काजव्यांचे रान

काजव्यांचे रान

पाऊस पडून काही दिवस झाले, की जरा शहराबाहेरची वाट धरायची. थोडीशी संध्याकाळीच. रात्र वाढत जाते, तसे जंगल उजळत जाते काजव्यांच्या दिव्यांनी. काजव्यांची ती लयबद्ध उघडमीट पाहायला हवी.

मुळशी येथील काजवे बघण्याच्या सहलीला जाण्याचे आम्ही ठरवले. जेव्हा आम्हाला फेसबुकवरून याविषयी माहिती मिळाली, तेव्हा घरात आम्ही काजवे या विषयावर चर्चा केली, तर वडीलधाऱ्या मंडळींकडून समजले, की त्यांच्या लहानपणी व तरुणपणी त्यांनी काजव्यांचा लखलखाट सहजपणे अनुभवला आहे. काजव्याला जवळून बघितले व हाताळलेसुद्धा आहे. हल्लीच्या सिमेंटच्या जंगलात काजवे बघायचे तर अशाच सहली आयोजित कराव्या लागणार हे ऐकून खूप वाईट वाटले. आपल्याला व पुढच्या पिढीला काजवे बघायला मिळतील की नाही, या विचारानेच आम्ही काजवे बघण्याच्या सहलीला जाण्याचे पक्के केले.

रिवर्स आणि रिजेस या संस्थेकडून ही एक दिवसीय सहल आयोजित करण्यात आली होती.
आम्ही शनिवारी दुपारी तीन वाजता निघालो. जवळपास पाच वाजण्याच्या सुमारास आम्ही बसने मुळशीला पोचलो. वाटेत लागणारे रस्ते, डोंगर- दऱ्या व हिरवळ मन प्रसन्न करणारे होते. पृथ्वीने जणू हिरवा शालू पंघरला होता. पावसाची रिमझिम सुरू झाली होती. ढगांचे पुंजके जणू या नयनरम्य धरतीवर येण्यास आसुसले होते. धरतीचा हा शृंगार अवर्णनीय होता. मुळशीला पोचलो तेव्हा हवेत गुलाबी गारवा होता. मन प्रसन्न व प्रफुल्लित करणारे वातावरण होते. क्षणात सगळा थकवा व मनाची मरगळ नाहीशी झाली. मन आनंदाने डोलू लागले. त्या नयनरम्य निसर्गाचे अगणित फोटो आम्ही कॅमेऱ्यात कैद केले. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने पावसात भिजण्याचा आनंद आम्ही पुरेपूर लुटला. त्याचवेळी गरमागरम चहा मिळाला. यासारखे दुसरे सुख ते कोणते!
आयोजकांनी गरमागरम चहाची सोय केली होती. पाऊस आणि हातात चहा... व्वा, तो आनंद अवर्णनीय होता.

आम्ही एकूण साठ जण होतो. सगळे जण खूप उत्साही होते. सहलीचे आयोजक श्री. रोहन हे तर उत्साहाचे सळसळते झाडच जणू. त्यांनी प्रथम स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीने दोन शब्दांची आपापली ओळख करून दिली. आमचा जणू एक परिवारच तयार झाला होता. सगळे कसे अगदी आनंदात होते.

रात्रीच्या काळोखात झगमगणारे काजवे बघणे हे दृश्‍य डोळ्यांत साठविण्यास सगळे आतूर झाले होते. तोपर्यंत बऱ्यापैकी अंधारून आले होते आणि जवळपासच्या झाडांवर बारीक बारीक दिव्यांची उघडझाप दिसण्यास सुरवात झाली होती. लहान- थोर मंडळींच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. आनंदाने सगळेजण एकमेकांना इशारा करत ते दृश्‍य बघण्यास सांगत होते. आम्ही सर्वजण निसर्गाचा हा चमत्कार डोळ्यांत साठविण्यास उत्सुक झालो होतो. आयोजनानुसार मध्यरात्री जंगलाच्या आत जाऊन आम्हास हे दृश्‍य बघण्यास मिळणार होते. तूर्तास जेवणाची वेळ झाली होती. स्वादिष्ट भोजनाचा सुवास दरवळत होता. पोटात कावळे ओरडू लागले होते. गरमागरम अस्सल गावरान जेवण व चिकनरस्सा बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले. त्या स्वादिष्ट जेवणावर सगळ्यांनी यथेच्छ ताव मारला.

आता खरा क्षण अनुभवायची सगळ्यांना ओढ लागली होती. शेवटी तो क्षण आला.
आम्हा सर्वांना बसमध्ये बसवून जंगलाच्या पाच किलोमीटर आत नेण्यात आले. रात्री दहा वाजण्याची वेळ होती. सर्वजण बसमधून उतरून जवळपास दोन किलोमीटर आत खाली चालत गेलो. उताराचा रस्ता होता. जेव्हा आम्ही थोडे पुढे पोचलो, तर जंगलात किरर्र काळोख व समोरच्या झाडावर काजव्यांचा झगमगाट. अहाहा! तो नजारा अक्षरशः डोळ्यांत साठविण्यासारखा होता. संपूर्ण झाड काजव्यांच्या झगमगाटाने उजळून निघत होते. ते नयनरम्य दृश्‍य बघून मन अगदी आनंदून गेले. ते खूपच अप्रतिम दृश्‍य होते.

आयोजकांच्या मते, जे झाड सगळ्यात जुने असते, त्या झाडावर काजव्यांची संख्या अधिक असते. कारण त्या झाडाच्या खोडात काजवे आश्रय घेऊ शकतात. काजव्यांची लखलख त्यांच्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी असते.

जवळपास पुढचे काही तास आम्ही ते नयनरम्य दृश्‍य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपडत होतो. मध्यरात्रीच्या वेळी किरर्र जंगलात अंधारात चमकणारे काजवे बघण्याचा आनंद काही औरच असतो.
आमचा पाय तिथून निघता निघत नव्हता. बऱ्याच वेळानंतर आम्ही ते नयनरम्य दृश्‍य नजरेत व कॅमेऱ्यात साठवून व जीवनभराची पुंजी मिळाल्यागत आठवणी जतन करत, परतीच्या प्रवासाला निघालो.

त्या रात्री आमच्या मुक्कामाची सोय आयोजकांनी तंबूमध्ये केली होती. तंबूमध्ये रात्र अनुभवायचा क्षणही आमच्यासाठी नवखा होता. रिमझिम पाऊस, गार हवा, मातीचा मंद सुगंध आणि रंगतदार गप्पांच्या ओघात रात्र कधी व कशी गेली कळलेच नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com