किमया कागदाची

अश्‍विनी भावे, पुणे
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

संगणक, मोबाईलच्या युगात कागदाचा वापर कमी करा, पेपरलेस व्हा असे सांगितलं जातं. खरं आहे ते. तरीही कागदाचं बहुउपयोगीपण डोळ्यांसमोर आलं, की बालपणापासून तारुण्यातील घटनांचा पट सहजगत्या डोळ्यांसमोर उलगडू लागतो...

संगणक, मोबाईलच्या युगात कागदाचा वापर कमी करा, पेपरलेस व्हा असे सांगितलं जातं. खरं आहे ते. तरीही कागदाचं बहुउपयोगीपण डोळ्यांसमोर आलं, की बालपणापासून तारुण्यातील घटनांचा पट सहजगत्या डोळ्यांसमोर उलगडू लागतो...

कागदात बांधलेले खाद्यपदार्थ खाणे आरोग्याला अपायकारक आहेत, अशा आशयाची बातमी मध्यंतरी कुठेतरी वाचनात आली. बापरे! मी तर लहानपणी किती तरी गोष्टी कागदामध्येच खात होते की. आईबरोबर किराणा मालाच्या दुकानात गेलं, की दुकानदार रद्दी कागदामध्ये वस्तू बांधून त्याला दोरा गुंडाळून द्यायचा. अशा सगळ्या कागदाच्या पुड्या आम्ही कापडी पिशवीतून घरी आणायचो. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचं अस्तित्व तेव्हा नावारूपाला आलं नव्हतं. पाठीवर भलं मोठं पोतं घेऊन येणारा चणेवाला चणे, शेंगदाणे, भेळ कागदाच्या पुडीत द्यायचा आणि ते आम्ही मिटक्‍या मारत खायचो. अर्थात, कागदाचा हा एकमेव उपयोग नव्हता.

माझी एक कलाकार मैत्रीण रद्दी कागद गोलाकार कापून ते एकावर एक चिकटवून, त्याच्या कडा वळवून, अंतरा-अंतरावर चुण्या पाडून सुंदर पेपर डिश बनवायची. त्याचा वापर खाण्यासाठी व्हायचाच; पण त्या डिशवर चित्र काढून रंगवून, टिकल्या, मोती, आरसे यांची कलाकुसर करून ती शो-पीस, वॉल हॅंगिंग असे प्रकार बनवायची. आम्ही तर कागदाचे बारीकबारीक तुकडे करून पाण्यात भिजवून त्याचा लगदा बनवायचो. भांड्याच्या बाहेरून हा लगदा थापून सुकवायचो. नंतर आतले भांडे अलगद काढून घेतले, की कागदाची सुंदर भांडी तयार व्हायची. त्यांना रंगवले, की लग्नाच्या रुखवतात ती शोभून दिसायची. जुन्या मासिकातली रंगीत चित्रं कापून कोऱ्या कागदावर चिकटवली, की त्यांचा सुंदर कोलाज तयार व्हायचं.

पतंग, आकाशकंदील, निरनिराळे पक्षी, जपानी फुगे या गोष्टी कॉमन होत्या; पण रंगीत कागदाच्या झिरमिळ्या करून त्यांची तोरणं बनवणं, हा आमचा दिवाळीच्या सुटीतला आवडता उद्योग होता. पांढऱ्या कागदाच्या कळ्या करून त्याचा गजरा केला जायचा. कागदाचे सुंदर पुष्पगुच्छ केले जायचे. इतकंच काय तर रफ वही तयार करणं ही एक अतिशय आनंदाची गोष्ट होती. आताच्या मुलांप्रमाणे आमच्या लहानपणी रफ वही नवी कोरी नसायची. आधीच्या इयत्तेतील वह्यांचे उरलेले कोरे कागद काढून एकत्र शिवून त्याला जुन्या वहीचा पुठ्ठा चिकटवून बनवलेल्या रफ वहीचं खूप अप्रूप वाटायचं. अजूनही मी एक बाजू कोऱ्या असणाऱ्या कागदाचं रफ पॅड बनवते.
कागदाचा शोध खरंच खूप महत्त्वाचा म्हणावा लागेल. त्यामुळेच तर प्रियकर-प्रेयसी एकमेकांना "सागर में भरा पानी घागर से भरा नही जाता, दिलमें भरा प्यार कागज पे लिखा नही जाता,' असं म्हणू शकले. मेरा जीवन कोरा कागज...., कोरा कागज था ये मन मेरा.... यासारखी गाणी आणि "कोरा कागज', "कागज के फूल' यांसारखे चित्रपट कागद होता म्हणूनच उदयाला आले. आजही बाजारातून आणलेले नवं कोरं पुस्तक वाचत असताना त्याच्या कागदाचा वास मनाला भुरळ घालतो, हेही खरंच. नवं पुस्तक, नवी वही यांचं आकर्षण आजही वाटतं.

संगणक, मोबाईलचं युग आलं आणि कागदाच्या गरजेत कपात झाली. पत्रलेखन तर संपल्यातच जमा आहे. काळानुरूप स्वतःला बदलून कागदाशी असलेले ऋणानुबंध कमी करायला हवेत हे कळतं; पण वळत नाही. म्हणूनच कधी तरी लहानपणी विखुरलेले कागदाचे कपटे मनात एकत्र गोळा होऊन आठवणींचं सुंदर कोलाज तयार करतात. त्या वेळी आठवते केशवसुतांची तुतारी-

जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका

आणि मग मीच माझ्या मनाची समजूत घालते, की जागतिक स्पर्धेत वेगाने धावून प्रथम क्रमांक मिळवायचा असेल, तर आपल्या देशाची प्रगती व्हायला हवी. त्यासाठी पेपरलेस व्हायलाच हवं. तीच आजच्या काळाची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashwini bhawe write on muktapeeth