फुलवते हात

अविनाश देशपांडे
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

आनंदवन, हेमलकसा व सोमनाथ ही आधुनिक त्रिवेणी आहे. या सामाजिक तीर्थस्थळांना भेट द्यायची आणि आपण स्वतःलाच बदलून आणायचं. शरीराविषयीची आसक्ती, स्वार्थ, शत्रुत्व हे सगळं विसरायला होतं. अध्यात्मात तरी याहून काय वेगळं सांगितलेलं असतं?

आनंदवन, हेमलकसा व सोमनाथ ही आधुनिक त्रिवेणी आहे. या सामाजिक तीर्थस्थळांना भेट द्यायची आणि आपण स्वतःलाच बदलून आणायचं. शरीराविषयीची आसक्ती, स्वार्थ, शत्रुत्व हे सगळं विसरायला होतं. अध्यात्मात तरी याहून काय वेगळं सांगितलेलं असतं?

आनंदवन, हेमलकसा व सोमनाथ ही आधुनिक सामाजिक तीर्थस्थळे बघण्याचा योग नुकताच आला. "आनंदवन प्रयोगवन', 'प्रकाशवाटा' व 'समिधा' ही पुस्तकं वाचली होती. त्यामुळे बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या कार्याची व्याप्ती, त्यातील अडचणी व कार्यकर्त्यांची शून्यातून सृष्टी निर्माण करण्याची मानसिक व शारीरिक तयारी याची पुसटशी कल्पना आली होती. आनंदवनमध्ये आम्ही गेलो तेव्हा नुकतेच डॉ. लहाने यांच्या नेतृत्वाखाली मोतीबिंदू व दृष्टीदोषावर विविध शस्त्रक्रिया शिबिर सुरू होते. शिस्त, स्वच्छता व कार्यकर्त्यांचे येणाऱ्या लोकांना न थकता बाबांच्या कार्याविषयी माहिती देणे, कुष्ठरोगमुक्त कार्यकर्त्यांनी 'श्रद्धावना'चे केलेले संगोपन, शांत व निसर्गाच्या सान्निध्यात चिरनिद्रा घेणारे बाबा, साधनाताई व अनेक कार्यकर्ते तुम्हांला आपसुकच त्यांनी केलेल्या कार्यापुढे नतमस्तक करतातच. आनंदवनातील बायोगॅस, दूधउत्पादन, अपंगांसाठी तीन चाकी सायकली तयार करण्याचे, सूतकामाचे, सुतारकामाचे, ग्रीटिंग-कार्ड, स्वरानंदवन, कुष्ठरोग्यांसाठी खास पादत्राणे, छोट्या-मोठ्या सतरंज्या बनविणे, प्लॅस्टिकचा वापर करून उशा व गाद्या, बांधकामाच्या विटा असे प्रकल्प अंध, अपंग व कुष्ठरोगमुक्त कार्यकर्ते चालवतात. या माणसांमधील उपजत गुणांना जगापुढे मांडण्याचे काम येथे केले जाते. डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांच्याशी गप्पा मारण्याची सुवर्णसंधी आम्हांला मिळाली. बाबांच्या कामाचे विविध पैलू, अनेक दिग्गजांचे आनंदवनातील वास्तव्य व मदतीचा हात, कुष्ठरोगमुक्त लोकांचे आमटे कुटुंबीयांवर निर्व्याज प्रेम व त्यांनी फुलविलेली आनंदवनातील वनसंपत्ती व विविध प्रकल्पातील त्यांचे योगदान, हे सर्व आम्ही स्तंभीत होऊन ऐकत होतो, पहातही होतो. माझे डोळे व कान सतत त्यांच्याकडेच लागलेले होते व डोळ्यातील पाण्याचादेखील त्याला अडसर येऊ नये असे वाटत होते.

हेमलकसामधील 'लोक बिरादरी प्रकल्प' फक्त माणसांनाच नाही, तर पशू, पक्षी यांनादेखील अभय देत आहे. मायेची उब देऊन त्यांचे संगोपन केले गेले आहे. आदिवासी लोकांना आरोग्य सेवा, त्यांच्या अधिकाराची जाणीव, त्यांचे समाजकंटक लोकांकडून शोषण होऊ न देणे, आदिवासी मुलांना व मुलींना शिक्षण, मुलींना भूलथापांना बळी न पडण्याचे शिक्षण, मुला-मुलींची वसतिगृह असे मोठे काम डॉ. प्रकाश आमटे, त्यांचे कुटुंबीय व कार्यकर्त्यांनी उभारले आहे. दुर्गम भागांत जीवावर उदार होऊन जाणे, आदिवासी लोकांना हुडकून काढणे, त्यांना आरोग्याचे महत्त्व पटविणे, त्यांची भाषा शिकणे, त्यांच्या मुलांना शिक्षण देणे, प्राणिमात्रांविषयी आदिवासींचा दृष्टिकोन बदलणे, हे सारे आपल्या कल्पनाशक्ती पलीकडील आहे. डॉ. दिगंत यांच्याशी गप्पा करताना या पुढच्या पिढीची आदिवासींच्या सुश्रुतेबद्दलची तळमळ जाणवत होती. दूरदृष्टी व सहजता या संकल्पनेतून आदिवासी कुटुंबातील मुलांना शिक्षण देऊन शिक्षक म्हणून मुलांना उघड्या पटांगणात शिक्षण देणारे कार्यकर्ते इथे आहेत. लाल मुंग्यांची चटणी व भाजलेले उंदीर असे ज्यांचे खाद्य आहे, त्या आदिवासी लोकांना शेती करायला शिकविणे, भाकरी-भाजी, भात हे जेवणाचे पदार्थ आहेत याची जाणीव करून देणे, औषधोपचार करून त्यांचा विश्वास संपादन करणे, या सारखी असंभव वाटणारी कार्ये प्रत्यक्षात आणली आहेत.

सोमनाथमध्ये कुष्ठरोगमुक्त लोकांची वसाहत व त्यांनी फुलवलेले नंदनवन. खडकाळ जमिनीवर पाण्याची तळी, पाण्याच्या विहिरी बांधणे, बियांचे रोपण करून औषधी वनस्पतींची लागवड, पाण्याचे बंधारे बांधून 'पाणी अडवा पाणी जिरवा' ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे, सगळी तळी एकमेकांशी जोडलेली. मोठ्या टाकाऊ टायरांचा वापर करून पाण्याचे बंधारे बांधले आहेत. आवारातच कुष्ठरोगमुक्त लोकांसाठी जेवणाची व्यवस्था. घरी स्वयंपाक करणे ही संकल्पनाच नाही. सोमनाथ प्रकल्पात भातशेती व भाज्यांची लागवड होते. वसाहतीतील लोकांनी घराच्या अंगणात लावलेल्या भाज्या, फळं व त्यातील उत्पन्नातून केलेली बचत. या बचतीतून लोकांनी पोस्टात उघडलेली नियमित मासिक बचतीची खाती व त्यामुळेच येथील जिवंत राहिलेलं पोस्ट-ऑफिस. सोमनाथ प्रकल्पाविषयी माहिती देणारे होते कुष्ठरोगमुक्त हरिभाऊ गोविंद पाटील. बाबांच्या सान्निध्यात राहिलेल्या हरिभाऊंनी मला छोटासा संदेश लिहून दिला - "आयुष्यामध्ये आपण सर्व काही विकत घेऊ शकतो. फक्त गेलेली वेळ तुम्ही विकत घेऊ शकत नाही.'

बाबांना जेव्हा कुष्ठरुग्णाचं पहिलं दर्शन झालं, त्यानंतर त्यांनी वेळ वाया घालवला नाही. जवळच्या माणसांनी अव्हेरलेल्यांना बाबांनी जवळ केलं. परतताना पु. ल. देशपांडे यांचं एक वाक्‍य आठवत राहाते - "पर्यटक म्हणून येथे आला आहात, परिवर्तीत होऊन जा".
पुण्यात परतल्यावर लक्षात आले की, आपण आपल्याच नकळत बदललो की!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avinash Deshpande's muktapeeth article