... समाधानाची वृष्टी (मुक्तपीठ)

सुषमा ज. करंदीकर
सोमवार, 1 मे 2017

पेला पूर्ण भरलेला दिलेला नाही यासाठी परमेश्‍वराचे आभार माना. कारण तो भरण्याची संधी त्याने तुम्हाला दिलेली आहे. कृती करण्यात आनंद असतो. तो आनंद मिळाला तर समाधान प्राप्त होईल. 

सकारात्मक दृष्टिकोन माणसाला संकटाच्या वादळात तारता. दुःखाच्या अंधारात आशेचा किरण दाखवतो. खाच-खळग्यांतून सहीसलामत रस्ता पार करायला शिकवतो. माणूस खरे तर निसर्गाकडून जे शिकायला हवे तेच शिकत नाही. निसर्गचक्राकडे आपण डोळे उघडे ठेवून का बरं बघत नाही? ऋतुमानाप्रमाणे निसर्गात बदल होतात. शिशिर ऋतूत पानगळ होते. झाडाची सगळी पाने झडून जातात. निष्पर्ण झाड काही निराश होत नाही - वठत नाही - मान टाकत नाही, त्याच उमेदीने - उत्साहाने डोलत राहते, कारण त्याला माहीत असते - वसंत येणारच! नवी पालवी फुटणार आपण परत बहरणार! 

माणूस मात्र संकटे आली, परिस्थिती मनासारखी नसली की निराश होतो. अंगातला त्राण आणि मनातला प्राण घालवून बसतो. हे अयोग्य आहे. इथेच पाहिजे हिंमत, मनाची उभारी, उमदा दृष्टिकोन म्हणायचं 'ये भी दिन जायेंगे...' प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येणारच. परिस्थिती वाईट असली की आपण म्हणतो, ''हे माझ्याच नशिबी का?'' पण तेच सगळे उत्तम असले की नाही म्हणत, ''हे माझ्या नशिबी कसे काय बुआ?'' माणूस मनाने खचला, नकारात्मकता मनात साचली की ती मळाप्रमाणे राहते. मग कितीही प्रयत्न केले तरी डाग उरतो. म्हणून सकारात्मक दृष्टीचा मळ साचूच द्यायला नाही. थोडी जरी साशंकता आली तरी निराशेला झुरळाप्रमाणे झटकून उमेदीने उभे राहायचे! म्हणजे नक्की काय करायचे? तर दुःख देणारी मनाला त्रास देणारी घटना वेगळ्या नजरेने पाहायला शिकायचे. चष्मा बदलायचा. उदा. बायका नेहमी एक तक्रार करतात ती म्हणजे, मी घरासाठी मर मर मरते, पण कुणाला त्याची किंमत नाही! यातून त्या दुःखीकष्टी होतात, आपली किंमत कवडीमोल, आपल्याला कोणी समजून घेत नाही, मी म्हणजे घरकामासाठी मोलकरीण वगैरे वगैरे... इथे आता दृष्टिकोनच बदला. मी घरासाठी कष्ट घेते, तन-मनाने साऱ्या गोष्टी निगुतीने करते. स्वयंपाकपाणी, मुलांची काळजी, आजारी वृद्ध सासू-सासरे, आई-वडील यांची सेवा, पाहुणचार, गरजेप्रमाणे सर्व आर्थिक व्यवहार या साऱ्या गोष्टी इतक्‍या अमूल्य आहेत, की त्याची फालतू पैशात किंमत होऊच शकत नाही! हे अमूल्य काम व त्याची जाणीव तिने कुटुंबीयांना नक्कीच आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने करून दिली पाहिजे. 

विचारांची दिशा बदला - आयुष्य बदलेल. 

अपेक्षाभंग हे तर दुःखाचे मूळ कारण. उदा. आपण आपल्या नातेवाइकांसाठी, शेजारीपाजारी राहणाऱ्या लोकांसाठी, मित्रमंडळींसाठी वेळ आणि पैसा खर्च करतो. शारीरिक मदत करतो. त्यांना अडचणीतून बाहेर पडण्यासाटी सहाय्य करतो. अशावेळी आपली सहजस्वभावे त्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षा राहातेच. ती नाही पूर्ण झाली की संताप येतो, दुःख होते. यापुढे काही कुणाला जीव तोडून मदत करायची नाही ही भावना तीव्र होते. आपल्या चांगुलपणाचा आपणच गळा दाबतो. असे न करता लक्षात ठेवली पाहिजे, ज्या लोकांसाठी तुम्ही करता त्यांची नोंद होतेच - निसर्गनियम सांगतो, कोणतीच गोष्ट वाया जात नाही- फक्त ती मदत दुसऱ्या रूपात - तिसऱ्या व्यक्तीकडून मिळते. आपल्याला कित्येकदा असा अनुभव येतो, की जो ना तुमच्या नात्याचा - ना गोत्याचा - ना ओळखी - पाळखीचा. अडचणीच्या वेळी इतकी मदत करतो, हे का होते? तर तुम्ही अगोदर जे पेरलेले असते ते या रूपात उगवते. म्हणूनच घरामध्ये, ऑफिसमध्ये, जनसामान्यात मिसळताना शुभ विचार करा - चांगले चिंतन करा. सकारात्मक विचारांची स्पंदने आजूबाजूच्या व्यक्तींनासुद्धा तसाच विचार करायला प्रवृत्त करतात. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, मनामध्ये नवनवीन कल्पनांचा टवटवीतपणा जीवनाला वेगळीच खुमारी आणतो. 

जीवनाचा अर्धा पेला रिकामा म्हणून रडत बसण्यापेक्षा, तो रिकामा आहे तेच बरे आहे, कारण मी माझ्या प्रयत्नाने तो भरू शकतो. जर सगळाच पेला भरलेला दिला असता, तर अहंकाराचा धक्का लागून सगळाच रिकामा झाला असता! कृती करतानाच इतका आनंद होत असतो की खरे तर कृती थांबली की तो संपतो. कृतीतच फळ आहे. मग फळाला फळ लागेल ही अपेक्षा का? यासाठी स्वच्छ मनाने कृती करा. तुमचे शरीर साक्षात परमेश्‍वर आहे, असे सद्‌गुरू वामनराव पै सांगतात. अंतर्मुख व्हा. आत्मपरीक्षण करा. आपल्या मनावर जर नकारात्मक दृष्टिकोन, द्वेष, अहंकार, असूया, राग, मत्सर याची कोळीष्टके जमली असतील तर ती दूर करा व उत्तम विचार, चिंतन - मनन सकारात्मक उदार दृष्टिकोन याचे रोपण करा. तुमच्या लक्षात येईल की, 'सकारात्मक दृष्टी करते समाधानाची वृष्टी'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article in Muktapeeth by Sushma Karandikar