स्वच्छतेचे देवदूत

बबन पोतदार
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

शाळेत गुणवंतांचे सत्कार होतात; पण सारा परिसर स्वच्छ ठेवणारे हात हातात घेऊन कौतुक होते तो क्षण अधिक मोलाचा.

शाळेत गुणवंतांचे सत्कार होतात; पण सारा परिसर स्वच्छ ठेवणारे हात हातात घेऊन कौतुक होते तो क्षण अधिक मोलाचा.

गेल्या महिन्यात विद्यापीठ हायस्कूलमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित हे हायस्कूल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आहे. हायस्कूलच्या इमारतीचा परिसर वेगवेगळ्या वृक्षांनी व्यापला आहे. आवारात भव्य क्रीडा मैदानही आहे. पर्यवेक्षिका उमा जोशी यांनी ओळख करून दिली. दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून त्यांची महती सांगणारे भाषण केले. विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले आणि निवेदकांनी एका दांपत्यास मंचावर बोलाविले. रमेश पांडुरंग विटेकर आणि दीपाली हे त्या दांपत्याचे नाव. शाळेच्या संपूर्ण परिसराची साफसफाई करण्याचे काम विटेकर पती-पत्नी वर्षानुवर्षे करीत असल्याचे सांगितले गेले. त्या दोघांचा यथोचित सत्कार मला करता आला. सत्कार होत असताना त्या दोघांच्या डोळ्यांत जमा झालेले आनंदाश्रू आणि विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट यांनी सारा आसमंत दुमदुमून गेला.

व्याख्यानासाठी शाळेत प्रवेश करताना "या एवढ्या मोठ्या विस्तीर्ण परिसराची निगा कोण ठेवत असेल?' असा प्रश्न मी स्वतःशीच केला होता. त्याचे उत्तर देणारे चार हात माझ्या हातात घेताना माझ्यासह सर्व उपस्थितांचे डोळे तुडुंब भरून वाहू लागल्याचे साक्षीदार होते आजूबाजूचे सारे वृक्ष आणि त्यांच्या फांद्यावरील किलबिलणारे पक्षी! वाचन संस्कृतीबरोबरच स्वच्छतेलाही महत्त्व देणाऱ्या शिक्षकांचे कार्य अनमोल आहे, यात शंका नाही. स्वच्छतेचा मूलमंत्र जपणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांची शिकवण वास्तवात आणणाऱ्या या शाळेच्या प्राचार्य व शिक्षकांना आणि स्वच्छतेच्या देवदूतांच्या रूपाने सारा परिसर निर्मळ ठेवणाऱ्या विटेकर पती-पत्नीला मनोमन वंदन करून उल्हासित मनाने बाहेर पडलो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baban potdar write article in muktapeeth