या लग्नाला जवळपास वीस वर्षं उलटून गेलेली असल्यामुळे असे दोघांनीच चित्रपटाला जाण्याचे व जेवणही घेण्याचे दिवस कधीच संपलेले होते. झाले असे होते, की हा फोन माझ्या पी.ए. मॅडमसाठी होता. तिचे नुकतेच लग्न ठरले होते. आणखी एक दिवस असाच एक फोन आला. आमच्या ह्यांचा. लीलाने फोन घेतल्याबरोबर मी, मॅडमच, फोनवर आहे असे समजून यांनी सरबत्ती सुरू केली होती. बिचारी. "ती मी नव्हेच'ची अशीही मजा!

"मॅडम' होणे हे कधी कधी आपल्या खूप सोयीचेपण असते. मला आठवते, की मी माझ्या नोकरीच्या अगदी सुरवातीच्या काळात अहमदाबादला "सिनिअर सुपरिटेंडन्ट ऑफ पोस्ट ऑफिसेस' असताना गुजरातमध्ये दंगल झाली होती. 1969 मध्ये. सगळेच व्यवहार थांबले होते. त्याकाळी इतर सोशल मीडिया किंवा दूरचित्रवाणी वगैरे नसल्याने टपालाला खूप महत्त्व होते व संदेशाच्या आदान-प्रदानाचे हे माध्यम आम्हाला लवकरात लवकर पुन्हा सुरू करायचे होते. मी टपालाच्या गाडीमधून टपाल कामगारांच्या कॉलनीत जाऊन त्यांना गोळा करून कार्यालयात पोचवण्याचे काम करू लागले. माझ्या जागी हे काम करणारा जर एखादा पुरुष अधिकारी असता, तर टपाल कर्मचाऱ्यांनी त्याला एवढे सहकार्य केले नसते. त्याचे आज्ञापालन करणेही नाकारले असते. पण मी एक "स्त्री' निर्भिडपणे फिरते आहे हे पाहून या कर्मचाऱ्यांचा "पुरुषी अहंकार' थोडा बहुत दुखावला गेला. ""बेन घुम रही है, तो हमने क्‍या चुडियॉं पहिनी है?' असे म्हणून सारा कर्मचारीवर्ग माझ्या हाकेसरशी धावून आला व आम्ही इतर कुठल्याही सरकारी सेवेआधी टपालाची सेवा पूर्ववत करू शकलो. हाही "मॅडम'पणाचा एक महिमाच.

जी पारंपरिक कर्तव्ये "मॅडम'ची मानली जातात, जसे की स्वयंपाक आदी, त्यात विनाविलंब निर्णय घेणे आवश्‍यक असते. चुलीवरून वरण उतरवायचे की नाही किंवा भाजीत किती तिखट- मीठ टाकायचे इत्यादीतही स्त्रीला पटकन निर्णय करावा लागतो. नाही तर वरण जळायचे व भाजी बेचव व्हायची. ही त्वरित निर्भयपणे निर्णय घेण्याची शक्ती आणि स्त्रीसुलभ मृदुपणा हे "मॅडम'चे गुण आहेत. ते आपल्या सेवांना खरेच उत्तम बनवू शकतात.
असे हे "मॅडम महिमा पुराण' - साठा उत्तराचे, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aprana mohile write article in muktapeeth